Tuesday, 24 January 2023

एकमेकां सहाय्य करू..

 



नुकताच पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात दुर्गारोहण संबंधी काहीं शॉर्ट फिल्म पाहण्याचा योग आला. तसे निवडलेले सर्वच चित्रपट अतिशय उत्कृष्ट आणि थरारक! पण माझं लक्ष वेधून घेतलं ते मात्र, " फ्रॉम माय विंडो" या लघुपटानं.

खरं तर ही, मलीसा सिम्पसन नावाच्या कॉलोराडो मधल्या एका साध्यासुध्या, स्वप्नाळू मुलीची गोष्ट. दिसायला चारचौघींसारखीच , पण कित्येक वर्षे "सेरेब्रल पाल्सी" या , शरीराचे बहुतेक स्नायू निकामी करणाऱ्या मेंदूच्या दुर्धर आजाराने ग्रासलेली ही मुलगी! असाध्य रोगामुळे झालेलं वाचा आणि मेंदूचं कायमचं नुकसान, त्यामुळे सहन कराव्या लागणाऱ्या शारीरिक आणि भावनिक परिणामांमुळे कायमची परावलंबी झालेली. डोळ्यात मात्र , समोरच्या इवल्याश्या खिडकीतून दिसणाऱ्या कॉलोराडोमधील सर्वांत उंच शिखराला गवसणी घालण्याचे उत्तुंग स्वप्न बाळगणारी! सतत व्हीलचेअरला खिळून राहिल्यामुळे काहीश्या एकलकोंड्या, नीरस झालेल्या तिच्या आयुष्याला कलाटणी दिली ती एरिक वेहेनमेयर नावाच्या एका गिर्यारोहकाने. एवरेस्ट शिखरावर विजयपताका फडकवण्याची, भल्याभल्यांना अवघड वाटणारी कामगिरी, अंध असूनसुद्धा प्रत्यक्ष करून दाखवणारा हा असामान्य अवलिया.

शारीरिक अडचणी, व्यंग असलेल्या माणसांना बऱ्याचदा आपल्या समाजात स्थान व अपेक्षित आदर मिळत नाही. हीच टोचणी मलिसाच्या मनालाही लागून राहिली होती. सर्वसामान्य लोकांमध्ये तिचे असे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी एरिकने काहीं खास माणसे हाताशी घेऊन एक टीम तयार केली. या टीमला खास म्हणण्याचं कारणही तसंच होतं. या टीमचा भाग असणारा प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्यातरी शारीरिक अडचणींना तोंड देत होता. तीन गिर्यारोहक तर चक्क पूर्णपणे अंध होते!

पडत, अडखळत, एकमेकांशी ताळमेळ साधत, एक अतिशय वेडं धाडस करण्यासाठी ही आगळीवेगळी टीम कंबर कसून कामाला लागली. यासाठी मलिसाची शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तयारी करून घेणंही गरजेचं होतं. कित्येक दिवस अथक परिश्रम घेत, हातांनी गती देत चालवू शकणाऱ्या तिच्या खास व्हीलचेअरवरून, दोर घेऊन ती ओढणाऱ्या तिच्या टीमच्या मदतीने या तरुणीने अखेर रॉकी माउंटन शिखर काबीज केले.

त्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल बोलताना काढलेले एरिक वेहेनमेयरचे उद्गार मनाला भावणारे आहेत. एरिक म्हणतो, " आज काल बऱ्याच सेल्फ हेल्प पुस्तकांमधून- अडचणी या केवळ मानण्यावर असतात - वगैरेसारखीं अव्यवहारिक विधानं केली जातात. ही निव्वळ खोटी आहेत. अडचणी असतातच, अगदीं खऱ्याखुऱ्या! शारीरिक अपंगत्व असणाऱ्या माणसांसाठी तर त्या काळया दगडावरच्या रेघेइतक्या अटळ असतात. प्रत्येक वेळेस आपण एकट्यानेच त्यांच्याशी दोन हात करू शकतोच असे नाही. एखादी कामगिरी, तुम्ही एकट्याने, कुणाच्याही मदतीशिवाय करू शकतां की नाही, हा मुद्दा तितकासा महत्त्वाचा नाही. महत्त्वाची आहे ती, तुमच्यासमोर येणाऱ्या अडचणींना सामोरं जात त्यांच्यावर मात करण्याची तुमची इच्छा आणि मानसिक तयारी! ती जर असेल, तर आजूबाजूच्या माणसांचा मदतीचा हात स्वीकारून पुढे जाण्यात कसलाही कमीपणा नाही!"

आपल्या दैनंदिन आयुष्यात मात्र, आपल्याला या घटनेच्या नेमकं उलट चित्र दिसतं. अभ्यास असो वा खेळ, किंवा नोकरी - व्यवसायामधील काम असो, ही कामे करण्याची एखाद्याची बौद्धिक कुवत आणि शारिरिक क्षमता याविषयीचे काही ठराविक मापदंड आपण ठरवून ठेवलेले असतात. अगदी लहानपणापसूनच हे मापदंड आपल्या मनावर इतके बिंबवले जातात, की त्यापलीकडे जाऊन, एखाद्या विषयातली एखाद्या माणसाची गती, आकलनशक्ती ही वेगळी असू शकते, हा विचारच आपल्या डोक्याला शिवत नाही. त्यामुळे, त्या ठराविक मापदंडांनुसार एखाद्याची कामगिरी काहीशी कमी झाली, तर त्या व्यक्तीला त्या कामात काहीं गती नाही, हे आपण ठरवून मोकळे होतो, इतकंच काय, त्या व्यक्तीला कमी लेखू लागतो.

म्हणजे बघा हं, अगदीं मूल शाळेत जाऊ लागल्यापासून, बालवर्गात असताना त्याला शब्द लिहीता- वाचता आले पाहिजेत, अक्षर सुवाच्य आणि सुरेख असलेच पाहिजे, पहिलीत जाईपर्यंत त्याला वाक्यें लिहीता आली पाहिजेत, बेरीज वजाबाकी आलीच पाहिजे,असले ठोकताळे मांडून ठेवले जातात.. मांडले काय, त्या मुलांच्या माथींच मारले जातात. मग, एखाद्या मुलाला हे नसेल जमत, तर त्याला सामावून घेत, त्याची मदत करून, त्याच्या गतीनुसार ह्या गोष्टी शिकवण्याची मुभा दुर्दैवाने आपल्या व्यवस्थेमध्ये नाही. मग, मित्रमंडळीच नाही, तर बऱ्याचदा शिक्षकांकडून सुद्धा त्या बिचाऱ्या मुलाच्या वाट्याला टिंगटवाळी आणि उपेक्षाच येते! 

बरं, आपल्याकडच्या पालकांनीसुद्धा, आपल्या मुलानं पुढे जायचं, तर ते बाकी मुलांना मागे टाकूनच गेलं पाहिजे, असा काहीसा ग्रह करून घेतलेला आहे. स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून, जमेल तशी इतरांना मदत करत स्वतःच्या कामगिरीचा आलेख उंचावत नेणं, म्हणजे यश प्राप्त करणं नाही असू शकत का? त्यासाठी इतर मुलांना मागे टाकून पहिला नंबर आणण्याचा अट्टाहास का बरं असावा? मग यामधून जन्म घेते, ती एकमेकांचे पाय ओढून त्यांना खाली खेचणारी, गरज भासल्यास इतरांचा गळा चिरण्यास सुध्दा भाग पाडणारी जीवघेणी स्पर्धा!

जी गत अभ्यासाची, तीच गत खेळाचीही! खेळ म्हटलं की माझ्या लहानपणी घडलेला एक प्रसंग मला अजूनही लख्ख आठवतो. लहानपणी शाळेत पहिला नंबर मी कधीही सोडला नाही. एक स्कॉलर विद्यार्थिनी म्हणूनच माझी ओळख झालेली. याउलट, खेळात मात्र माझी काही गती नव्हती. मैदानी खेळात माझा विशेष सहभाग नसायचा. म्हणजे खेळायची इच्छाच नव्हती, अशातला भाग नाही, पण इतरांच्या तुलनेत, या बाबतीत माझी शक्ती कमी पडायची. पी. टी. च्या तासाला जेव्हा मुलं खेळायला बाहेर पडत, तेव्हादेखील संघ निवडताना सर्वात शेवटी माझी निवड होत असे. त्यामुळे खेळाच्या बाबतीत माझा आत्मविश्वास काहीसा डळमळीतच होता. 

