मेघालयमधील चौथा आणि शेवटचा दिवस, खरं तर शिलाँगसाठी राखीव ठेवलेला होता. परंतु, शहरी भागामधील वास्तव्यात पाहतां आणि अनुभवतां येणाऱ्या त्याच त्या गोष्टी करण्यापेक्षा, त्यापलीकडे जाऊन वेगळं काहीतरी पाहावं, अनुभवावं अशी सुप्त इच्छा मनात होतीच! आसपासच्या लोकांकडून मात्र, येथील चर्च, बाजार, संग्रहालय ह्यापलीकडे काही माहिती मिळेना. शेवटीं बरीच खोदून खोदून चौकशी केल्यानंतर काहीश्या अनिच्छेनेच ड्रायव्हर म्हणाला, " इथून साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर मौफालॉंगचं पवित्र जंगल (sacred forest) आहे. तिथं आत जाता येतं खरं, पण तुम्हाला खरोखरच जायचं आहे का? बरंच चालावं लागेल!" "बरंच म्हणजे किती?" मी पृच्छा केली. "साधारण पाचेक किलोमीटरचा trail आहे" तो म्हणाला. साधं पाच किलोमीटर चालण्याचा इतका बाऊ करण्याला, हसावं की रडावं हेच मला कळेना! "काही हरकत नाही, आपण जंगल पहायलाच जाऊ"असे म्हणतांच, अविश्वासाचा एक कटाक्ष टाकून त्याने आम्हाला तिथे न्यायचे कबूल केले.
A blog about everything that makes my day brighter, just like a steaming mug of coffee does!
Sunday, 15 May 2022
मेघांच्या माहेरा... भाग ४ (अंतिम)
जंगलापर्यंत जाण्याचा तासाभराचा प्रवास अतिशय नेत्रसुखद! नेहमी पाठपुरावा करणाऱ्या ढगांची साथ आजही होतीच! आज मात्र, दूर कुठेतरी आकाशात असलेली गंधाची कुपी त्यांनी उघडली असावी! त्यातून सांडलेल्या अत्तराची मातीवर मनसोक्त बरसात करीत मनमोहक सुगंधाची मुक्त उधळण ते आज करीत होते.
आल्हाददायक वातावरणातच त्या रस्त्याने आम्हाला जंगलाच्या नजिकच असलेल्या विस्तीर्ण माळापाशी आणून सोडले. येथे जंगलामध्ये जाण्यासाठी परवानगी काढावी लागते. खासी जमातीसाठी पवित्र असलेल्या ह्या जंगलात पर्यटकांना एकट्याने प्रवेश करण्यास परवानगी नाही. ह्या ठिकाणीच जंगलाच्या सफरीसाठी मार्गदर्शक, अर्थात गाईड मिळतात. हे गाईडदेखील खासी जमातीचेच!
"तुम्हाला पूर्ण सफर करायची आहे, की अर्धी?" तिथल्या माणसाने प्रश्न केला. "पूर्ण करू आम्ही!" मी उत्तरले. इथेही, काहीश्या अविश्वासानेच आमच्याकडे पाहत त्याने तिकीट दिले आणि एका माणसाला गाईड म्हणून आमच्यासोबत पिटाळले.
समोर पसरलेल्या माळावरून साधारण पाचशे मीटर चालत गेल्यावर आपण जंगलापाशी पोहोचतो. गंमत म्हणजे, पूर्णपणे नैसर्गिक असूनसुद्धा, ह्या जंगलाची हद्द अगदीं आखून दिलेली वाटते. त्यामुळेच की काय, प्रथमदर्शनीं हे जंगल, थेट हॅरी पॉटर मधल्या त्या निषिद्ध जंगलासारखे (forbidden forest), काहीसे गूढरम्य भासते!
