Friday, 10 May 2024

दगडातला देव



मार्च महिना संपत आला, आणि अखेर लेकराची ( म्हणजे पर्यायाने माझीही) परीक्षा संपली. निव्वळ योगायोगाने मला, नवरोबाला आणि आमच्या मित्रमंडळीना एकत्र मोकळा वेळ मिळाला, आणि उत्तर कर्नाटक मधील सिरसीची वारी  करायचे वेध लागले. रविवारी सकाळी साधारण साडेदहाच्या सुमाराला गोव्याहून निघून चार साडेचार वाजता सिरसीला मुक्कामस्थळी पोहोचलो.


सिरसी पासून साधारण २४ किलोमिटर अंतरावर असलेल्या बनवासी गावातील मधुकेश्वर मंदिराबद्दल बरेच ऐकले होते. पण मुळात पोहोचायला झालेला उशीर बघता, मंदिर किती वाजेपर्यंत खुले असेल, याविषयी शंकाच होती. शेवटीं, वाटेतच भेटलेल्या एका पोलीस बाईंपाशी रस्ता आणि वेळेची चौकशी करावी म्हणून आम्ही थांबलो. आता चौकशी करावी म्हटलं तर बाईंचं गाडं कन्नड शिवाय पुढे सरकेना! अस्मादिकांनी चार वर्षे कर्नाटकात घालवून सुद्धा आमचं कानडी "स्वल्प स्वल्प बरतेती" च्या पुढे कधी गेलं नसल्यामुळे, शेवटी खाणाखुणांच्या वैश्विक भाषेतील संवाद साधत- "मंदिर सात पर्यंत खुले असेल" हे ज्ञान प्राप्त करून घेतले, आणि बाईंकडून "सिद्धा होग री" चा ग्रीन सिग्नल मिळवला.

हिरव्यागर्द वनराईमधून वळणे घेत अखेर "बनवासी" गाव गाठले. असं म्हणतात, की रामायण काळात प्रभू श्रीराम, तसेच, महाभारत काळात पांडवांनी याच स्थानावरून वनवासासाठी प्रयाण केलं होतं. म्हणूनच या जागेचं ' वनवासी ' , म्हणजेच पर्यायाने ' बनवासी'  असं बारसं झालंय. 

गाडी मंदिराजवळ पोहोचली, तोवर सायंकाळचे साडेपाच वाजले असतील. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी लक्ष वेधून घेतले, ते मंदिराच्या भव्य रथांनी. लवकरच संपन्न होणार असलेल्या रथोत्सवासाठी त्यातील दोन रथ साजवण्याचे काम चालू होते. दोन्ही रथ भव्यदिव्य, आणि सुंदर नक्षीकाम असलेले. परंतु आमच्या नजरेत भरला तो, आता वापरात नसलेला, अतिभव्य परंतु कमालीची देखणी कलाकुसर असलेला जुना रथ. नवीन रथ सुबक असले, तरी या जुन्या रथाच्या लाकडाचा गडगंज भरीव थाट निराळाच होता! बायकांच्या घोळक्यात एखाद्या कुलीन घरंदाज स्त्रीचं व्यक्तिमत्त्व बघताक्षणी नजरेत भरावं ना, अगदीं तसाच! तब्बल सव्वा चारशे वर्षे जुना असलेला हा लाकडी रथ अगदीं गेल्या वर्षीपर्यंत वापरात होता असं कळलं. साधरण  शंभर टन वजन, एकवीस फूट उंची व तेवीस फुटाची रुंदी असलेल्या या अवाढव्य रथाला ओढण्यासाठी दोन हजारपेक्षा अधिक माणसे दरवर्षी येथे जमतात. सोळाव्या शतकात कर्नाटकच्या प्रसिद्ध ' सौंदे ' राजघराण्यातील राजे रामचंद्र नायक सौंदे यांनी वसंतोत्सवाच्या निमित्ताने मधुकेश्वराच्या चरणी अर्पण केलेले हे 'महास्यदान' आजच्या घडीला मात्र देवालयाच्या प्रांगणात विश्रांती घेत, गतकाळाच्या वैभवाची साक्ष देते आहे.