तरीसुद्धा, एक तरी मैदानी खेळ मला उत्तमरित्या खेळतां यावा अशी खूप मनापासून इच्छा होती. अशांतच, एका दिवाळीच्या सुट्टीत शाळेच्या तर्फे सर्व इच्छुक मुलांना बास्केटबॉलचं प्रशिक्षण दिलं जाईल अशी आम्हाला सूचना मिळाली. मीही उत्साहाने माझं नाव नोंदवून टाकलं. मी पाचवी - सहावीत असेन तेव्हा. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशीं पाहिलं, तर नावनोंदणी केलेली बाकी सगळी मुलं माझ्यापेक्षा बरीच मोठी होती. कदाचित बरीच मुलं यापूर्वी बास्केटबॉल खेळलेलीही होती. माझ्या अपेक्षेप्रमाणे, सुरवातीला बास्केटबॉल बद्दल माहिती, किंवा खेळाचे कुठलेही नियम न समजावून सांगता, प्रशिक्षकांनी थेट बॉल माझ्या हातात दिला, आणि नेम धरून बास्केट मध्ये टाकायला सांगितला. आधीच नाजुक शरीरयष्टी, त्यात अचानक असं काही सांगितल्यामुळे अगदीच भांबावून जाऊन कसातरी टाकलेला तो बॉल बास्केटच्या जवळपाससुद्धा पोहोचला नाही. माझी ती फजिती पाहून इतर मुलंच काय, ते सर देखील जोरात हसले. मी मात्र त्या दिवशी निराश मनाने घरी परतले. या घटनेनंतर मात्र, स्वतःहून एखाद्या मैदानी खेळात भाग घेण्याचं धाडस मी बरीच वर्षे केलं नाही!

त्या दिवशीं त्या मुलांचं काही चुकलं, असं तरी कसं म्हणता येईल? मुलंच ती.. आपल्या आजूबाजूच्या माणसांचं अनुकरण करतच वागायला शिकतात. पण त्या दिवशीं, त्या मुलांना प्रेमाने समजावून, मला विश्वासात घेत मार्गदर्शन करून खेळात सहभागी करुन घेण्याची नैतिक जबाबदारी त्या प्रशिक्षकांची नव्हती का? ती जबाबदारी त्यांनी घेतली असती, तरीही, मी काही फार उत्तम बास्केटबॉलपटू वगैरे झाले असते अशातला भाग नाही. पण त्यावेळी झालेलं मानसिक खच्चीकरण हे , पुढील कित्येक वर्षे मैदानी खेळ न खेळल्यामुळे सुरु झालेल्या आरोग्याच्या कुरबुरी आणि आत्मविश्वासाच्या अभावामुळे आलेल्या नैराश्याचं कारण ठरलं.

पुढे बऱ्याच वर्षांनंतर, पोहायला शिकताना दीड- दोन महिने सलग प्रयत्न करूनही काही येईना. पुन्हा एकदा, तलावामध्ये पोहणाऱ्या लोकांच्या कुत्सित नजरा, टोमणे चुकवण्यासाठी सगळं सोडून देण्याच्या विचारात होते. या खेपेस मात्र, "त्यांच्याकडे लक्ष नको देऊस, काहीं दिवसांत या सगळ्यांपेक्षा उत्कृष्ट पोहशील"असं म्हणत माझ्यावर विश्वास दाखवून मला धीर देणाऱ्या, माझ्या गतीनुसार मला शिकवून तयार करणाऱ्या माझ्या प्रशिक्षकांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत!

याच पार्श्वभूमीवर, मागे कधीतरी व्हायरल झालेला एक  व्हिडिओ आठवतो. बहुतेक तो व्हिडिओ जपानमधला असावा. तायक्वांडो शिकवणाऱ्या एका वर्गातला तो प्रसंग होता. त्या व्हिडिओमध्ये एक चार पाच वर्षांचा छोटासा मुलगा पांढरा पट्टा ( white belt ) मिळवण्यासाठी परीक्षा देत होता. ती परीक्षा म्हणजे, त्याच्या समोर असलेली एक वीट पायाने तोडल्याशिवाय त्याला तो पांढरा बेल्ट मिळणार नव्हता. समोरच त्याचे प्रशिक्षक उभे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सात- आठ वेळा प्रयत्न करून सुद्धा ती वीट तोडता न आल्यामुळे, ते इवलंसं पिल्लू बिचारं रडकुंडीला आलं! त्यानंतर जे घडलं, तो मात्र माझ्यासाठी एक सुखद धक्का होता! त्या वर्गातली एकूण एक सर्व मुले कंपू करून त्याच्याभोवती जमली, आणि त्याला चिअर करून त्याचा उत्साह वाढवू लागली. अखेर त्या मुलाने ती वीट तोडून परीक्षा पास झाल्याचा आनंद त्या सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर अक्षरशः ओसंडून वाहत होता! आपल्या सहकाऱ्यांच्या कमतरतेवर बोट ठेऊन त्यांचा उपहास करण्यापेक्षा त्यांच्या पाठीशी उभे राहत त्यांचा विश्वास वाढवण्याचे सामंजस्य आणि खिलाडूवृत्ती दाखवणाऱ्या त्या मुलांमध्ये असे संस्कार रुजवणाऱ्या त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

"आजची हार मनाला लावून घेऊ नकोस गड्या! तुलाही जमेल हळू हळू सरावाने!" किंवा, "काहीं मदत लागली तर जरूर सांग, मी आहे पाठीशी"  ही वाक्यें ऐकायला आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर प्रत्येकाचेच कान असुसलेले असतात. ती भावनिक गरज ओळखून सर्वांना सोबत घेत पुढे जाणाऱ्या समावेशक वृत्तीची आणि परिपक्वतेची आपल्या समाजाला आवश्यकता आहे. हे जेव्हा घडेल, तेव्हा "एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ" हे तुकोबांचे शब्द केवळ अभंगाच्या ओळी न राहतां जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन बनतील. यामुळे सर्वच लोकांच्या अडचणी सुटतील, प्रश्न नाहीसे होतील असे नाही, पण हा दृष्टिकोन कित्येक लोकांना त्या अडचणी पार करत आयुष्य आनंदाने जगण्याची एक नवीन ऊर्जा, एक नवीन उत्साह देत राहील, हे मात्र नक्की!

Thursday, 17 November 2022

आनंदयात्री





प्रकटली एके दिनीं जर मजसमोरी शारदा

मोकळी करिते म्हणाली सर्व माझी संपदा

जे हवें तें माग, ना संकोच कसला ठेवतां

हा तुझ्या पदरात मी करितें पुरा खजिना रिता 


सांगेन तिजला, भगवती गे, हंसवाहिनि वरप्रदे,

विनती इतुकी ऐक, थोडें हातचें राखून दे

जाणते, तव वैभावासी पार तो नाही जरी,

शब्द साठ्यांतून त्या, दे वेचुनी मोत्यांपरी


चांगलें जगतीं असे, तैसे असे येथें बुरें

हंसपक्षी दुग्ध आणिक जल निराळे जो करे

त्यापरी वेचून साऱ्या वाईटातुन चांगलें

गोड गाथा सांगणारे शब्द केवळ दे भले


काव्य मम कोणा करो ना त्रस्त अन् अस्वस्थ ही

या लेखणीने स्वप्न कोणाचें न हो उध्वस्त ही

नैराश्य - दुःखें गांजला कोणी किती असला जरी

शब्द माझे ओतुं दे नव आस जगण्याची उरीं


मानिलें संसार हा तापत्रयांचा वारसा

काव्य माझें ना बनो कधीही तयांचा आरसा

लेखणी उत्साहची उधळीत राहो नेहमी

हर्ष देईन या जगीं आनंदयात्री बनुन मी


- माधुरी

Sunday, 21 August 2022

गिरिधर - गोपाळ





एका हातीं धरुनी बासरी,

मंद - मंद स्मितहास्य करी

दुज्या हातींच्या करांगुळीने

गोवर्धन लीलया धरी


गोपसख्यांच्या संगे गाठी

यमुनेचा तो सुंदर काठ

गोपस्त्रियांची वाट अडवुनी

दह्यादुधाचे फोडी माठ


गोपस्त्रियांनी यशोदेकडे

करितां लटकी कागाळी

दही - दुध - लोणी मी न चोरिले

म्हणत चोर अश्रू ढाळी


म्हणे यशोदा, तुज रे कान्हा

सोडीन मी नच सुखासुखीं

समक्ष सर्वांच्या पाहीन मी,

काय लपविले तुझ्या मुखीं


इवलेंसें ते वदन आपुले

उघडुनी दावी नंदकुमार

ब्रह्मांडाचे दर्शन घडवी

परमेशाचा तो अवतार


शक्तिमान सर्वेश्वर जो, 

अरि- दुष्टांचा संहार करी

गोकुळात तो रास रचोनी

गवळणींसवें फेर धरी


तिन्ही जगाचा स्वामी झाला

नंद यशोदेघरचा बाळ

विश्वाचा प्रतिपालक बनला

भक्तांसाठी ब्रिज- गोपाळ

Sunday, 15 May 2022

मेघांच्या माहेरा... भाग ४ (अंतिम)

