Monday, 17 February 2025

गोष्ट एका रुखवताची


नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्नं येतात म्हणे.. पण आमच्या नकट्याच्या मुंजीच्या रुखवतात त्याहून जास्त येतील, हे कुठे माहित होतं?

वास्तविक हस्तकला, टाकाऊतून टिकाऊ वगैरे प्रकरणाशी संबंध शालेय जीवनानंतर जो सुटला तो सुटलाच.. चित्रकलेने तर मला कधीच जवळ केलं नाही. शाळेत असताना, एक घर, त्याच्यासमोर रस्ता, कडेला एक झाड, मागे एक निळी नदी आणि आकाशात उडणारे चारदोन रेषारूपी कावळे असं पेटंट चित्र दहावीपर्यंत प्रत्येक वर्षी पाहिल्यावर, शेवटी चित्रकलेच्या बिचाऱ्या मास्तरांनी हे भोग "शिरसि मा लिख, मा लिख" म्हणत कसेबसे मला पुढे ढकलले असावे! त्यामुळे " रुखवत" हा मुंजीच्या परीक्षेतला ऑप्शन ला टाकलेला प्रश्न होता.

तसं बघायला गेलं तर आज काल या सगळ्या गोष्टी अगदी सुंदर रित्या बाहेरून ऑर्डर नुसार बनवून मिळतात... आणि खरं तर, "कुठे सगळं घरी करत बसा, ऑर्डर देऊन कटकटीतून मोकळे होऊ" या मताचीच होते मी. पण का कुणास ठाऊक, दुसऱ्या क्षणीं वाटलं, माझ्या लेकाच्या मुंजीत, त्याला न ओळखणाऱ्या तिऱ्हाइत माणसाने बनवलेलं  (कितीही सुबक का असेना) , रुखवत मांडून मला कसलं समाधान मिळेल? त्यापेक्षा मग मांडायलाच नको! मग मनाशी ठरवलं..ज्या चारदोन गोष्टी सहज आपल्याला जमत असतील, त्या बनवायचा प्रयत्न तरी करून बघू.. महिनाभरात जे, जेवढं जमेल, म्हणजे अगदी त्याचा बाऊ न करता, तेवढंच मांडू.

विचारचक्र सुरू झालं, आणि गुगल बाबांसकट त्यांच्याच टोळक्यातली सगळी App मंडळी मदतीला धाऊन आली. "Easy rukhwat ideas for munj" असं विचारायचा अवकाश, त्यानं माझ्यासमोर बिस्कीट, चॉकलेट च्या बंगल्यापासून ते आगगाड्या, मोटार, बाहुल्या इथपर्यंत सगळ्या भन्नाट कल्पना समोर मांडल्या!  त्यातल्या त्यात बनवायला सोपा वाटणारा Ferrero rocher चॉकलेट चा अननस आणि चॉकलेटचा फ्रॉक घातलेली बाहुली बनवावी असं ठरवलं.. तसाही आमच्या प्रेमळ पेशंट नी दिलेल्या असंख्य चॉकलेट चा भरणा आपलं आयुष्य सन्मार्गी लागायची वाट पाहत फ्रिज मध्ये बसलेला होताच!

प्रत्यक्षात मात्र, चिकटकण्याचं काम हाती घेतल्यावर वेगळाच घोळ सुरू झाला! ऐकीव माहितीवरून मनावर बिंबलेल्या "ग्लू गन ने काय वाट्टेल ते चिकटतं" या आत्मविश्वासाला साफ तडा गेला आणि अननसासाठी base म्हणून घेतलेल्या बरणीला अर्धवट चिकटलेले Ferrero rocher, बरणीसहित "नंतर बघू याच्याकडे" हे आश्वासन घेऊन पुनश्च फ्रिज मध्ये प्रस्थापित झाले. पुन्हा त्या ग्लू गन च्या नादी लागण्यात अर्थ नाही ही पक्की गाठ बांधून बाहुलीचा फ्रॉक मात्र सरळ स्टॅपलर चा प्रयोग करून दहा मिनिटात बनवला.

मग मात्र, पुढील मदतीचे हात येईस्तोवर अनोळखी पाण्यात गटांगळ्या खाण्यापेक्षा ओळखीच्या क्षेत्रात उडी मारायचं ठरवलं. लेक लहान असताना खास त्याच्यासाठी काही कविता लिहिल्या होत्या. त्याच्यासोबतच्या काही गोड क्षणांच्या आठवणी होत्या त्या.. काही मायबोलीतल्या, एखाद दुसरी इंग्रजी मधून. पुढील काही दिवस शब्दांशी झटापट करून त्यातल्या इंग्रजी कवितेचं मराठी भाषांतर लिहिलं ( बहुतेक पाहुणे मराठी भाषिक म्हणून) , आणि मग 'canva च्या मदतीने या सगळ्या कविता आणि लेकाचे फोटो असे फोटो कोलाज बनवले.