देवालयात प्रवेश केला, तेव्हा फारशी वर्दळ नव्हती. आजन्म शंकराच्या प्रतीक्षेत उभा असलेला, सात फूट उंचीचा विशालकाय नंदी, मंदिरात प्रवेश घेण्यापूर्वीच नजरेत भरतो. नंदीकडे जवळून निरखून पाहिल्यानंतर मात्र त्याची मान किंचित एका दिशेला वळलेली असल्याचे जाणवले. "असं तिरक्या नजरेने पाहणारा नंदी का बरं घडवला असेल शिल्पकारांनी?" हा विचार डोक्यात रुंजी घालत असतानाच, देवालयात दर्शनासाठी गेलो. 

गर्भगृहात स्थापन केलेल्या मधुकेश्वराच्या शिवलिंगाला काही खास पूजेनिमित्त चांदीचा मुखवटा चढवला होता. तेथील गुरुजींनी " कुठून आलात?" अशी आस्थेने चौकशी करीत, " तुमची इच्छा असेल, तर पूर्ण मंदिराची माहिती सांगतो" अशी ग्वाही दिली. "देवालय बंद झालेले नसू देत" एवढीच माफक अपेक्षा बाळगून आलेल्या आमच्यासाठी, हे म्हणजे, ' आंधळा मागतो एक डोळा, आणि देव देतो दोन ' असं झालं! पुढचा तब्बल पाऊण एक तास अजिबात न कंटाळता, त्यांनी पूर्ण देवालयाचा फेरफटका मारत, देवालय, त्याचं बांधकाम, त्यामागचा इतिहास, याबद्दल इत्थंभूत माहिती सांगितली. 

पुराणकाळात मधु आणि कैटभ या दोन दैत्यांना देवी दुर्गेचा वर मिळाला, की जोपर्यंत त्यांची इच्छा नसेल, तोपर्यंत त्या दोघांना कोणी मारू शकणार नाही. सहाजिकच, त्या वराने उन्मत्त झालेल्या या दोन्ही दैत्यांचा वध करण्याचा साक्षात नारायणाने कित्येक दिवस निष्फळ प्रयत्न केला. अखेर , या राक्षसांसमोर केवळ शक्तीचा उपयोग करून काहीही साध्य होणार नाही, हे मुळातच चाणाक्ष असलेल्या भगवान् विष्णूंनी ओळखले, आणि चक्क कूटनीतीचा प्रयोग करीत, सपशेल शरणागती पत्करली! म्हणाले, " तुमचे सामर्थ्य पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुम्हाला हवा तो वर मागा." मुळात गर्विष्ठ, त्यात हरभऱ्याच्या झाडावर चढलेल्या त्या दैत्यांनी मात्र, श्री विष्णूंची हेटाळणी करीत, "तू आम्हाला काय वर देणार? उलट तूच आमच्याकडे वर माग" अशी बढाई मारली. ही संधी साधून, विष्णूंनी वर म्हणून दोन्ही दैत्यांचे प्राण मागितले. वचनबद्ध असल्यामुळे मधु आणि कैटभ यांनी आपले प्राण विष्णूंना अर्पण केले. असं म्हणतात, की दोन्ही असुरांचा वध केल्यानंतर, त्यांच्यातल्या शिवभक्ताचा मान राखण्यासाठी, स्वतः श्री विष्णूंनी  येथील मधुकेश्वर आणि  शिमोगा जिल्ह्यातील कैटभेश्वर या दोन शिवलिंगाची स्थापना केली. 

या मंदिराच्या बांधकामाचा इतिहासही तितकाच रंजक आहे. नवव्या शतकात कदंब राजवटीत बांधलं गेलेलं हे मंदिर. पण असं असलं, तरी त्यानंतर या प्रदेशावर अधिपत्य गाजवणाऱ्या प्रत्येक राजघराण्याने मंदिराच्या विस्तारात आपला हातभार लावला आहे. पूर्वापार मुखोद्गत केलं गेलेलं, आणि प्रत्येक पिढीने आपापली भर टाकत वर्षानुवर्षं जीवंत ठेवलेलं एखादं अजरामर महाकाव्य असावं, तसं हे पुरातन मंदिर गेल्या कित्येक पिढ्यांमधल्या राजकीय स्थित्यंतराच्या खाणाखुणा अंगावर मिरवत दिमाखात उभं आहे. 