मेघालयमधील चौथा आणि शेवटचा दिवस, खरं तर शिलाँगसाठी राखीव ठेवलेला होता. परंतु, शहरी भागामधील वास्तव्यात  पाहतां आणि अनुभवतां येणाऱ्या  त्याच त्या गोष्टी करण्यापेक्षा, त्यापलीकडे जाऊन वेगळं काहीतरी पाहावं, अनुभवावं अशी सुप्त इच्छा मनात होतीच! आसपासच्या लोकांकडून मात्र, येथील चर्च, बाजार, संग्रहालय ह्यापलीकडे काही माहिती मिळेना. शेवटीं बरीच खोदून खोदून चौकशी केल्यानंतर काहीश्या अनिच्छेनेच ड्रायव्हर म्हणाला, " इथून साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर मौफालॉंगचं पवित्र जंगल (sacred forest) आहे. तिथं आत जाता येतं खरं, पण तुम्हाला खरोखरच जायचं आहे का? बरंच चालावं लागेल!" "बरंच म्हणजे किती?" मी पृच्छा केली. "साधारण पाचेक किलोमीटरचा trail आहे" तो म्हणाला. साधं पाच किलोमीटर चालण्याचा इतका बाऊ करण्याला, हसावं की रडावं हेच मला कळेना! "काही हरकत नाही, आपण जंगल पहायलाच जाऊ"असे म्हणतांच, अविश्वासाचा एक कटाक्ष टाकून त्याने आम्हाला तिथे न्यायचे कबूल केले.


जंगलापर्यंत जाण्याचा तासाभराचा प्रवास अतिशय नेत्रसुखद! नेहमी पाठपुरावा करणाऱ्या ढगांची साथ आजही होतीच! आज मात्र, दूर कुठेतरी आकाशात असलेली गंधाची कुपी त्यांनी उघडली असावी! त्यातून सांडलेल्या अत्तराची मातीवर मनसोक्त बरसात करीत मनमोहक सुगंधाची मुक्त उधळण ते आज करीत होते.

आल्हाददायक वातावरणातच त्या रस्त्याने आम्हाला जंगलाच्या नजिकच असलेल्या विस्तीर्ण माळापाशी आणून सोडले. येथे जंगलामध्ये जाण्यासाठी परवानगी काढावी लागते. खासी जमातीसाठी पवित्र असलेल्या ह्या जंगलात पर्यटकांना एकट्याने प्रवेश करण्यास परवानगी नाही. ह्या ठिकाणीच जंगलाच्या सफरीसाठी मार्गदर्शक, अर्थात गाईड मिळतात. हे गाईडदेखील खासी जमातीचेच! 

"तुम्हाला पूर्ण सफर करायची आहे, की अर्धी?" तिथल्या माणसाने प्रश्न केला. "पूर्ण करू आम्ही!" मी उत्तरले. इथेही, काहीश्या अविश्वासानेच आमच्याकडे पाहत त्याने तिकीट दिले आणि एका माणसाला गाईड म्हणून आमच्यासोबत पिटाळले.

समोर पसरलेल्या माळावरून साधारण पाचशे मीटर चालत गेल्यावर आपण जंगलापाशी पोहोचतो. गंमत म्हणजे, पूर्णपणे नैसर्गिक असूनसुद्धा, ह्या जंगलाची हद्द अगदीं आखून दिलेली वाटते. त्यामुळेच की काय, प्रथमदर्शनीं हे जंगल, थेट हॅरी पॉटर मधल्या त्या निषिद्ध जंगलासारखे (forbidden forest), काहीसे गूढरम्य भासते!






"जंगलात शिरण्यापूर्वी तुम्हाला ह्या जागेची माहिती सांगतो" गाईड म्हणाला, "मौफालाँगचे हे जंगल खासी जमातीसाठी खूप पवित्र मानले जाते. ह्याचे कारण म्हणजे, खासी संस्कृतीप्रमाणे काही पूजाविधी आणि प्राण्यांचे बळी देण्याची प्रथा येथे पूर्वी चालत असे. आणि हो, आणखीन एक गोष्ट जंगलात आत जाण्यापूर्वी लक्षात ठेवा. ह्या पवित्र जंगलामधून कुणालाही काहीही नेण्याची परवानगी नाही. अगदी, एखादा दगड किंवा झाडाचे पान जरी इथून बाहेर नेलेत, तर ते तुमच्या स्वास्थ्यासाठी घातक ठरते असा येथील लोकांचा समज आहे." बोलत बोलत तो आम्हाला घेऊन त्या जंगलात शिरला.

ही माहिती ऐकून एव्हाना माझे कुतूहल जागे झाले होते. "हे बळी कशासाठी दिले जात? आता ही प्रथा चालू आहे की नाही?" मी त्याला प्रश्न केला. "मॅडम, त्याचं असं आहे. खासी लोकांच्या धारणेप्रमाणे मूर्तीमधल्या देवाला आम्ही मानीत नाही. मंदिरात जाऊन पूजाअर्चा, किंवा कर्मकांडही करीत नाही. हे जंगलच नाही, तर सर्वच जंगले, त्यामधली झाडेझुडपे, पक्षी, प्राणी, इतकेच काय, तर येथील जलसंपत्ती ह्या सगळ्यामध्ये ईश्वराचा वास आहे, अशी आमची श्रद्धा आहे. आणि म्हणूनच, ह्या श्रद्धेचे प्रतिक असलेले हे जंगल आम्ही पवित्र मानतो!" तो समरसून सांगत होता. "ह्या वनामध्ये असलेल्या वनदेवतेचीं दोन रूपे आहेत असा समज आहे. ह्या वनदेवतेच्या शुभ रूपाला ' लबासा' म्हणतात. हा बिबट्याचे रुप धारण करून येतो. येथील वनसंपदेचा हा संरक्षक आहे. वनदेवतेचे क्रुद्ध, अशुभ रुप मात्र एका सर्पाचे आहे! ह्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी वर्षातून एकदाच हे बळी दिले जायचे. आता मात्र ही प्रथा दर वर्षीं मौफालाँग गावाच्या रहिवासी भागात पार पाडली जाते. खासी जमातीच्या राजाकरवीं हे विधी पार पाडले जातात. विशेष म्हणजे, हा राजा येथील खासी जनतेमधूनच लोकशाही पद्धतीने निवडला जातो. पूर्वी जिथे हे बळी दिले जायचे, त्या जागी दगडी स्मृतिचिन्हें (monolith) आहेत, ती जाता जाता तुम्हाला दाखवेनच!" त्याने ग्वाही दिली.

त्याच्याशी गप्पा मारत आम्ही जंगलामधून जाणाऱ्या दगडी पायवाटेवरून चालत होतो. साधारण एकशे नव्वद एकर जमिनीवर पसरलेले हे जंगल तब्बल आठशे वर्षें जुने आहे. आजूबाजूला, सूर्यकिरणें सुद्धा आत शिरणार नाहीत, इतकी दाट झाडी, आणि थेट आकाशाला भिडणारे उंचच्या उंच वृक्ष! ह्या वृक्षांमध्ये सुमारें सहाशें वर्षें जुनीं रुद्राक्षाचीं विशाल झाडेंही दिसतात. जंगल अगदीं रंगीबेरंगी पानाफुलांनी  नखशिखांत नटलेले! मधूनच, एखाद्या सजवलेल्या लग्नघरामध्ये नव्या नवरीचे कुंकवाच्या पावलांचे ठसे उमटवेत, तसा, ह्रोडोडेंड्राॅनच्या लालचुटुक फुलांचा सडा पडलेला! जंगलामध्ये कोल्हे, विविध प्रकारच्या खारी, शेकरू असे प्राणी आणि पक्ष्यांच्या असंख्य प्रजाती आढळतात. हिंस्त्र श्वापदें नाहीतच!






ही दगडी पायवाट जंगलामध्ये काहीं अंतरापर्यंत घेऊन जाते. ह्या वाटेवरच, बळीच्या विधीची तयारी करण्याची जागा, तसेच बळी देताना केल्या जाणाऱ्या पूजेचे स्थान आहे. ह्या दोन्ही ठिकाणीं दगडी स्मृतिचिन्हें आहेत.  बळी देण्याच्या विधीपूर्वी सर्व हत्यारांना धार काढणे, इतर तयारी करणे ह्यासाठी एक विशिष्ट जागा आहे. एकदा ही सर्व तयारी झाली, की मग माघार नाही. तिथून पुढे ह्या तयारीमध्ये काही कमतरता आढळली तर वनदेवतेचा कोप होतो, असा समज आहे. पूजविधीच्या स्थानापाशीं ही पायवाट संपते. जंगलाची अर्धी सफर करणारे पर्यटक येथूनच मागे फिरतात.येथून पुढे कच्च्या वाटेने वाटचाल सुरू होते.