जसजसं कार्य दोन तीन दिवसांवर आलं तशी मुक्कामाला पाहुणेमंडळी येऊन ठेपली.अपूर्ण रुखवताची जटिल समस्या सोडवण्यासाठी ताज्या दमाच्या खेळाडूंनी आता मैदानात उडी घेतली होती! "आम्ही गुरुकुल बनवून देतो" इति लेकराची काका मंडळी. दिल्या वचनाला जागून तब्बल अर्धा दिवस खपून त्यांनी गुरुकुल बनवलं सुद्धा! मधेच त्याच्यासमोर ठेवायला सुपारीचे बटू बनवायची टूम निघाली. मूळ कल्पना अर्थातच गुगल महाराजांची.. पहायला अगदी सोप्पी वाटणारी.  "दोन सुपाऱ्या fevi quick ने चिकटवल्या, आणि हातापायाच्या जागी काजूच्या पाकळ्या लावल्या की झालं.. पटकन बनेल!" असं म्हणून सुरू केलेलं काम तब्बल अर्धा दिवस गेला तरी संपेना! "Fevi quick ने सगळं अगदी चुटकीसरशी चिकटतं" हा गोड गैरसमज दूर होऊन, "मुळात चुटकी वाजवणारी बोटंच चिकटतात" हे नवीन ज्ञान प्राप्त झालं! अशा प्रकारे सगळी बोटं चिकटल्यावर राहिलेला सगळा वेळ मी ती सोडवण्यात , आणि अतिशय हलक्या हाताने , निगुतीने ते बटू व त्यांच्यासमोरील ताटे बनवणाऱ्या लेकाच्या काकूला निरर्थक सूचना देण्यात सत्कारणी लावला! अखेर तीन चार fevi quick ची आहुती दिल्यानंतर व अनेक काजू पाकळ्या धारातीर्थीं पडल्यानंतर ,काही कललेले, काही जवळपास ताटावर कलंडलेले, काहीं लुकडे तर काही चक्क ढेरपोटे बटू बनून तयार झाले. राहता राहिला चॉकलेट चा अर्धवट अननस पार सुटा करून पुनश्च चिकटवण्यात यश आलं व मात्र यावेळी बेस म्हणून चक्क सर्जिकल gauze roll वापरून! रुखवतात मांडायला म्हणून हौसेने विकत घेतलेल्या गणपती बाप्पा ने ऐन वेळी कुठेतरी दडी मारली आणि त्याची जागा ऐन वेळी स्वहस्ते बनविलेल्या गणपतीने घेतली.



 









ही सगळी धुमश्चक्री युद्धपातळीवर चालू असताना नवरोबाने , प्रचंड दमून घरभर पालापाचोळ्यासारख्या भिरभिरणाऱ्या आणि कुरकुरणाऱ्या लेकराला योग्य वेळी झोपवण्यात यश मिळवून, रुखवताच्या यशात सिंहाचा वाटा उचलला. सगळं करून संपेस्तोवर अवघ्या घराला रणभूमीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. ठिकठिकाणी सुऱ्या, कात्र्यादि शस्त्रे आणि पुठ्ठे, रंगीत कागदांची कलेवरे विखुरलेली दिसायला लागली होती. " पाहुणे यायचेत अजून.. आवरा तो पसारा आता ! " ज्येष्ठ मंडळींचा चढा सूर लागलाच. " त्यात काय झालं? कळू देत त्यांनाही किती काम केलंय ते" इति आम्ही! मग मात्र ज्येष्ठांच्या पातळीवर विस्फोटक परिस्थिती ओढवण्याचे संकेत मिळाले,  आणि आत्तापर्यंत खिंड लढवून दमलेल्या सर्व वीरांनी पुन्हा एकदा कंबर कसून, सगळा पसारा घराच्या कानाकोपऱ्यात ढकलून देत घर आवरल्याचा बेमालूम देखावा निर्माण करीत हळूच तिथून काढता पाय घेतला.