"जंगलात शिरण्यापूर्वी तुम्हाला ह्या जागेची माहिती सांगतो" गाईड म्हणाला, "मौफालाँगचे हे जंगल खासी जमातीसाठी खूप पवित्र मानले जाते. ह्याचे कारण म्हणजे, खासी संस्कृतीप्रमाणे काही पूजाविधी आणि प्राण्यांचे बळी देण्याची प्रथा येथे पूर्वी चालत असे. आणि हो, आणखीन एक गोष्ट जंगलात आत जाण्यापूर्वी लक्षात ठेवा. ह्या पवित्र जंगलामधून कुणालाही काहीही नेण्याची परवानगी नाही. अगदी, एखादा दगड किंवा झाडाचे पान जरी इथून बाहेर नेलेत, तर ते तुमच्या स्वास्थ्यासाठी घातक ठरते असा येथील लोकांचा समज आहे." बोलत बोलत तो आम्हाला घेऊन त्या जंगलात शिरला.
ही माहिती ऐकून एव्हाना माझे कुतूहल जागे झाले होते. "हे बळी कशासाठी दिले जात? आता ही प्रथा चालू आहे की नाही?" मी त्याला प्रश्न केला. "मॅडम, त्याचं असं आहे. खासी लोकांच्या धारणेप्रमाणे मूर्तीमधल्या देवाला आम्ही मानीत नाही. मंदिरात जाऊन पूजाअर्चा, किंवा कर्मकांडही करीत नाही. हे जंगलच नाही, तर सर्वच जंगले, त्यामधली झाडेझुडपे, पक्षी, प्राणी, इतकेच काय, तर येथील जलसंपत्ती ह्या सगळ्यामध्ये ईश्वराचा वास आहे, अशी आमची श्रद्धा आहे. आणि म्हणूनच, ह्या श्रद्धेचे प्रतिक असलेले हे जंगल आम्ही पवित्र मानतो!" तो समरसून सांगत होता. "ह्या वनामध्ये असलेल्या वनदेवतेचीं दोन रूपे आहेत असा समज आहे. ह्या वनदेवतेच्या शुभ रूपाला ' लबासा' म्हणतात. हा बिबट्याचे रुप धारण करून येतो. येथील वनसंपदेचा हा संरक्षक आहे. वनदेवतेचे क्रुद्ध, अशुभ रुप मात्र एका सर्पाचे आहे! ह्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी वर्षातून एकदाच हे बळी दिले जायचे. आता मात्र ही प्रथा दर वर्षीं मौफालाँग गावाच्या रहिवासी भागात पार पाडली जाते. खासी जमातीच्या राजाकरवीं हे विधी पार पाडले जातात. विशेष म्हणजे, हा राजा येथील खासी जनतेमधूनच लोकशाही पद्धतीने निवडला जातो. पूर्वी जिथे हे बळी दिले जायचे, त्या जागी दगडी स्मृतिचिन्हें (monolith) आहेत, ती जाता जाता तुम्हाला दाखवेनच!" त्याने ग्वाही दिली.
त्याच्याशी गप्पा मारत आम्ही जंगलामधून जाणाऱ्या दगडी पायवाटेवरून चालत होतो. साधारण एकशे नव्वद एकर जमिनीवर पसरलेले हे जंगल तब्बल आठशे वर्षें जुने आहे. आजूबाजूला, सूर्यकिरणें सुद्धा आत शिरणार नाहीत, इतकी दाट झाडी, आणि थेट आकाशाला भिडणारे उंचच्या उंच वृक्ष! ह्या वृक्षांमध्ये सुमारें सहाशें वर्षें जुनीं रुद्राक्षाचीं विशाल झाडेंही दिसतात. जंगल अगदीं रंगीबेरंगी पानाफुलांनी नखशिखांत नटलेले! मधूनच, एखाद्या सजवलेल्या लग्नघरामध्ये नव्या नवरीचे कुंकवाच्या पावलांचे ठसे उमटवेत, तसा, ह्रोडोडेंड्राॅनच्या लालचुटुक फुलांचा सडा पडलेला! जंगलामध्ये कोल्हे, विविध प्रकारच्या खारी, शेकरू असे प्राणी आणि पक्ष्यांच्या असंख्य प्रजाती आढळतात. हिंस्त्र श्वापदें नाहीतच!