ह्या जागेभोवती आणि जंगलाभोवती फिरणाऱ्या अनेक दंतकथा इथे आणि आसपासच्या गावात प्रचलित आहेत. अशीच एक मान्यता म्हणजे, ह्या पवित्र वनामधून कोणतीही वस्तू बाहेर घेऊन जाऊ नये. तसें केल्यास तो वनदेवतेचा अपमान समजला जातो. असे करणारी व्यक्ती वनदेवतेच्या क्रोधास पात्र होऊन आजारी पडते, असे येथील लोक सांगतात. १९७० मध्ये येथून काही ओंडके बाहेर नेण्याचा भारतीय सैन्यदलाचा प्रयत्न, ट्रक जंगलामध्ये बंद पडल्यामुळे साफ फसला, अशीही एक आख्यायिका आहे. येथील खासी जमातीमधल्या पूर्वजांचे मृतात्मे ह्या जंगलामध्ये वास करून आहेत अशीही येथील लोकांची श्रद्धा आहे. 

खरं- खोटं माहीत नाही, पण कानोकानीं पसरलेल्या ह्या आख्यायिका आणि पिढ्यान् पिढ्या रुजलेल्या परंपरा येथील मानवाचे निसर्गाशी असलेले गहिरे बंध पुन्हा एकदा अधोरेखित करतात. ह्या धारणांमागचा हेतू येथील निसर्गसंपत्तीचे संरक्षण करणे हाच असावा!  माणूस बदलतो, धर्म बदलतो, तसतश्या आस्था आणि श्रद्धेच्या परिभाषादेखील बदलतात. वाचनात आलेल्या माहितीनुसार  मेघालय मधील काही भाग धर्मांतराच्या चक्रात अडकून, तेथील लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे लोकांचीं मूळ श्रद्धास्थानें नष्ट झालीं. ह्या बदलत्या आस्थेमुळे मेघालयच्या ह्या इतर भागातली अश्या प्रकारचीं पवित्र जंगलें नष्टही झालेलीं आहेत! श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यामध्ये अगदीं पुसट रेष असते. येथे प्रचलित असलेल्या दंतकथांना शहराकडील विज्ञानाची कास असलेले शिकलेसवरलेले लोक कदाचित अंधश्रद्धा, भाकडकथा म्हणून हिणवतीलही.  माझ्या लेखीं मात्र, नैसर्गिक समतोलाचे महत्त्व ओळखून ती साधनसंपत्ती मर्यादेत आणि गरजेपुरतीच वापरावी ह्याची जाणीव असलेल्या सूज्ञ खासी पूर्वजांनी घालून दिलेल्या ह्या रूढी- परंपरांएवढी डोळस श्रद्धा दुसरी कोणतीही नव्हती!

जंगलातल्या त्या कच्च्या वाटेने भटकंती करतां करतां तास दीड तास कसा गेला, हे समजलेही नाही. पुनश्च त्या माळावर पोहोचलो, तोवर सायंकाळ झालेली होती. ह्या माळावर तासन् तास शांत बसावे, समोरच्या ठेल्यावर मिळणाऱ्या वाफाळत्या ' मॅगी' चा मनसोक्त आस्वाद घ्यावा! तेथे बसलेलो असताना, तेथील एका पर्यटकाने केलेल्या, "अंदर देखनेलायक कुछ है, या सिर्फ ऐसे ही पेड - पौधे हैं?" अश्या कुत्सित सवालावर, "जंगलच आहे आत!" यापलीकडे मी काही बोलू शकले नाही. बहुतांश पर्यटक जंगलाची पूर्ण सफर का करू इच्छीत नाहीत, किंवा आम्ही पूर्ण trail करण्याची इच्छा दर्शवल्यामुळे येथील लोकांना आश्चर्य का वाटावे, ह्याचे कोडे आत्ता हळूहळू उलगडायला लागले होते. ह्यामध्ये चालण्याचे श्रम करण्याची अनिच्छा किंवा आळस हे कारण नसून, लोकांची जंगलाबद्दलची अनास्था आहे. "जंगलांमध्ये जाऊन काय पहायचं?" अशी काहीशी भावना ह्यामागे दिसून येते.




त्या माणसाच्या लेखीं ह्या जंगलामध्ये मनोरंजक, रोमांचक असं काही नसेलही. माझ्यासाठी मात्र हे जंगल, जगणं समृद्ध करणारा अद्वितीय अनुभव घेऊन आलं होतं. येथे हिरव्यागार रंगाच्या असंख्य रंगच्छटांची कोवळक होती, तशी, धुंद करणारा स्वर्गीय मृद्गंध घेऊन येणारी थंडगार वाऱ्याची झुळुकही होती. बासरीच्या स्वरांना लाजवेल असा पक्ष्यांचा किलबिलाट होता, तसाच त्या संगीताशीं सूर मिळवणारा झऱ्यांचा मंजुळ कलरवही होता! ठायीं ठायीं, सृष्टीने आपल्या कोठारातल्या खजिन्याची मुक्तहस्ताने केलेली लयलूट होती, पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, ह्या खजिन्याची किंमत ओळखून, रूढी- परंपरांचे कुंपण घालीत त्याला प्राणपणाने जपणारी, त्या ठेव्याताच ईश्वराला शोधणारी माणूसकीही होती!

मौफालाँगच्या त्या पवित्र जंगलामधून एक पानही उचलून बाहेर नेण्याची परवानगी नाही, हे माहीत असूनही, एक गोष्ट मात्र आम्ही तेथून घेऊन जात होतो, ती म्हणजे, त्या जंगलाच्या, मेघालयच्या आणि येथील संस्कृतीच्या, कधीही न विसरता येणाऱ्या आठवणींचा अमूल्य ठेवा!

Thursday, 5 May 2022

मेघांच्या माहेरा... भाग ३


मेघालयचा प्रवास निश्चित झाल्यानंतर, इंटरनेटवरून जी माहिती मिळवली, त्यामध्ये मेघालयच्या पश्चिमेकडील डौकी भागाबद्दल बरेच वाचनात आले होतें. म्हणूनच की काय, ह्या भागाला भेट देण्याविषयींं मनात बरीच उत्कंठा होती. त्यामुळे, "डौकीच्या बाजूला न गेलेलेच बरें, रस्त्याचे काम चालू असल्यामुळे रस्ता खूपच खराब आहे" असे टॅक्सी चालकाने सुचवतांंच माझा काहीसा हिरमोडच झाला. शेवटीं "जे होईल ते बघू" असे म्हणत, डौकीची वारी करायचीच असे ठरवले, आणि सकाळी सहाच्या सुमारास त्या दिशेने वाटचाल सुरू केली. 

जैंंतिया डोंगररांगांच्या कुशीत वसलेला हा प्रदेश शिलॉंगच्या मानाने समुद्रसपाटीवरून काहीसा कमी उंचीवर आहे. त्यामुळे, जसजशी गाडी डौकीच्या जवळ जाते, तसतशी हवामानातली उष्णता काहीशी वाढत जाते. येथील उष्ण वातावरणामुळे ह्या भागात बऱ्याच ठिकाणीं नारळ , सुपारीच्या मोठ्ठाल्या बागाच बागा दिसून येतात. ह्याबरोबरच आंबे, केळी, मिरवेली आणि क्वचित् फणसाची लागवड केलेलीही दिसून येते. एकूणच ते उष्ण वातावरण, झाडेझुडपे, बागायती, ह्यामुळे क्षणभर, "आपण कोकणात तर नाही ना?" असा भास न झाल्यास नवलच!

चेरापुंजीच्या तुलनेत एक बदल मात्र येथे प्रकर्षाने जाणवतो. एक तर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे चहूकडे धुळीचे साम्राज्य मांडून ठेवलेले! चेरापुंजीच्या  वाटेवरील डोंगरमाथे वृक्षवल्लींंनी समृृद्ध, हिरवेगार आहेत. इथेे मात्र  बागाईत केेलेला भाग सोडला, तर डोंगर बऱ्याच ठिकाणीं पार उघडे बोडके वाटतात. कित्येेेक ठिकाणीं तर डोंगरांचे कडे ढासळलेलेही दिसतात. हे ढासळलेल्या कड्यांचे कोडेे काही केेल्या उलगडेना! "हेे काय गौडबंगाल आहे बाबा?" असे ड्रायव्हरला विचारताच त्यानेेे सांगायला सुरवात केली. 

"मेघालयच्या ह्या भागात मोठ्या प्रमाणात कोळशाचा साठा होता. इथे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी डोंगर पोखरलेले दिसतील", तो डोंगरांमध्ये दिसणारी छोटी छोटी भुयारें दाखवत म्हणाला. "ह्या भुयारांमधून गेली बरीच वर्षे कोळसा काढण्याचे काम चालू होते".