मंदिराच्या प्रवेशद्वारापाशीच, ऋषी मुनींच्या मुखातून वेदमंत्रांचा उद्घोष व्हावा, तसा धीरगंभीर ॐकाराचा नाद करणारी पंचधातूची भली मोठी घंटा आहे. गर्भगृहाच्या बाहेर चार वेगवेगळे मंडप - दर्शन मंडप, नृत्य मंडप, त्रिलोक मंडप आणि बसव मंडप म्हणजेच नंदी मंडप. सातवाहन, चालुक्य, होयसळ, सौंदे  अशा वेगवेगळ्या राजघराण्याच्या परंपरेप्रमाणे प्रत्येक मंडपाची स्थापत्यशैली निराळी आणि वैशिष्टयपूर्ण. 

नंदी मंडपातला नंदी अजस्त्र असला, तरी विलक्षण देखणा.. मुद्रेवर सात्विक भाव असलेला! हा म्हणे मान काहीशी तिरकी करून, एकाच वेळी, एका डोळ्याने शंकराला, तर दुसऱ्या डोळ्याने बाजूच्या मंदिरात उभ्या जगज्जननी पार्वतीला पाहतोय. बांधकाम सुद्धा इतके अचूक, की या दोन्ही गर्भगृहामधून नंदीकडे पाहताना मंदिराच्या अनेक खांबांपैकी एकाही खांबाचा अडसर मध्ये येत नाही. जितकं कौतुक बांधकाम आणि शिल्पकलेचं  करावं, तितकाच वाखाणण्याजोगा या शिल्पकारांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विचारपूर्वक कार्यशैली. शिव आणि पार्वती या दोघांच्या मूर्तीसमोर नंदीच्या दिशेने पाय न येऊ देता साष्टांग नमस्कार कसा करावा याची योग्य पद्धत चक्क जमिनीवर कोरून ठेवली आहे. 




दर्शन मंडपाच्या एका बाजूला श्रीमधुसूदन म्हणजेच भगवान् विष्णूंची शंख - चक्रधारी मूर्ती स्थापन केलेली आहे. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे, असुर निर्दालन करण्यासाठी सज्ज अशी, संहार मुद्रेत चक्र धारण केलेली ही मूर्ती आहे. मंदिराचे आराध्य दैवत श्री शंकर असले तरी श्री मधुसूदन मंदिराच्या प्रमुख दैवतांपैकी एक मानले गेलेले आहेत. त्यामुळे हिंदू संस्कृतीमधल्या शैव, शाक्त्य आणि वैष्णव या तिन्ही प्रवाहांचा इतर कुठेही सहसा न दिसणारा सुंदर संगम या मंदिरात दिसतो. 




नृत्य मंडपाच्या सभोवती चालुक्य कालखंडातील अप्रतिम कारागिरी असलेले चार स्तंभ उभारलेले आहेत. एकाच वेळी उलट- सुलट अशी दोन प्रतिबिंबे दाखवणारे पाषाणी दर्पण स्तंभामध्ये उभारण्याची किमया साधत या अज्ञात शिल्पकारांनी प्रत्यक्ष मयासुरालाही बोटे तोंडात घालायला लावेल अशी प्रति- मयसभाच जणु इथे निर्माण केलेली आहे. तर, स्वर्ग , मृत्यु व पाताळ अशा तिन्ही लोकांचं चित्रण त्रिलोक मंडपामध्ये मोठ्या कौशल्याने केलेलं आहे.

मंदिराबाहेरील प्रांगणात आठ दिशांचे अधिपती स्थापन केलेले आहेत. इतर काही मंदिरांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या मूर्ती स्थापन केलेल्या पाहायला मिळतात. पण येथील खासियत म्हणजे, इथे मात्र या सगळ्या देवता सपत्नीक आणि सवाहन मधुकेश्वराचा पाहुणचार घ्यायला आलेल्या आहेत. याला अपवाद म्हणजे मंदिराच्या उजवीकडे स्थापन केला गेलेला ' अर्ध गणपती '.  शरीराचा केवळ अर्धा भाग असलेला हा गणपती ब्रह्मचारी अवस्थेतील आहे. असं म्हणतात की या मूर्तीचा राहिलेला अर्धा भाग रिद्धी- सिद्धी या दोन्ही पत्नींच्या वाट्याचा असून, हा वाराणसीमध्ये स्थापित आहे. या सर्व देवतांसमवेत निरनिराळे राजे - राजवाडे, संत - महंत यांनी भारतातील कित्येक तीर्थक्षेत्रांमधून तेथील देवतांच्या मूर्ती आणून येथे स्थापन केलेल्या दिसतात. 