ही दगडी पायवाट जंगलामध्ये काहीं अंतरापर्यंत घेऊन जाते. ह्या वाटेवरच, बळीच्या विधीची तयारी करण्याची जागा, तसेच बळी देताना केल्या जाणाऱ्या पूजेचे स्थान आहे. ह्या दोन्ही ठिकाणीं दगडी स्मृतिचिन्हें आहेत. बळी देण्याच्या विधीपूर्वी सर्व हत्यारांना धार काढणे, इतर तयारी करणे ह्यासाठी एक विशिष्ट जागा आहे. एकदा ही सर्व तयारी झाली, की मग माघार नाही. तिथून पुढे ह्या तयारीमध्ये काही कमतरता आढळली तर वनदेवतेचा कोप होतो, असा समज आहे. पूजविधीच्या स्थानापाशीं ही पायवाट संपते. जंगलाची अर्धी सफर करणारे पर्यटक येथूनच मागे फिरतात.येथून पुढे कच्च्या वाटेने वाटचाल सुरू होते.
ह्या जागेभोवती आणि जंगलाभोवती फिरणाऱ्या अनेक दंतकथा इथे आणि आसपासच्या गावात प्रचलित आहेत. अशीच एक मान्यता म्हणजे, ह्या पवित्र वनामधून कोणतीही वस्तू बाहेर घेऊन जाऊ नये. तसें केल्यास तो वनदेवतेचा अपमान समजला जातो. असे करणारी व्यक्ती वनदेवतेच्या क्रोधास पात्र होऊन आजारी पडते, असे येथील लोक सांगतात. १९७० मध्ये येथून काही ओंडके बाहेर नेण्याचा भारतीय सैन्यदलाचा प्रयत्न, ट्रक जंगलामध्ये बंद पडल्यामुळे साफ फसला, अशीही एक आख्यायिका आहे. येथील खासी जमातीमधल्या पूर्वजांचे मृतात्मे ह्या जंगलामध्ये वास करून आहेत अशीही येथील लोकांची श्रद्धा आहे.
खरं- खोटं माहीत नाही, पण कानोकानीं पसरलेल्या ह्या आख्यायिका आणि पिढ्यान् पिढ्या रुजलेल्या परंपरा येथील मानवाचे निसर्गाशी असलेले गहिरे बंध पुन्हा एकदा अधोरेखित करतात. ह्या धारणांमागचा हेतू येथील निसर्गसंपत्तीचे संरक्षण करणे हाच असावा! माणूस बदलतो, धर्म बदलतो, तसतश्या आस्था आणि श्रद्धेच्या परिभाषादेखील बदलतात. वाचनात आलेल्या माहितीनुसार मेघालय मधील काही भाग धर्मांतराच्या चक्रात अडकून, तेथील लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे लोकांचीं मूळ श्रद्धास्थानें नष्ट झालीं. ह्या बदलत्या आस्थेमुळे मेघालयच्या ह्या इतर भागातली अश्या प्रकारचीं पवित्र जंगलें नष्टही झालेलीं आहेत! श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यामध्ये अगदीं पुसट रेष असते. येथे प्रचलित असलेल्या दंतकथांना शहराकडील विज्ञानाची कास असलेले शिकलेसवरलेले लोक कदाचित अंधश्रद्धा, भाकडकथा म्हणून हिणवतीलही. माझ्या लेखीं मात्र, नैसर्गिक समतोलाचे महत्त्व ओळखून ती साधनसंपत्ती मर्यादेत आणि गरजेपुरतीच वापरावी ह्याची जाणीव असलेल्या सूज्ञ खासी पूर्वजांनी घालून दिलेल्या ह्या रूढी- परंपरांएवढी डोळस श्रद्धा दुसरी कोणतीही नव्हती!