"होते? मग आत्ता?" मी विचारले. "अहो मॅडम, बहुतेक ठिकाणी हे काम अवैधरित्या चालायचे. त्या भुयारामधून कामगार आत जाऊन कोळसा काढीत असत. हे जे कडे ढासळलेले दिसतात, ते ह्यामुळेच! काही वर्षांपूर्वी सरकारमार्फत ह्या सगळ्या प्रकारावर बंदी आली खरी, पण तरी इथून कोळसा काढणं काही थांबलं नव्हतं. आता मात्र कोळशाचा साठा हळूहळू संपत आलाय, म्हणजे निदान माणसांकरवी काढून घेता येईल असं काहीही शिल्लक नाहीये आत्ता. म्हणून सगळं थांबलंय! तो सांगत होता. 

मी मात्र हे सगळं ऐकून अवाक् झाले! खनिज काढण्याच्या ह्या पद्धतीला "rat hole mining" म्हणतात. अश्या प्रकारच्या कामांमध्ये केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी मजूर भुयारात शिरायला तयार होतात खरे, पण हे करताना कित्येक मजुरांनी भुयारात फसल्यामुळे प्राणही गमावलेले आहेत. आणि हे असं असूनही आत्ता खाणकाम थांबलंय, ते केवळ कोळशाच्या अभावापायीं. माणसाच्या स्वार्थाला अंत नाही, हेच खरे!

डौकीपासून साधारण दहा किलोमीटर अंतरावर असतांनाच मालवाहू ट्रक्सच्या रांगाच रांगा दिसू लागल्या. काही वेळातच ट्रक्स ची गर्दी वाढत जाऊन वाहतूक जवळ जवळ ठप्प झाली. प्रत्येक ट्रक मध्ये बांधकामासाठी वापरात येणारे मोठ्ठाले दगड भरले होते. 

"हा काय प्रकार आहे?" मी न रहावून विचारले. "मॅडम, इथून बांगलादेशची सीमा जवळ आहे. हे सगळे ट्रक बांगलादेशमध्ये व्यापारासाठी जाणारे आहेत. मेघालयमधील बऱ्याचश्या जमिनी सरकारी नसून, येथील रहिवाश्यांच्या खाजगी मालमत्ता आहेत. त्यामुळे, डोंगराळ भागामध्ये बऱ्याच ठिकाणी त्या डोंगरांचे कडे फोडून दगड काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालते. बांगलादेशात बांधकामासाठी उपयुक्त अश्या दगडांची टंचाई असल्यामुळे इथून हे दगड निर्यात केले जातात." 

"मग ही वाहतूक कोंडी नेहमीचीच का?" मी प्रश्न केला. " हो, हे नेहमीचं आहे हल्ली!  तो उद्गारला, "दररोज सुमारें एक हजार ट्रक्स भरून माल बांगलादेशला रवाना होतो." त्याचे शब्द कानावर पडत होते. डोकं मात्र ते सगळं ऐकून सुन्न झालं होतं! समोर धुळीच्या लोटात शेकडोंच्या संख्येने जाणारी मालवाहू वाहने, आणि आजूबाजूला, राजमुकट काढून घेतलेल्या शरणागत राजासारखा केविलवाणा भासणारा, तो लचके तोडलेला पर्वतराज, त्याच्यासोबत घडणाऱ्या अन्यायाची साक्ष देतच होते!

त्या कोंडीतून वाट काढत कसेबसे डौकी नदीच्या तीरावर पोहोचलो. डौकी नदी (जिला खासी भाषेत 'उमगोट' असेही नाव आहे) प्रसिद्ध आहे, ती तिच्या स्फटिकासारख्या निर्मळ, नितळ पाण्यासाठी!  हे पाणी इतके स्वच्छ असते की साधारण वीस ते पंचवीस मीटर खोल पाण्याचा तळ आपण सहज पाहू शकतो. असे म्हणतात, की कमालीच्या पारदर्शकतेमुळे पाण्यावर तरंगणाऱ्या होड्या पाहताना, त्या हवेत तरंगल्याचा भास होतो.

आज मात्र, हा अद्भुत देखावा पाहण्याचे भाग्य आमच्या नशिबीं नव्हते. आदल्या दिवशींच पाऊस पडून गेल्यामुळे नदीचे पाणी काहीसे गढुळ झालेले होते. पण पाणी गढुळ असले, तरी नदी मात्र नितांतसुंदर! इथे होडीत बसून फेरफटका मारण्याचा मोह न झाला, तर नवलच! छोट्या छोट्या होड्या पर्यटकांना घेऊन पलीकडल्या तीरावर फिरवून आणतात. नावाडीही मोठे रसिक. नाव वल्हवतां वल्हवतां त्याच लयीत एकामागून एक जुनी- नवीन गीतें गुणगुणत सफरीत रंग भरणारे! मग मधूनच एखादा दिलदार पर्यटकसुद्धा, " कितना अच्छा गाते हो! आपको तो इंडियन आयडॉल मे होना चाहिए!" असे भरघोस कौतुक करीत त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवतो! नदीच्या पलीकडच्या बाजूला बांगलादेशची सरहद्द दिसते.
पाणी कापीत बोट हळूहळू किनाऱ्याला लागते. नदीचा किनाराही कमालीचा सुरेख. विविधरंगी ठिपक्यांची सुबक रांगोळी काढावी, तश्या असंख्य रंगीबेरंगी दगडगोट्यांनी सजलेला. पण ही रांगोळीदेखील पर्यटकांनी फेकलेली चिप्स ची पाकिटे, कोल्ड ड्रिंक चे कॅन आणि दारूच्या बाटल्यांनी विद्रूप केलेली! 






होडीतून फेरफटका मारून परत फिरलो. मनात मात्र कुठेतरी, अलौकिक सृष्टिसौंदर्याची देणगी लाभलेला हा प्रदेश, माणसाच्या कर्मानेच उजाड, रुक्ष आणि प्रदूषित होत चाललाय ह्याचं शल्य बोचत होतं!
 
प्रवासाचा पुढचा टप्पा, म्हणजे आशिया खंडात सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळख निर्माण झालेलं " मौलीनोंग" हे गाव. "आता मौलीनोंगला जाताना वेगळ्या रस्त्याने जाऊ, म्हणजे ट्रॅफिक लागणार नाही" आमच्या मनातली धास्ती ओळखून ड्रायव्हर बोलला. विशेष म्हणजे, मौलिनोंगला जाणारा हा रस्ता बरोब्बर भारत - बांगलादेश सीमेशी समांतर रेषेत धावतो! "ही कुंपणापलीकडली शेतं दिसतात ना, ती बांगलादेश मधली आहेत!" तो म्हणाला.गंमत म्हणजे, ह्या भागात राहणाऱ्या बऱ्याच भारतीय लोकांच्या शेत जमिनी बांगलादेश मध्ये आहेत, तर, बऱ्याच बांगलादेशी लोकांच्या मालकीच्या जमिनी भारतात आहेत!

हमरस्त्यापासून काहीसा लांब असल्यामुळे ह्या मार्गावर फारशी वर्दळ नव्हती. डौकीच्या मुख्य मार्गावरून जातांना दिसणारे चित्र इथे मात्र पूर्णपणे पालटले होते! पुनश्च हिरवेगार दिसू लागलेले  डोंगरमाथे, ठिकठिकाणीं खळाळत वाहणारे झरे, हे दृश्य डोळ्यांना सुखावणारे होते. साधारण दीड एक तासाचा प्रवास मौलीनोंग गावाच्या रहिवासी भागाच्या हद्दीपाशी घेऊन येतो. ह्या हद्दीपाशीच वाहनांसाठी पार्किंगची आणि पर्यटकांसाठी खाण्यापिण्याची सोय आहे. येथून पुढे, रहिवासी भागामध्ये जाण्यास वाहनांना पूर्ण मज्जाव आहे.

येथे मिळणाऱ्या साध्याच पण ताज्या अन्नाचा आस्वाद घेऊन गावाच्या हद्दीत प्रवेश केला. प्रामुख्याने खासी जमातीच्या लोकांची वस्ती असलेले हे गांव म्हणजे अक्षरशः एखाद्या परिकथेतील चित्रातून सत्यात उतरलेले वाटते. चालायला गुळगुळीत डांबरी समांतर रस्ते, दुतर्फा सावली देणारे वृक्ष, त्यामधून डोकावणारी इवलीशी कौलारू घरे, घरांसमोरील अंगणात अगदी मायेने जोपासलेल्या फुलबागा आणि ह्या सुंदर बागांमधल्या फुलांच्या ताटव्यांचेच रंग चोरून जणु शेकडों चिमुकलीं इंद्रधनुष्यें उडावीत तशीं भिरभिरणारीं फुलपाखरें! गावामधून वाहणाऱ्या झऱ्यांचे पाणी दैनंदिन वापरासाठी पाटामधून सगळीकडे फिरवलेले आहे.