खरी परीक्षा मात्र दुसऱ्या दिवशी सुरू झाली.  रुखवतासाठी बनवलेल्या चार पाच बटूंनी रात्रीतून अचानक अवयवदानाचा निर्णय घेऊन आपले काजू पाकळ्यांचे हात मुंग्यांना सुपूर्द केल्याने वेगळीच पंचाईत आली. त्यात चॉकलेट च्या बाहुली आणि अननसाला गोव्याचे हवामान मानवले नसावे. ओघळलेल्या चॉकलेटनिशी त्यांनी असहकार पुकारला. सरतेशेवटी ते थंड राहण्यासाठी थर्माकोल पेटी च्या पालखीतून, सोबत fevi quick, ग्लू गन, जास्तीच्या काजू पाकळ्या वगैरे सगळ्या लवाजम्यानिशी अगदी नव्या नवरीच्या इतमामात रुखवताची पाठवणी हॉल वर झाली.

मुंजीच्या आदल्या दिवशी, रुखवताची मांडामांड करताना उत्साही आप्तेष्ट व मैत्रिणीनी अगदी हौसेने चॉकलेट च्या माळा, मिठाईचं बनवलेलं तुळशी वृंदावन, बदामाच्या मुंडावळ्या, बटू साठी कविता वगैरे अगदी आग्रहाने रुखवतात मांडायला पाठवल्या. "मुंजीच्या आधी आठवडाभर अजिबात स्वयंपाकघरात लुडबुड करू नका " ही मी दिलेली तंबी पार धुडकावून लावत दोन्ही बाजूच्या आज्यांनी पदर खोचून ( अर्थात् माझ्या नकळत) बनवलेले कणकेचे व दाणे  चुरमुऱ्याचे लाडू मोठ्या दिमाखात आता रिकाम्या झालेल्या , सुबक अशा Ferrero rocher च्या बॉक्स मध्ये विराजमान झाले.

हो नाही करता करता दोन टेबल भरून रुखवत मांडलं गेलं, तेही एकही वस्तू बाहेरून न मागवता! कसं बरं दिसत होतं ते? छे .. परफेक्ट तर मुळीच नव्हतं. जागोजागी डिंकाचे ओघळ, स्टॅपलर च्या पिना मिरवणारं. पण त्या क्षणीं आत्तापर्यंत सगळ्या समारंभात पाहिलेल्या रुखवतापेक्षा सगळ्यात सुंदर वाटलं मला ते! माझ्या मुलाला जीव लावणाऱ्या, त्याच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या त्याच्या मायेच्या माणसांनी खास त्याच्यासाठी बनवलेलं. या सगळ्या माणसांचं माझ्या लेकावरचं प्रेम तरी कुठे परफेक्ट होतं? त्यातही भांडणं,रुसवे फुगवे, रडणं, चिडचिड, आरडाओरडा आणि क्वचित् एखादा धपाटासुद्धा होताच की!

ते रुखवत बनवण्यासाठी धडपडणाऱ्या, जिवापाड सांभाळून कार्यालयात नेणाऱ्या, नीट जोडून योग्य ठिकाणी ठेवणाऱ्या या सगळ्या माणसांसारखी , लेकाला सांभाळून घेणारी, जीव लावणारी, प्रसंगी कान धरून योग्य जागा दाखवणारी माणसं वेळोवेळी त्याच्या आयुष्यात येत राहोत हीच सदिच्छा!










18 comments:

  1. माधुरी, किती सुरेख आणि अगदी समर्पक वर्णन केलं आहेस गं. तूझ्या लिखाणाच्या प्रेमात च आहे मी.

    ReplyDelete
  2. व्वा... चित्र-दर्शी आणि चपखल वर्णन. खरंच, सुंदर, innovative कल्पना होत्या रुखवताच्या. काकू, काकालोक यांचेही मदतीचे हात होतेच... 👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks!! कल्पना अमलात आणायला भरपूर मदतीचे हात होते.. सगळ्यांनी जमून केल्यामुळे छान झालं!

      Delete
  3. खूप सुंदर लिहिलय.

    ReplyDelete
  4. अप्रतिम शब्दांकन

    ReplyDelete
  5. माधुरी अप्रतिम लेख! बटूंचे अवयवदान तर भन्नाटच कल्पना! रुखवत आणि लेख दोन्ही हटके!!!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! खरंच वेगळा अनुभव होता.. या आठवणी कायम राहतील!

      Delete
    2. Best barayla, Madhuri! Vaachtaana khup majja ayali ❤️ some of the metaphors were classic...

      Delete
  6. Wow 😲 apratim

    ReplyDelete