जंगलातल्या त्या कच्च्या वाटेने भटकंती करतां करतां तास दीड तास कसा गेला, हे समजलेही नाही. पुनश्च त्या माळावर पोहोचलो, तोवर सायंकाळ झालेली होती. ह्या माळावर तासन् तास शांत बसावे, समोरच्या ठेल्यावर मिळणाऱ्या वाफाळत्या ' मॅगी' चा मनसोक्त आस्वाद घ्यावा! तेथे बसलेलो असताना, तेथील एका पर्यटकाने केलेल्या, "अंदर देखनेलायक कुछ है, या सिर्फ ऐसे ही पेड - पौधे हैं?" अश्या कुत्सित सवालावर, "जंगलच आहे आत!" यापलीकडे मी काही बोलू शकले नाही. बहुतांश पर्यटक जंगलाची पूर्ण सफर का करू इच्छीत नाहीत, किंवा आम्ही पूर्ण trail करण्याची इच्छा दर्शवल्यामुळे येथील लोकांना आश्चर्य का वाटावे, ह्याचे कोडे आत्ता हळूहळू उलगडायला लागले होते. ह्यामध्ये चालण्याचे श्रम करण्याची अनिच्छा किंवा आळस हे कारण नसून, लोकांची जंगलाबद्दलची अनास्था आहे. "जंगलांमध्ये जाऊन काय पहायचं?" अशी काहीशी भावना ह्यामागे दिसून येते.
त्या माणसाच्या लेखीं ह्या जंगलामध्ये मनोरंजक, रोमांचक असं काही नसेलही. माझ्यासाठी मात्र हे जंगल, जगणं समृद्ध करणारा अद्वितीय अनुभव घेऊन आलं होतं. येथे हिरव्यागार रंगाच्या असंख्य रंगच्छटांची कोवळक होती, तशी, धुंद करणारा स्वर्गीय मृद्गंध घेऊन येणारी थंडगार वाऱ्याची झुळुकही होती. बासरीच्या स्वरांना लाजवेल असा पक्ष्यांचा किलबिलाट होता, तसाच त्या संगीताशीं सूर मिळवणारा झऱ्यांचा मंजुळ कलरवही होता! ठायीं ठायीं, सृष्टीने आपल्या कोठारातल्या खजिन्याची मुक्तहस्ताने केलेली लयलूट होती, पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, ह्या खजिन्याची किंमत ओळखून, रूढी- परंपरांचे कुंपण घालीत त्याला प्राणपणाने जपणारी, त्या ठेव्याताच ईश्वराला शोधणारी माणूसकीही होती!
मौफालाँगच्या त्या पवित्र जंगलामधून एक पानही उचलून बाहेर नेण्याची परवानगी नाही, हे माहीत असूनही, एक गोष्ट मात्र आम्ही तेथून घेऊन जात होतो, ती म्हणजे, त्या जंगलाच्या, मेघालयच्या आणि येथील संस्कृतीच्या, कधीही न विसरता येणाऱ्या आठवणींचा अमूल्य ठेवा!
Thursday, 5 May 2022
मेघांच्या माहेरा... भाग ३
मेघालयचा प्रवास निश्चित झाल्यानंतर, इंटरनेटवरून जी माहिती मिळवली, त्यामध्ये मेघालयच्या पश्चिमेकडील डौकी भागाबद्दल बरेच वाचनात आले होतें. म्हणूनच की काय, ह्या भागाला भेट देण्याविषयींं मनात बरीच उत्कंठा होती. त्यामुळे, "डौकीच्या बाजूला न गेलेलेच बरें, रस्त्याचे काम चालू असल्यामुळे रस्ता खूपच खराब आहे" असे टॅक्सी चालकाने सुचवतांंच माझा काहीसा हिरमोडच झाला. शेवटीं "जे होईल ते बघू" असे म्हणत, डौकीची वारी करायचीच असे ठरवले, आणि सकाळी सहाच्या सुमारास त्या दिशेने वाटचाल सुरू केली.
जैंंतिया डोंगररांगांच्या कुशीत वसलेला हा प्रदेश शिलॉंगच्या मानाने समुद्रसपाटीवरून काहीसा कमी उंचीवर आहे. त्यामुळे, जसजशी गाडी डौकीच्या जवळ जाते, तसतशी हवामानातली उष्णता काहीशी वाढत जाते. येथील उष्ण वातावरणामुळे ह्या भागात बऱ्याच ठिकाणीं नारळ , सुपारीच्या मोठ्ठाल्या बागाच बागा दिसून येतात. ह्याबरोबरच आंबे, केळी, मिरवेली आणि क्वचित् फणसाची लागवड केलेलीही दिसून येते. एकूणच ते उष्ण वातावरण, झाडेझुडपे, बागायती, ह्यामुळे क्षणभर, "आपण कोकणात तर नाही ना?" असा भास न झाल्यास नवलच!