गावचा परिसर अगदी आरशासारखा स्वच्छ ठेवलेला. ठिकठिकाणीं कचरा गोळा करण्यासाठीं बांबूच्या कचराकुंड्या आहेत. संपूर्ण गावात प्लास्टिकवर पूर्ण बंदी आहे. कचराकुंडीत जमलेला कचरा गोळा करून त्याचा खत निर्मितीसाठी वापर केला जातो.








विशेष म्हणजे, ह्या गावात ( आणि तसं पाहिलं तर मेघालय मध्ये सर्वच ठिकाणी) राहणाऱ्या खासी जमातीची संस्कृती प्रामुख्याने मातृसत्ताक आहे. इथल्या कायद्याप्रमाणे सर्व संपत्ती आणि जमिनीचा वारसाहक्क आईकडून सर्वात लहान मुलीकडे जातो. गावातील लोकांची गुजराण, रहिवासी भागाच्या हद्दीबाहेर असलेल्या सुपारीच्या बागायतीवर होते. गावात शाळा, बाजार, प्रार्थनास्थळें अश्या मूलभूत सोयी सोडल्या, तर बाकी सुखसोयी फारश्या नाहीतच! किंबहुना, येथील लोकांच्या अकृत्रिम, साध्या राहणीमध्येच त्यांच्या समाधानी जीवनाचे रहस्य दडले असावे!

मौलीनोंग मध्ये पाहण्यासारखी आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, येथील "living tree root bridge" म्हणजेच जिवंत वृक्षांच्या मुळांपासून घडलेला पूल.  मौलीनोंगच्या वेशीपासून काही अंतरावरच एक छोटा धबधबा आहे. धबधब्याच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर जाण्यासाठी सुमारे दोन शतकांपूर्वी येथील खासी रहिवाश्यांनी मोठ्या कल्पकतेने ह्या पुलाची निर्मिती केली. ह्यासाठी झऱ्याच्या एका बाजूला असलेल्या रबर वृक्षांची मुळें जाणीवपूर्वक वाढवून विरुध्द दिशेला असलेल्या झाडांच्या मुळांमध्ये निगुतीने गुंफली गेली आहेत. त्यानंतर झाडे वाढून मोठी होईस्तोवर त्यांची काळजीपूर्वक निगा राखून हा पूल निर्माण केला आहे.  म्हटल्यास पूर्णपणे नैसर्गक, म्हटल्यास मानवनिर्मित असलेला, साधारण पन्नास माणसांचे वजन पेलवू शकणारा हा पूल, निसर्ग आणि वास्तुशास्त्र ह्यांची सांगड घालून केलेल्या बांधकामाचा अद्भुत नमुनाच म्हणावा लागेल!




मौलीनोंगच्या ह्या जिवंत पुलापाशीं ह्या दिवसाची सफर तर संपली होती. ह्या सफरीत अनुभवलेल्या विरोधाभासामुळे माझे मन मात्र द्विधा मनःस्थितीत होते. एकीकडे झाडाच्या मुळांची घट्ट वीण घालीत एका अर्थीं मानव संस्कृतीची निसर्गाशी नाळ जोडणारे खासी पूर्वज आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन आजही निसर्गाचे जतन आणि संवर्धन करीत ते नातें घट्ट करणारे मौलीनोंगमधील रहिवासी, तर दुसरीकडे, आर्थिक विकासाच्या नावाखाली लयाला चाललेला डौकीचा नैसर्गिक ऐश्वर्याचा ठेवा! ह्या दोन मानवी प्रवृत्तींपैकी कोणती प्रवृत्ती तग धरेल, हे तर येणारा काळच सांगू शकेल. पर्यटन आणि व्यापार ह्या मेघालयच्या आर्थिक प्रगतीसाठी वरदान ठरलेल्या दोन्ही गोष्टी येथील निसर्गचक्रासाठीच नाही, तर येणाऱ्या पिढ्यांच्या अस्तित्वासाठीही अभिशाप ठरतील की काय, ह्याचा सारासार विचार करणे गरजेचे आहे. निसर्ग  देतो, अगदीं भरभरून देतो. पण म्हणून आपण किती ओरबाडून घ्यायचं ह्याचा विचार शेवटीं आपणच करायला हवा, नाही का?

कडु- गोड अनुभव गाठीशी बांधीत मेघालयच्या प्रवासातला अजून एक दिवस संपला होता.  शिलाँगला निघालो, ते मात्र, ह्या घडीला अंशतः का होईना, सुखरूप असलेला मेघालयचा अमूल्य नैसर्गिक ठेवा, यापुढेही असाच अबाधित राहील का, ही हुरहूर मनात घेऊनच!

Wednesday, 20 April 2022

मेघांच्या माहेरा... भाग २

भाग २



उमियाम तलावाच्या काठींं काही क्षण घालवून शिलॉंगला पोहोचलो तोवर अंधार पडला होता. रात्री विमानात झालेले जागरण आणि दिवसभराचा प्रवासाचा शीण, ह्यामुळेच की काय, रूमवर पोहोचल्या पोहोचल्या जी गाढ झोप लागली, ती थेट सकाळी उशिरापर्यंतच. त्यामुळे आदल्या दिवशी, " साडेसहाच्या आत बाहेर पडा, नाहीतर ट्राफिक जॅम मध्ये अडकू"अशी ड्राइवर ने तंबी दिलेली असूनसुद्धा, निघायला साडेसात वाजलेच!

बाहेर बघतो तर काय, वाहनांची ही, मोठ्ठी रांग लागलेली. गोगलगायीच्या गतीने पुढे सरकता सरकता, गाडीतूनच एका अर्थी शिलॉंग दर्शन सुरू झाले.

ह्यापूर्वी, हिमाचल प्रदेश मधील चंबा, सिक्कीममधले गंगटोक ह्यासारखी पहाडी शहरे पाहिली होती.त्यामुळे डोंगराळ भागातील हे शहर कसे असेल, ह्याबद्दल मनातल्या मनात एक चित्रही तयार झालेले होते. शिलॉंग शहराने मात्र प्रथमदर्शनीच त्या प्रतिमेला धक्का दिला. चंबाचा टुमदारपणा शिलॉंगमध्ये नाही. गंगटोकचा नीटनेटकेपणाही नाही. मुळात हे आखीव-रेखीव आणि सुबक बांधणीचे शहरच नव्हे! अनेक छोट्या छोट्या डोंगरांवर अस्ताव्यस्त पसारा मांंडल्यासारखं, काहीसं अजागळ वाटणारं शहर. पण किंबहुना, त्या पसाऱ्यातच ह्या शहराचं सौंदर्य दडलेलं असावं! काळजीपूर्वक निगा राखलेली बागेतली झाडे तर सुंदर दिसतातच. पण कोणतीही देखभाल न करतां ऐसपैस फांद्या पसरून अस्ताव्यस्त वाढलेल्या डेरेदार वृक्षातही विलक्षण मोहकता असते ना, अगदी तस्संच! 

शहराच्या मधोमध जाणारा एकच चिंचोळा रस्ता. दुतर्फा,अगदी गर्दी वाटावी, इतकी दाट वस्ती. घरे आणि माणसेही, फारशी सुखवस्तु नसावीत. पण तरी, निसर्गाच्या सान्निध्यात वास्तव्य केल्यामुळेच की काय, इथल्या माणसांमध्ये उपजतच सौंदर्यदृष्टी आली असावी. छोटेखानी घर असो वा आलिशान बांगला, प्रत्येक घर अगदी हौसेने रंगरंगोटी करून सजवलेलं. घराघरातून परसात किंवा गच्चीवर रंगीबेरंगी फुलांनी बहरलेली बाग अगदी हमखास दिसते.

भारताचा सीमाभाग असल्यामुळे ह्या ठिकाणीं भारतीय सैन्यदलाचे प्रभुत्व प्रकर्षाने जाणवते. भारतीय 'ईस्टर्न एअर कमांड' चे मुख्यालय शिलॉंगमध्ये स्थित आहे. ह्याच वाटेवर ईस्टर्न आर्मी कमांड चे १०१ प्रभागाचे मुख्यालयही (area 101 headquarters) आहे. १९७१ च्या युद्धात ह्याच सैन्यदलाची तुकडी पाकिस्तानी सैन्याअगोदर ढाकामध्ये जाऊन थडकली. याचा परिणाम म्हणून पाकिस्तानी जनरल नियाझी यांनी भारतीय सैन्यासमोर सपशेल शरणागती पत्करली. ह्या ऐतिहासिक घटनेची साक्ष म्हणून मिळविलेले "फर्स्ट इन ढाका" (ढाका मध्ये सर्वप्रथम) चे बिरुद आजही ही तुकडी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोठ्या मानाने मिरवतेय! गेले वर्षभर ह्या विजयाचा सुवर्णमहोत्सव सैन्यदलाने "स्वर्णिम विजय वर्ष" म्हणून मोठ्या दिमाखात साजरा केला. त्या निमित्ताने १९७१ च्या युद्धात महत्वाची कामगिरी बजावलेलेले रणगाडे प्रदर्शनास मांडलेले बघायला मिळाले.