मंदिर परिसरात फेरफटका मारता मारता तिन्हीसांजा कधी झाल्या कळलं सुद्धा नाही. उन्हातान्हात खेळून दमून घरी आलेल्या लेकराला जवळ घेऊन आईने हळुवार चेहऱ्यावरून हात फिरवावा, आणि क्षणार्धात तो शीण कुठल्याकुठे पळून जावा, तशी थंडगार झुळूक कुठूनशी मंदिरात शिरली होती. अंधार पडायला लागलेला असूनही तिथून पाय निघत नव्हता. एखाद्या जुन्या मित्राला बऱ्याच दिवसांनी भेटून यथेच्छ गप्पा मारल्यानंतर, "आता निघतो" असं म्हणत पुन्हा अर्धा तास दरवाज्यात रेंगाळत राहावं, तसं काहीसं झालं होतं. निरोपाची वेळ झाली, तरी अश्मात कोरली गेलेली, इतिहासातल्या एका समृध्द पर्वाची गाथा मनावरही कायमची कोरली गेली होती. 

म्हणतात ना, घणाचे घाव पडतात तेव्हाच मूर्ती साकारली जाते.  पण त्या घणाचे घाव घालणाऱ्या हातामध्ये दिव्यत्व असेल, तर काळया कातळातसुद्धा प्राण ओतले जातात, आणि मग दगडातही देव सापडतो!


















































Monday, 29 January 2024

माझा श्रीराम





सगुण स्वरूप जरी ते मूर्तीत कोरलेले
कोंदून राहिलेला जगतीं तमाम आहे
नाहीच मीही केवळ मूर्तीस पूजणारा
माझ्याहि प्रिय प्रभूचे सर्वत्र धाम आहे

ज्याच्या करांत दगडा देवत्व प्राप्त झाले
तो शिल्पकारही मज देवासमान आहे
त्याच्यापरीच येथे साऱ्या चराचरात
दिव्यत्व जे असे, त्या माझा प्रणाम आहे

वसला जरी प्रतीक-स्वरुपात जन्मग्रामी
रघुवंशनाथ थोर करुणानिधान आहे
जे जे असेल सुंदर, मांगल्यपूर्ण येथे
नित सर्व त्या ठिकाणीं माझा श्रीराम आहे

- माधुरी

Tuesday, 12 December 2023

असतो जर मी सफरचंद... (अनुवादित)


एक पडणारं सफरचंद- कुणाला गुरुत्वाकर्षण शोधून इतिहास घडवण्याची प्रेरणा देतं... तर तेच सफरचंद पाहून कुणी  छानशी बालकविता लिहितो. आणि कधी, ती बालकविताच प्रेरणा बनते, एका नवीन लिखाणाची..

'If I were an apple ' ही ज्योतिर्मयच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातली सुंदर कविता... कुण्या अनाम कवीने लिहिलेली. या कवितेचा मी केलेला मराठी अनुवाद...


If I were an apple ...

If I were an apple
and grew on a tree
I think I'd drop down
on a nice boy like me.

I wouldn't stay there
giving nobody joy,
I'd fall down at once and
say "eat me my boy!"


                             -Unknown poet



असतो जर मी सफरचंद 

असतो जर मी सफरचंद, अन्
झाडावरती घडलो असतो,
मजसम एका गोड मुलाच्या
डोक्यावर मी पडलो असतो

कोणाला आनंद न देता,
काय मिळे मज तिथे राहुनी,
टपकन्  हातीं येऊन त्याच्या,
म्हणेन मजला टाक खाऊनी!


                      - माधुरी 

Monday, 6 November 2023

वाकळ

 कॉलेजमधले सोनेरी दिवस कसे भुर्रकन उडून जातात समजत सुद्धा नाही . सगळी पाखरे आपापल्या दिशेला निघून जातात... आपापल्या परीने नवीन नात्यांच्या रेशीमगाठी बांधून आयुष्य सजवतात...मात्र, दूर कुठेतरी  त्या जुन्या घरट्यात वाट पाहत असते, कित्येक वर्षांपूर्वी जोडलेल्या निखळ मैत्रीच्या धाग्यांनी शिवलेली , जुनीपुराणी पण मायेची ऊब देणारी, एक 'वाकळ'!




