Tuesday, 6 June 2023

हाक...

 





" देहाला इतके कष्ट देऊन काय साध्य करणार आहेस?" देव तिब्बा चा ट्रेक करायचा ठरल्यानंतर मित्र मला विचारत होता. मी मात्र गप्पच! खरं सांगायचं तर या प्रश्नाचं नेमकं उत्तर माझ्याकडे तरी कुठे होतं?

गुढग्याच्या दुखापतीतून बाहेर पडल्यानंतर, खरं तर नवरोबाच्या आग्रहास्तव ट्रेक करायचा ठरवला. " तुझाच आत्मविश्वास वाढेल" हे त्याचं मत. नेहमीच्या त्याच त्या रूटीन मधून मलाही थोडा विरंगुळा हवाच होता! थोड्याफार शारिरिक आणि मानसिक तयारीच्या जोरावर उडी घेतली खरी, पण पुढचा प्रवास म्हणजे माझ्यासाठी दिव्यच होतं!

पण जसजसा हा प्रवास उलगडत गेला, तसतसं हिमालयाचं एकेक निराळंच, कधीही न पाहिलेलं रूप समोर येऊ लागलं. हिमालयाला महादेवाचं निवासस्थान का मानलं गेलं असेल? का बरं आपल्या ऋषीमुनींना युगानुयुगांपासून या हिमशिखरांची भुरळ पडली असेल? या प्रश्नांच्या गाठी हळूहळू उकलायला लागल्या होत्या. इथे काहीतरी वेगळं, भव्यदिव्य... काहीतरी larger than life होतं नक्कीच! आणि सभोवताली होता, कणाकणात  'त्याच्या ' अस्तित्वाची पावलोपावली जाणीव करून देणारा उत्तुंग हिमालय!

महादेवाच्या कर्पूरगौर वर्णाशी साधर्म्य साधणाऱ्या बर्फाच्छादित पर्वतरांगा... जटेमधील गंगेच्या निर्मळ पाण्यासारखे खळाळते जलस्त्रोत अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या. क्वचित् प्रसंगी त्याच्याच कपाळामधल्या अग्नीसारखा दाहक भासणारा प्रखर सूर्य! या विलक्षण प्रवासात ज्याच्या असंख्य छटांचं अगदी जवळून दर्शन घडलं तो- कधी त्या सांब- सदाशिवासारखा शांत आणि नितांतसुंदर भासणारा, तर कधी त्याच्याप्रमाणेच रौद्रभीषण अवतार धारण करणारा- हिमालय!

प्रवासात अडचणीही अनेक आल्या. पण त्यांच्याशी दोन हात करण्याचे बळ देणारी, प्रसंगी मदतीचे हात उभे करणारी प्रेरक शक्तीही बहुदा त्याचीच असावी! 

ऊन - पाऊस - कडाक्याची थंडी असल्या वातावरणात, दिवसाला चार पाच तास चालण्याचे कष्ट घेऊन मला काय मिळालं, याचं उत्तर आता मात्र मला सापडलंय! माझ्या त्या प्रिय मित्राला भेटल्यावर ठामपणे सांगू शकेन - "हिमालयातल्या प्रत्येक कणात वास्तव्य करणाऱ्या त्या महादेवाला मी भेटून आलेय.. आणि त्याला भेटायचं, तर ही तपश्चर्या करणं भाग होतं!"

यापूर्वीच्या प्रवासातसुद्धा हिमालय पाहिला होता. यावेळी मात्र, तो खऱ्या अर्थाने अनुभवलाय! या भेटीत त्याच्याशी काही गहिरे ऋणानुबंध जुळलेत म्हणाना... यापुढे मात्र, जेव्हा जेव्हा ' त्याची ' हाक येईल, तेव्हा तेव्हा त्याची भेट घेणं क्रमप्राप्त आहे!

23 comments:

  1. अतिशय सोप्या शब्दात समर्पक वर्णन.. शेवट अप्रतिम. जवळपास प्रत्येक गिर्यारोहकाला आणि हौशी गिर्यारोहकांनाही लागू पडणारा.