ट्रॅफिक जॅम मधून निघून एकदाचे शहराच्या वेशीबाहेर पोहोचलो, आणि प्रवास सुरू झाला, तो थेट चेरापुंजीच्या दिशेने. चेरापुंजी- कोणे एके काळीं शालेय पुस्तकातून सगळ्यात जास्त पाऊस असलेली जागा म्हणून माहीत झालेली. काही वर्षांपूर्वीच हा मान मेघालयमधीलच मौसीनरामकडे गेला. चेरापुंजी हे केवळ प्रचलित नाव, बरं का! खासी भाषेत ह्या जागेसाठी लाडाचे नाव आहे, "सोहरा". इथेही तसाच वळणावळणांंचा रस्ता. कड्याकपारीमधून दुग्धाभिषेक करावा तसे पांढरेशुभ्र पाणी खळाळत असते. ठिकठिकाणी पर्यटकांसाठी बनविलेले "व्ह्यू पॉईंट्स". येथील छायाचित्रे घेण्यास कॅमेरा अपुरा पडतो. ते सौंदर्य डोळ्यांनीच टिपावे, आणि कायमचे मनात साठवून ठेवावे!




अवतीभवती 'खासी' डोंगररांगा, त्यांवर सदाहरित जंगले. हिमालयीन पर्वतरांगा सुंदर असल्या, तरी भव्यदिव्य, डोळे दिपवून टाकणाऱ्या, गूढ वाटतात. खासी डोंगररांगांचे देखणेपण मात्र, आपले, हवेहवेसे वाटणारे. काही भागामध्ये पाईन सारखी हिमालयीन झाडे सोडली, तर बहुतांश झाडेझुडपेही थेट सह्याद्रीची आठवण करून देणारी. 

अश्याच एखाद्या व्ह्यू पॉइंटचा, डोळ्यांचे पारणे फेडणारा नजारा पाहून मन नकळतच तिथे रेंगाळते, आणि चालक जणु मनातले ओळखून आपसूकच गाडी तिकडे वळवतो. समोरच्या कड्यावरून खोल दरीत अव्याहत कोसळणाऱ्या धबधब्याचे दृश्य नजरेत साठवता साठवता, मधूनच, अल्लाउद्दीनच्या दिव्यातून अक्राळविक्राळ राक्षस बाहेर पडावा, तसा , त्या दरीतून एखादा मोठ्ठाला ढग बाहेर पडतो, आणि हळूहळू ती दरी, तो धबधबा, इतकेच काय, ते समोरचे डोंगरसुद्धा पार गिळंकृत करून टाकतो! 

हा प्रवास करतां करतांच वाटेत "थ्री स्टेप्स वॉटरफॉल" पहायला मिळतो. तीन टप्प्यामध्ये कोसळणारा धबधबा म्हणून थ्री स्टेप्स. नंतर कधीतरी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी "एलिफन्ट फॉल्स" असे ह्याचे बारसे केले. ह्या धबधब्याच्या एका बाजूला हुबेहूब हत्तीसारखा दिसणारा एक पाषाण होता म्हणे! १८९७ मध्ये झालेल्या भूकंपात तो दगड नष्ट झाला, पण ते नाव चिकटले, ते मात्र कायमचेच!




अजून थोडा पुढे प्रवास केल्यानंतर सोहरापासून साधारण वीस मिनिटे अलीकडे "अरवाह" च्या नैसर्गिक गुंफा आहेत. एक छोटा कच्चा रस्ता ह्या गुंफेजवळ काही अंतरापर्यंत आणून सोडतो. येथून पुढे दगडी बांधकाम केलेली, साधारण पंधरा मिनिटांची पायवाट. 

पायवाटेवरून चालतां चालतां "rugged trail to caves" (गुंफेकडे नेणारी ओबडधोबड, डोंगराळ वाट) अशी एक पाटी दिसली, आणि माझ्यामधला निसर्गप्रेमी , आणि नवऱ्यामधला हाडाचा ट्रेकर काही स्वस्थ बसेना! इकडे रेंगाळलो तर पुढची प्रेक्षणीय स्थळें गाठण्यास उशीर होईल, हें माहीत असूनसुद्धा आम्ही त्या दिशेने मोर्चा वळवलाच! आणि अहाहा! काय सांगावे! आत्तापर्यंत, " नभ मेघांनी आक्रमिले" , हे ऐकले होते. पण इकडे तर, अवघे नभच मेघांना घेऊन पृथ्वीवर माहेरपणाला आलेले! मंदिराच्या गाभाऱ्यात धूप कोंदावा तसा शुभ्र ढगांनी कोंदलेला आसमंत, गाभाऱ्यातल्या ईश्वराच्या मूर्तीसारखे तटस्थ उभे राहिलेले भोवतालचे विशाल वृक्ष, आणि मंदिरातल्यासारखीच प्रसन्न, नीरव शांतता ! एरवी आग ओकत तळपणारा सूर्यसुद्धा इथे मात्र त्या गाभाऱ्यातल्या समईसारखा शांत होऊन तेवत होता! शब्दातीत असे सृष्टीसौंदर्य अनुभवत, त्या जंगलातून वाट काढत गुहेपर्यंत पोहोचेस्तोवर बराच वेळ गेला असावा. 







गुहेपाशी पोहोचलो, तेव्हा फारशी वर्दळ नव्हती. गुहेच्या तोंडापाशीच, " साहब, गाईड की जरूरत हो तो बताइए" असे म्हणत एक तरुण मुलगा समोर आला. "किती पैसे घेणार?" अशी विचारणा करताच, "तुम्हाला योग्य वाटतील तेवढं द्या" असे उत्तर मिळाले. ह्या तरुणाचं नाव 'योमी'. आम्ही हो म्हणताच त्याने उत्साहाने मोडक्या तोडक्या हिंदी-इंग्रजी मध्ये माहिती सांगायला सुरवात केली. 

पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रियेने तयार झालेल्या आणि डोंगराच्या अंतर्भागात पंचवीस ते तीस किलोमीटर खोलवर पसरलेल्या ह्या गुंफा म्हणजे दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. कोट्यवधी वर्षांपूर्वी इथे पाणथळ भाग असावा. त्यावर दगड मातीचे थरच्या थर गोळा होऊन हे डोंगर निर्माण झाले. हे दगड म्हणजे प्रामुख्याने limestone अर्थात चुनखडीचे होते. ह्या दगडांची पाण्यातील क्षारांशी रासायनिक प्रक्रिया होऊन , ते विरघळले, आणि ह्या गुंफा निर्माण झाल्या. पूर्वी पाणथळ प्रदेश असल्यामुळे ह्या गुहांच्या भिंतींवर शंख-शिंपले, मासे, गोगलगायी अश्या अनेक जलचर जीवांचे साधारण दोन कोटी वर्षे जुने जीवाश्म (fossils) सापडतात.







गुहेच्या मुखातून आत गेलो, की साधारण वीस-पंचवीस फुटापर्यंत पंधरा माणसे आरामात फिरू शकतील अशी ऐसपैस पोकळी आहे. ह्या ठिकाणी पर्यटन खात्याने पर्यटकांच्या सोयीसाठी फरशी टाकून विजेचीही सोय केली आहे. बहुसंख्य पर्यटक ह्या जागी फेरफटका मारून परत फिरतात. इथून पुढे मात्र, ह्या गुंफेला अनेक फाटे फुटतात. गुहा म्हणजे खरोखर काय प्रकरण आहे, ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल, तर गाईड घेऊन ह्या भुयारांच्या आत शिरावे.  इथली वाट मात्र खडकाळ आणि खाचाखळग्याची! ह्या खाचाखळग्यांमधून डोंगरातील झरे वाहतात . ह्या भुयारांमध्ये बऱ्याच ठिकाणी वाकून, तर काही ठिकाणी चक्क रांगत जावे लागते. जरा मान उंचावण्याचा प्रयत्न केला, की टाळकें टण्णकन आदळलेच म्हणून समजा! रुंदीही बेताचीच. जेमतेम एक माणूस आत जाऊ शकेल एवढीच! आत, नाकासमोर असलेली गोष्ट दिसू नये, इतका मिट्ट काळोख. त्या तसल्या भयाण अंधारात मोबाईल च्या मिणमिणत्या प्रकाशाचा आधार घेत, हा योमी एखाद्या सारड्यासारखा सरसर आत जातो. ठिकठिकाणी थांबून गुहेची माहिती देतो. गुहेच्या भिंतीवरच्या जीवाश्मांबद्दल भरभरून बोलतो. जनसामान्यांमध्ये असलेल्या claustrophobia अर्थात बंदिस्त जागांच्या भीतीचा ह्याच्या मनामध्ये लवलेशही नाही. त्याचा तो सहज वावर बघून, मला तर पुराणकाळात गुंफांंममधून वास करणारे ऋषीमुनीच आठवले! "ह्याला योमी नाही, योगीच म्हटलं पाहिजे!" मी मनातल्या मनात पुटपुटले.