वाकळ


पंखांमध्ये बळ घेवोनी


कवेत घेऊन आठवणी


घरटे सोडुन जाई पाखरा


जिथे तुझे दाणा - पाणी



घेई भरारी दूर नभीं तू


तुला खुणावी क्षितिज नवे


आयुष्याचा विणण्या शेला


नवीन रेशिमबंध हवे



अंगी लेऊन वस्त्र भरजरी


विसरू नको घरट्यामधली


उबदार परी जुनीपुराणी


वाकळ ती अंथरलेली 



बनली ना ती जरी बापडी


तलम रेशमी ताग्यांनी 


निगुतीने शिवली मैत्रीच्या


प्रेमळ कच्च्या धाग्यांनी



घरट्याची मग हाक ऐकुनी


परतून येई कधी घरी


जीर्ण काहीशी वाकळ तरीही


पांघरून बघ कधीतरी



येताना परि आण सोबती


जुन्या आठवांचे तागे


मोरपिशी अलवार क्षणांचे


थोडेसे रंगीत धागे



गतकाळातील न मारलेल्या


गप्पा घेऊन ये थोड्या


आणि आपुले वय विसराया


काही घेऊन ये खोड्या



जवळ घेऊनी तिजला थोडे


बारकाईने मग पाही


सोबतचे सामान घेऊनी


दोर उसवले शिव काही



अंगी रोज तू खुशाल मिरवी


वस्त्र तुझे ते जरतारी


कधीतरी घरट्यात येऊनी


वाकळीतही रंग भरी


             - माधुरी


Quilt..


With strong wings

and memories lovely

let go the nest, birdie,

skies are calling.


fly for the blue skies,

chase the horizons

weave your life

own and anew.


drape in robes of

success and prosperity,

but don't you forget

the quilt, of home.


it may be worn out,

perhaps lost sheen,

made of love and friendship

it's always been.


Then heed often 

the calls of home

and return, longingly

to the quilt, of home.


bring home some strains

and memories of your travails,

moments of weakness,

and your victories on them.


bring along some stories

that you have told no one

and some mischief

to forget your age.


hold your quilt close

and stories you wove in it,

repair it here and there

with some new stories.


flaunt exquisite robes

while you walk in public,

but when you are home

your quilt holds you quiet.


-Shreyas Desai











Friday, 28 July 2023

जगणे... (अनुवाद)

 'If I can stop one heart frombreaking' या एमिली डिकिंसन या कवयित्रीच्या कवितेचा भावानुवाद..




If I can stop one heart from breaking,

I shall not live in vain;

If I can ease one life the aching,

Or cool one pain,

Or help one fainting robin

Unto his nest again,

I shall not live in vain.


                                               - Emily Dickinson


अनुवाद:

एक जरी मी कधी कोवळे 
तुटलेले ते हृदय सांधले 
पुन्हा नव्याने मना मनाचे
विस्कटलेले बंध बांधले

सुलभ - सुकर मी बनवू शकलो
एकाचाही मार्ग कधी जर
एकाच्याही जखमेवरती
मारू शकलो कधी मी फुंकर 

कामी आलो एकदा जरी
तुटलेले घरटे बांधाया
तरी कधीही वदेन ना मी
जगणे माझे गेले वाया
         
              - माधुरी





Monday, 12 June 2023

एका शनिवारी... (अनुवादित)

 Dave Crawley यांची ही अतिशय गोड कविता वाचनात आली. या कवितेचा मी केलेला मुक्त अनुवाद...


Saw my teacher on a Saturday!

I can’t believe it’s true!

I saw her buying groceries,

like normal people do!


She reached for bread and turned around,

and then she caught my eye.

She gave a smile and said, “Hello.”

I thought that I would die!


“Oh, hi…hello, Miss Appleton,”

I mumbled like a fool.

I guess I thought that teacher types

spend all their time at school.


To make the situation worse,

my mom was at my side.

So many rows of jars and cans.

So little room to hide.


Oh please, I thought, don’t tell my mom

what I did yesterday!

I closed my eyes and held my breath

and hoped she’d go away.


Some people think it’s fine to let

our teachers walk about.

But when it comes to Saturdays,

they shouldn’t let them out!


- Dave Crawley



अनुवाद: एका शनिवारी...


शाळेमधल्या बाईंना मी

पाहियले एका शनिवारी

तुमच्या - आमुच्यापरीच त्याही

दिसल्या जाताना बाजारीं


वाण्याच्याच दुकानीं त्यांची 

माझ्यावरती दृष्टी पडली

हसून त्या मग बोलू लागतां

माझी घाबरगुंडी उडली


वेंधळ्यापरी भांबावून मी

नमस्कार बाईंना केला

समजत होतों बाई जाती

सुट्टीमध्येही शाळेला


आईही मजसोबत होती,

दुष्काळीं तेरावा महिना

इवल्याश्या त्या जागेमध्ये

कुठे लपावे काहीं कळेना


"राम! राम!" म्हटले मी, "बाई

जाऊ देत येथुनी लवकर"

खोडी कालच्या वर्गामधली

आईला माझ्या कळली तर?