चेरापुंजीच्या तुलनेत एक बदल मात्र येथे प्रकर्षाने जाणवतो. एक तर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे चहूकडे धुळीचे साम्राज्य मांडून ठेवलेले! चेरापुंजीच्या वाटेवरील डोंगरमाथे वृक्षवल्लींंनी समृृद्ध, हिरवेगार आहेत. इथेे मात्र बागाईत केेलेला भाग सोडला, तर डोंगर बऱ्याच ठिकाणीं पार उघडे बोडके वाटतात. कित्येेेक ठिकाणीं तर डोंगरांचे कडे ढासळलेलेही दिसतात. हे ढासळलेल्या कड्यांचे कोडेे काही केेल्या उलगडेना! "हेे काय गौडबंगाल आहे बाबा?" असे ड्रायव्हरला विचारताच त्यानेेे सांगायला सुरवात केली.
"मेघालयच्या ह्या भागात मोठ्या प्रमाणात कोळशाचा साठा होता. इथे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी डोंगर पोखरलेले दिसतील", तो डोंगरांमध्ये दिसणारी छोटी छोटी भुयारें दाखवत म्हणाला. "ह्या भुयारांमधून गेली बरीच वर्षे कोळसा काढण्याचे काम चालू होते".
"होते? मग आत्ता?" मी विचारले. "अहो मॅडम, बहुतेक ठिकाणी हे काम अवैधरित्या चालायचे. त्या भुयारामधून कामगार आत जाऊन कोळसा काढीत असत. हे जे कडे ढासळलेले दिसतात, ते ह्यामुळेच! काही वर्षांपूर्वी सरकारमार्फत ह्या सगळ्या प्रकारावर बंदी आली खरी, पण तरी इथून कोळसा काढणं काही थांबलं नव्हतं. आता मात्र कोळशाचा साठा हळूहळू संपत आलाय, म्हणजे निदान माणसांकरवी काढून घेता येईल असं काहीही शिल्लक नाहीये आत्ता. म्हणून सगळं थांबलंय! तो सांगत होता.
मी मात्र हे सगळं ऐकून अवाक् झाले! खनिज काढण्याच्या ह्या पद्धतीला "rat hole mining" म्हणतात. अश्या प्रकारच्या कामांमध्ये केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी मजूर भुयारात शिरायला तयार होतात खरे, पण हे करताना कित्येक मजुरांनी भुयारात फसल्यामुळे प्राणही गमावलेले आहेत. आणि हे असं असूनही आत्ता खाणकाम थांबलंय, ते केवळ कोळशाच्या अभावापायीं. माणसाच्या स्वार्थाला अंत नाही, हेच खरे!
डौकीपासून साधारण दहा किलोमीटर अंतरावर असतांनाच मालवाहू ट्रक्सच्या रांगाच रांगा दिसू लागल्या. काही वेळातच ट्रक्स ची गर्दी वाढत जाऊन वाहतूक जवळ जवळ ठप्प झाली. प्रत्येक ट्रक मध्ये बांधकामासाठी वापरात येणारे मोठ्ठाले दगड भरले होते.
"हा काय प्रकार आहे?" मी न रहावून विचारले. "मॅडम, इथून बांगलादेशची सीमा जवळ आहे. हे सगळे ट्रक बांगलादेशमध्ये व्यापारासाठी जाणारे आहेत. मेघालयमधील बऱ्याचश्या जमिनी सरकारी नसून, येथील रहिवाश्यांच्या खाजगी मालमत्ता आहेत. त्यामुळे, डोंगराळ भागामध्ये बऱ्याच ठिकाणी त्या डोंगरांचे कडे फोडून दगड काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालते. बांगलादेशात बांधकामासाठी उपयुक्त अश्या दगडांची टंचाई असल्यामुळे इथून हे दगड निर्यात केले जातात."
