Sunday 21 August 2022

गिरिधर - गोपाळ





एका हातीं धरुनी बासरी,

मंद - मंद स्मितहास्य करी

दुज्या हातींच्या करांगुळीने

गोवर्धन लीलया धरी


गोपसख्यांच्या संगे गाठी

यमुनेचा तो सुंदर काठ

गोपस्त्रियांची वाट अडवुनी

दह्यादुधाचे फोडी माठ


गोपस्त्रियांनी यशोदेकडे

करितां लटकी कागाळी

दही - दुध - लोणी मी न चोरिले

म्हणत चोर अश्रू ढाळी


म्हणे यशोदा, तुज रे कान्हा

सोडीन मी नच सुखासुखीं

समक्ष सर्वांच्या पाहीन मी,

काय लपविले तुझ्या मुखीं


इवलेंसें ते वदन आपुले

उघडुनी दावी नंदकुमार

ब्रह्मांडाचे दर्शन घडवी

परमेशाचा तो अवतार


शक्तिमान सर्वेश्वर जो, 

अरि- दुष्टांचा संहार करी

गोकुळात तो रास रचोनी

गवळणींसवें फेर धरी


तिन्ही जगाचा स्वामी झाला

नंद यशोदेघरचा बाळ

विश्वाचा प्रतिपालक बनला

भक्तांसाठी ब्रिज- गोपाळ

10 comments:

  1. Superb.नेहमीच तुझं लिखाण उत्तम असतं.

    ReplyDelete
  2. सुंदर

    ReplyDelete
  3. वा,वा,खूपच सुरेख कविता केली आहेस,असेच लिहीत जा

    ReplyDelete
  4. कृष्णाचं एक अदभुत वेड आहे आपल्या collective mind मध्ये. है ना? आणि बाळकृष्णच्या लीला ही त्यात मोठी कारणीभूत गोष्ट आहे. Magical.

    ReplyDelete
    Replies
    1. खरं आहे! ज्योतिर्मय च्या शाळेत गोकुळाष्टमी चा कार्यक्रम पाहिल्यावर असंच काहीसं जाणवलं.. आजूबाजूला कितीतरी बाळकृष्ण, आणि राधा बनलेल्या गोड पोरं -पोरी बघून अक्षरशः वेडावून जायला झालं होतं.. really a magical experience!
      Thanks for appreciation!

      Delete