लाभ बाईंच्या सन्निध्याचा

केवळ शाळेमध्येच व्हावा

सुट्टीच्या दिवशीं परि त्यांना

घरीच त्यांच्या कोंडून ठेवा!


- माधुरी

Tuesday, 6 June 2023

हाक...

 





" देहाला इतके कष्ट देऊन काय साध्य करणार आहेस?" देव तिब्बा चा ट्रेक करायचा ठरल्यानंतर मित्र मला विचारत होता. मी मात्र गप्पच! खरं सांगायचं तर या प्रश्नाचं नेमकं उत्तर माझ्याकडे तरी कुठे होतं?

गुढग्याच्या दुखापतीतून बाहेर पडल्यानंतर, खरं तर नवरोबाच्या आग्रहास्तव ट्रेक करायचा ठरवला. " तुझाच आत्मविश्वास वाढेल" हे त्याचं मत. नेहमीच्या त्याच त्या रूटीन मधून मलाही थोडा विरंगुळा हवाच होता! थोड्याफार शारिरिक आणि मानसिक तयारीच्या जोरावर उडी घेतली खरी, पण पुढचा प्रवास म्हणजे माझ्यासाठी दिव्यच होतं!

पण जसजसा हा प्रवास उलगडत गेला, तसतसं हिमालयाचं एकेक निराळंच, कधीही न पाहिलेलं रूप समोर येऊ लागलं. हिमालयाला महादेवाचं निवासस्थान का मानलं गेलं असेल? का बरं आपल्या ऋषीमुनींना युगानुयुगांपासून या हिमशिखरांची भुरळ पडली असेल? या प्रश्नांच्या गाठी हळूहळू उकलायला लागल्या होत्या. इथे काहीतरी वेगळं, भव्यदिव्य... काहीतरी larger than life होतं नक्कीच! आणि सभोवताली होता, कणाकणात  'त्याच्या ' अस्तित्वाची पावलोपावली जाणीव करून देणारा उत्तुंग हिमालय!

महादेवाच्या कर्पूरगौर वर्णाशी साधर्म्य साधणाऱ्या बर्फाच्छादित पर्वतरांगा... जटेमधील गंगेच्या निर्मळ पाण्यासारखे खळाळते जलस्त्रोत अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या. क्वचित् प्रसंगी त्याच्याच कपाळामधल्या अग्नीसारखा दाहक भासणारा प्रखर सूर्य! या विलक्षण प्रवासात ज्याच्या असंख्य छटांचं अगदी जवळून दर्शन घडलं तो- कधी त्या सांब- सदाशिवासारखा शांत आणि नितांतसुंदर भासणारा, तर कधी त्याच्याप्रमाणेच रौद्रभीषण अवतार धारण करणारा- हिमालय!

प्रवासात अडचणीही अनेक आल्या. पण त्यांच्याशी दोन हात करण्याचे बळ देणारी, प्रसंगी मदतीचे हात उभे करणारी प्रेरक शक्तीही बहुदा त्याचीच असावी! 

ऊन - पाऊस - कडाक्याची थंडी असल्या वातावरणात, दिवसाला चार पाच तास चालण्याचे कष्ट घेऊन मला काय मिळालं, याचं उत्तर आता मात्र मला सापडलंय! माझ्या त्या प्रिय मित्राला भेटल्यावर ठामपणे सांगू शकेन - "हिमालयातल्या प्रत्येक कणात वास्तव्य करणाऱ्या त्या महादेवाला मी भेटून आलेय.. आणि त्याला भेटायचं, तर ही तपश्चर्या करणं भाग होतं!"

यापूर्वीच्या प्रवासातसुद्धा हिमालय पाहिला होता. यावेळी मात्र, तो खऱ्या अर्थाने अनुभवलाय! या भेटीत त्याच्याशी काही गहिरे ऋणानुबंध जुळलेत म्हणाना... यापुढे मात्र, जेव्हा जेव्हा ' त्याची ' हाक येईल, तेव्हा तेव्हा त्याची भेट घेणं क्रमप्राप्त आहे!