"ह्या गुहा पंचवीस ते तीस किलोमीटर खोलवर पसरलेल्या आहेत. त्यामधले फक्त दोन ते तीन किलोमीटर इतकाच भाग मानवाने पालथा घातलेला, ज्ञात आहे. एवढ्या भागाचे नाकाशेही उपलब्ध आहेत. " योमी सांगत होता. 

"आपण आत्ता किती खोलवर आलोय?" मी विचारले. "साधारण पाचशे मीटर. ह्यापुढेही जाता येतं, पण त्यासाठी ट्रेकिंग गियर अनिवार्य आहे, कारण पुढचा टप्पा सरपटत पार करावा लागतो" योमी उत्तरला. "तू कुठवर गेला आहेस?" माझा आपला बाळबोध प्रश्न. " तीन किलोमीटर आत जाऊन आलोय" तो अभिमानाने म्हणाला.

गुहेच्या दोन फाट्यामधून आत नेऊन त्याने पार 'डेड एन्ड'पर्यंत दाखवून आणले.अंधारात चाचपडत वाकून चालतां चालतां एव्हाना पाठीला रग लागली होती. चार वर्षाचे आमचे चिरंजीव तेवढे मजेत, न वाकता, इकडेतिकडे बघत फिरत होते! आम्हाला मात्र केव्हा एकदा मोकळ्या हवेत श्वास घेतो, असं झालेलं. पण योम्याचा उत्साह काही मावळत नव्हता! "आता एकदाचं बाहेर ने बाबा" असं सुचवतांंच, "जरा थांबा, एक शेवटची गंमत दाखवतो" असे म्हणत, परवानगीची वाट न बघतांं तो अजून एका भुयारात शिरलासुद्धा! थोडं पुढे गेल्यानंतर इथे मात्र थोडीशी मोठी पोकळी होती. खाली झऱ्याचं पाणी. आश्चर्य म्हणजे, गुहेच्या वरच्या भागातला कातळ फोडून, डोंगराच्या पृष्ठभागावरील झाडांची मुळे, पाण्याच्या शोधार्थ गुहेत दाखल झालेली दिसत होती!

गुहा पाहून बाहेर पडलो, तोवर संध्याकाळ झालेली होती. आम्ही ठरवलेल्या कार्यक्रमापेक्षा अंमळ उशीरच! म्हणजे, गुहेत जाताना केलेल्या जंगलातल्या भटकंतीने आमचा तब्बल एक दीड तास घेतला असावा. सहाजिकच मौसमाई गुंफा आणि सोहरामध्ये असलेला नौखालीकाई धबधबा पाहण्याच्या आमच्या कार्यक्रमाला कात्री बसणार होती. शेवटी, जवळच असलेल्या व्ह्यू पॉईंट वरून दिसणारा "सेव्हन सिस्टर्स" (सप्त धारांनी कोसळणारा)  धबधबा पाहून आम्ही प्रवास आटोपता घेतला. 

"गुहेमधून लवकर निघालांं असतांं तर राहिलेल्या दोन्ही गोष्टी पाहता आल्या असत्या तुम्हांला!" ड्राइवर हळहळत होता. पण मला त्याचे तिळमात्रही दुःख नव्हते. घाईघाईने गुंफा पाहून आलो असतो, तर कदाचित प्रवासातले एक दोन जास्तीचे टप्पे पार पडलेही असते. पण, त्या न चोखळलेल्या वाटेने चालतां चालतां जे गवसलं, ते मात्र गवसलं नसतं! नेहमीचा सरळ सोप्पा राजमार्ग सोडून, मुद्दाम कधीतरी ह्या वाकड्या वाटांंवरून वाटचाल करावी. शेवटी, प्रवास काय आणि आयुष्य काय, ह्या न मळलेल्या वाटाच ते समृद्ध बनवीत असतात. ह्या वाटांवरून मुक्कामस्थळींं पोहोचायला काहीसा वेळ लागतो हे मान्य. बऱ्याचदा ते उद्दिष्ट साध्य होतंच असंही नाही! पण तसंही, मंदिरात गेल्यानेच ईश्वरप्राप्ती होते, असं कुणी सांगितलंय? कधी कधी वारीतसुद्धा पांडुरंग भेटतो, नाही का?

Monday, 11 April 2022

मेघांच्या माहेरा...भाग १

भाग १


दोन वर्षें कोव्हिड, आणि तत्पूर्वीं दोन वर्षें माझ्या आरोग्याच्या तक्रारी, ह्यामुळे गेली चार वर्षे मोठ्या प्रवासाचा योग आला नव्हता. त्यांत पुरी-कोणार्क-भुवनेश्वर असा प्रवास करण्याच्या माझ्या मनसुब्यांंना, फेब्रुवारी २०२२ मध्ये आलेल्या तिसऱ्या लाटेने पार जलसमाधी दिली. त्यानंतर, एप्रिल महिन्याच्या सुमारास पुरी-भुवनेश्वर मध्ये उन्हातान्हात भटकण्याचे अग्निदिव्य करण्याची हिम्मत माझ्यात नक्कीच नव्हती! हो-नाही करतांं करतांं  मेघालयचा पर्याय समोर आला, आणि पूर्वेकडील ह्या इटुकल्या प्रदेशाची वारी करायची ह्यावर एकदाचं शिक्कामोर्तब झालं!

२७ मार्च २०२२ रोजी, गोवा ते कोलकाता, आणि कोलकाता ते गोवाहाटी असा प्रवास करून दुपारच्या सुमारास आम्ही गोवाहाटी विमानतळावर पोहोचलो. तेथून पुढे शिलॉंग पर्यंतच्या प्रवासासाठी टॅक्सी ठरवली होती. 

ऐन उन्हाळ्यात चेहऱ्यावर थंडगार गुलाबपाण्याचा शिडकावा करावा तशी आल्हाददायक हवा; अलगद एका डोंगरावरून दुसऱ्या, दुसऱ्यावरून तिसऱ्यावर वळणे घेत फिरणारे चौपदरी, पण नागमोडी रस्ते, चहूबाजूला पांढऱ्याशुभ्र ढगांचा साज ल्यालेले हिरवेगार डोंगर , मधूनच दिसणाऱ्या इवल्याश्या वस्त्या, त्यामधून फिरणारी गोबऱ्या गालांची गोंडस मुले आणि निसर्गदत्त पहाडी सौंदर्य मिरवणारे तरुण-तरुणी- प्रवासच असा डोळ्यांचे पारणे फेडणारा, की मुक्कामाचाही क्षणभर विसर पडावा! 

साधारण दोन अडीच तासांच्या प्रवासानंतर शिलॉंगच्या अलीकडे काही अंतरावर उमियाम तलाव लागतो. हा तब्बल २२० चौरस किलोमीटरवर पसरलेला विस्तीर्ण तलाव. तलावाकाठी पोहोचलो, तेव्हा फारतर दुपारचे चार वाजून गेले असतील. तरी पूर्वोत्तर प्रदेश असल्यामुळे सूर्य हळूहळू मावळतीकडे झुकायला लागलेला. मावळतीच्या किरणांचे सोने विरघळून सोनसळी झालेल्या पाण्यातून बोटीचा प्रवास, म्हणजे अहाहा.. पर्वणीच! आकाशाचे लख्ख प्रतिबिंब दाखवणारे आरशासारखे स्वच्छ पाणी कापत, मधूनच पाण्याचे तुषार चेहऱ्यावर उडवत छोटेखानी बोट निघते, तलावातून मोठ्ठा वळसा घेत फिरते. मधूनच एखादं छोटंसं बेट दिसतं. हिवाळ्याच्या पहाटे बाळाने हट्टाने आजीची उबदार दुलई पांघरावी, तसं ढगांची मऊशार दुलई पांघरून निवांत पहुडलेलं! 

"गोव्याहून मेघालय मध्ये येऊन कसलं बोटींग करता??"  ह्या सहप्रवाश्याच्या प्रश्नावर मी नुसतीच हसले. त्या पंधरा मिनिटांच्या बोटीच्या प्रवासानंतर त्याला ते उत्तर मिळालं असेलच! गोव्यातल्या समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन स्पीड बोटने फिरण्याचा थरार काही औरच आहे. पण मेघालयच्या धुंद पावसाळी वातावरणात त्या नितांतसुंदर जलाशयातला तो फेरफटका अविस्मरणीय होता, हे नक्कीच!