    ReplyDelete
  2. छान लिहिलं आहे. आणि हो. हिमालयाचे वर्णन ( अक्राळ-विक्राळ तरीही लोभस आणि सुंदर !) तंतोतंत लागु होईल तो एकच देव, ऋषी,योगी,तपस्वी म्हणजे फक्त महादेवच !

    ReplyDelete
  3. I echo you.very nice

    ReplyDelete
  4. अप्रतिम वर्णन. वाचून मलाही लगेच निघावंस वाटतंय. खूपच छान लिखाणाची शैली आहे तुझी. 👌

    ReplyDelete
  5. Khup Sundarlihalayas Madhuri 💗

    ReplyDelete
  6. ऊन - पाऊस - कडाक्याची थंडी असल्या वातावरणात, दिवसाला चार पाच तास चालण्याचे कष्ट घेऊन मला काय मिळालं, याचं उत्तर आता मात्र मला सापडलंय! माझ्या त्या प्रिय मित्राला भेटल्यावर ठामपणे सांगू शकेन - "हिमालयातल्या प्रत्येक कणात वास्तव्य करणाऱ्या त्या महादेवाला मी भेटून आलेय.. आणि त्याला भेटायचं, तर ही तपश्चर्या करणं भाग होतं!"

    यात सगळं काही आलं. अप्रतिम केवळ अप्रतिम.

    आपल्या अस्तित्वाची जशी आपल्याला जाणीव असते, तशीच परमेश्‍वराच्या अस्तित्वाची जाणीव होणे, याला भाग्य लागतं. निर्वाणाष्टकातील प्रत्येक श्‍लोकाचे तीन चरण आपल्याला पटतात व तेच खरे आहे, असे प्रामाणिकपणे वाटते. पण, चौथा चरण पटत नाही. तुला तो अनुभवता आला. शिव तत्त्व आहे, माझ्यासह सगळीकडे आहे, याची जाणीव फार थोड्यांना होते, तू त्यातलीच एक आहेस.

    ग्रेट.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! जाणीव तिथल्या अनुभवातून आली.. बाकी जाणीव करून देणारा तोच.. आणि भावनांना नेमके शब्द सुचवणारा सुद्धा तोच! मी फक्त एक माध्यम आहे!

      Delete

  7. खूप छान

    ReplyDelete
  8. एक प्रतिभावान साहित्यिक ज्या काव्यमय भाषेत निसर्गाचे वर्णन करील आणि पौराणिक संदर्भांसह आध्यात्मिकतेची जोड देत ईश्वरीय अनुभूतींची साक्ष देईल त्या गर्भश्रीमंत अलंकारिक भाषेतील सहजसुंदर वर्णन वाचून खूप आनंद झाला

    ReplyDelete
  9. वेगळी मजा म्हणून करायला जायचं आणि काही उदात्त हाताला लागायचं म्हणजे युरेकाच!
    आपल्याला आपण क:पदार्थ असण्याची (we are but a tiny spec in the universe) जाणीव करून देणारा निसर्ग हिमालयात भेटतो. आपल्या काळज्या, अभिमान सारं सारं गळून पडतं अशा ठिकाणी. त्यालाच तू महादेव भेटल्याची उपमा दिली आहेस ती अगदी समर्पक. छान मांडलंस.

    ReplyDelete
    Replies
    1. Sorry repeated the comment both as anonymous and with my name. Unable to delete it now.

      Delete
  10. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  11. वेगळी मजा म्हणून करायला जायचं आणि का.ही उदात्त हाताला लागायचं म्हणजे युरेकाच!
    आपल्याला आपण क:पदार्थ असण्याची (we are but a tiny spec in the universe) जाणीव करून देणारा निसर्ग हिमालयात भेटतो. आपल्या काळज्या, अभिमान सारं सारं गळून पडतं अशा ठिकाणी. त्यालाच तू महादेव भेटल्याची उपमा दिली आहेस ती अगदी समर्पक. छान मांडलंस

    ReplyDelete