Monday 11 April 2022

मेघांच्या माहेरा...भाग १

भाग १


दोन वर्षें कोव्हिड, आणि तत्पूर्वीं दोन वर्षें माझ्या आरोग्याच्या तक्रारी, ह्यामुळे गेली चार वर्षे मोठ्या प्रवासाचा योग आला नव्हता. त्यांत पुरी-कोणार्क-भुवनेश्वर असा प्रवास करण्याच्या माझ्या मनसुब्यांंना, फेब्रुवारी २०२२ मध्ये आलेल्या तिसऱ्या लाटेने पार जलसमाधी दिली. त्यानंतर, एप्रिल महिन्याच्या सुमारास पुरी-भुवनेश्वर मध्ये उन्हातान्हात भटकण्याचे अग्निदिव्य करण्याची हिम्मत माझ्यात नक्कीच नव्हती! हो-नाही करतांं करतांं  मेघालयचा पर्याय समोर आला, आणि पूर्वेकडील ह्या इटुकल्या प्रदेशाची वारी करायची ह्यावर एकदाचं शिक्कामोर्तब झालं!

२७ मार्च २०२२ रोजी, गोवा ते कोलकाता, आणि कोलकाता ते गोवाहाटी असा प्रवास करून दुपारच्या सुमारास आम्ही गोवाहाटी विमानतळावर पोहोचलो. तेथून पुढे शिलॉंग पर्यंतच्या प्रवासासाठी टॅक्सी ठरवली होती. 

ऐन उन्हाळ्यात चेहऱ्यावर थंडगार गुलाबपाण्याचा शिडकावा करावा तशी आल्हाददायक हवा; अलगद एका डोंगरावरून दुसऱ्या, दुसऱ्यावरून तिसऱ्यावर वळणे घेत फिरणारे चौपदरी, पण नागमोडी रस्ते, चहूबाजूला पांढऱ्याशुभ्र ढगांचा साज ल्यालेले हिरवेगार डोंगर , मधूनच दिसणाऱ्या इवल्याश्या वस्त्या, त्यामधून फिरणारी गोबऱ्या गालांची गोंडस मुले आणि निसर्गदत्त पहाडी सौंदर्य मिरवणारे तरुण-तरुणी- प्रवासच असा डोळ्यांचे पारणे फेडणारा, की मुक्कामाचाही क्षणभर विसर पडावा! 

साधारण दोन अडीच तासांच्या प्रवासानंतर शिलॉंगच्या अलीकडे काही अंतरावर उमियाम तलाव लागतो. हा तब्बल २२० चौरस किलोमीटरवर पसरलेला विस्तीर्ण तलाव. तलावाकाठी पोहोचलो, तेव्हा फारतर दुपारचे चार वाजून गेले असतील. तरी पूर्वोत्तर प्रदेश असल्यामुळे सूर्य हळूहळू मावळतीकडे झुकायला लागलेला. मावळतीच्या किरणांचे सोने विरघळून सोनसळी झालेल्या पाण्यातून बोटीचा प्रवास, म्हणजे अहाहा.. पर्वणीच! आकाशाचे लख्ख प्रतिबिंब दाखवणारे आरशासारखे स्वच्छ पाणी कापत, मधूनच पाण्याचे तुषार चेहऱ्यावर उडवत छोटेखानी बोट निघते, तलावातून मोठ्ठा वळसा घेत फिरते. मधूनच एखादं छोटंसं बेट दिसतं. हिवाळ्याच्या पहाटे बाळाने हट्टाने आजीची उबदार दुलई पांघरावी, तसं ढगांची मऊशार दुलई पांघरून निवांत पहुडलेलं! 

"गोव्याहून मेघालय मध्ये येऊन कसलं बोटींग करता??"  ह्या सहप्रवाश्याच्या प्रश्नावर मी नुसतीच हसले. त्या पंधरा मिनिटांच्या बोटीच्या प्रवासानंतर त्याला ते उत्तर मिळालं असेलच! गोव्यातल्या समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन स्पीड बोटने फिरण्याचा थरार काही औरच आहे. पण मेघालयच्या धुंद पावसाळी वातावरणात त्या नितांतसुंदर जलाशयातला तो फेरफटका अविस्मरणीय होता, हे नक्कीच!

6 comments:

  1. छान लिहिलंय!

    ReplyDelete
  2. मावळतीच्या किरणांचे सोने विरघळून सोनसळी झालेल्या पाण्यातून बोटीचा प्रवास, म्हणजे अहाहा.. पर्वणीच! आकाशाचे लख्ख प्रतिबिंब दाखवणारे आरशासारखे स्वच्छ पाणी कापत, मधूनच पाण्याचे तुषार चेहऱ्यावर उडवत छोटेखानी बोट निघते, तलावातून मोठ्ठा वळसा घेत फिरते. मधूनच एखादं छोटंसं बेट दिसतं. हिवाळ्याच्या पहाटे बाळाने हट्टाने आजीची उबदार दुलई पांघरावी, तसं ढगांची मऊशार दुलई पांघरून निवांत पहुडलेलं!

    अप्रतिम वर्णन...
    लेखाचे शीर्षकही खूप कल्पक. खूप छान प्रवासवर्णन. असेच लिहीत राहा.

    ReplyDelete
  3. अप्रतिम वर्णन, खूप सुंदर

    ReplyDelete