"मग ही वाहतूक कोंडी नेहमीचीच का?" मी प्रश्न केला. " हो, हे नेहमीचं आहे हल्ली! तो उद्गारला, "दररोज सुमारें एक हजार ट्रक्स भरून माल बांगलादेशला रवाना होतो." त्याचे शब्द कानावर पडत होते. डोकं मात्र ते सगळं ऐकून सुन्न झालं होतं! समोर धुळीच्या लोटात शेकडोंच्या संख्येने जाणारी मालवाहू वाहने, आणि आजूबाजूला, राजमुकट काढून घेतलेल्या शरणागत राजासारखा केविलवाणा भासणारा, तो लचके तोडलेला पर्वतराज, त्याच्यासोबत घडणाऱ्या अन्यायाची साक्ष देतच होते!
त्या कोंडीतून वाट काढत कसेबसे डौकी नदीच्या तीरावर पोहोचलो. डौकी नदी (जिला खासी भाषेत 'उमगोट' असेही नाव आहे) प्रसिद्ध आहे, ती तिच्या स्फटिकासारख्या निर्मळ, नितळ पाण्यासाठी! हे पाणी इतके स्वच्छ असते की साधारण वीस ते पंचवीस मीटर खोल पाण्याचा तळ आपण सहज पाहू शकतो. असे म्हणतात, की कमालीच्या पारदर्शकतेमुळे पाण्यावर तरंगणाऱ्या होड्या पाहताना, त्या हवेत तरंगल्याचा भास होतो.
आज मात्र, हा अद्भुत देखावा पाहण्याचे भाग्य आमच्या नशिबीं नव्हते. आदल्या दिवशींच पाऊस पडून गेल्यामुळे नदीचे पाणी काहीसे गढुळ झालेले होते. पण पाणी गढुळ असले, तरी नदी मात्र नितांतसुंदर! इथे होडीत बसून फेरफटका मारण्याचा मोह न झाला, तर नवलच! छोट्या छोट्या होड्या पर्यटकांना घेऊन पलीकडल्या तीरावर फिरवून आणतात. नावाडीही मोठे रसिक. नाव वल्हवतां वल्हवतां त्याच लयीत एकामागून एक जुनी- नवीन गीतें गुणगुणत सफरीत रंग भरणारे! मग मधूनच एखादा दिलदार पर्यटकसुद्धा, " कितना अच्छा गाते हो! आपको तो इंडियन आयडॉल मे होना चाहिए!" असे भरघोस कौतुक करीत त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवतो! नदीच्या पलीकडच्या बाजूला बांगलादेशची सरहद्द दिसते.
पाणी कापीत बोट हळूहळू किनाऱ्याला लागते. नदीचा किनाराही कमालीचा सुरेख. विविधरंगी ठिपक्यांची सुबक रांगोळी काढावी, तश्या असंख्य रंगीबेरंगी दगडगोट्यांनी सजलेला. पण ही रांगोळीदेखील पर्यटकांनी फेकलेली चिप्स ची पाकिटे, कोल्ड ड्रिंक चे कॅन आणि दारूच्या बाटल्यांनी विद्रूप केलेली!
होडीतून फेरफटका मारून परत फिरलो. मनात मात्र कुठेतरी, अलौकिक सृष्टिसौंदर्याची देणगी लाभलेला हा प्रदेश, माणसाच्या कर्मानेच उजाड, रुक्ष आणि प्रदूषित होत चाललाय ह्याचं शल्य बोचत होतं!
प्रवासाचा पुढचा टप्पा, म्हणजे आशिया खंडात सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळख निर्माण झालेलं " मौलीनोंग" हे गाव. "आता मौलीनोंगला जाताना वेगळ्या रस्त्याने जाऊ, म्हणजे ट्रॅफिक लागणार नाही" आमच्या मनातली धास्ती ओळखून ड्रायव्हर बोलला. विशेष म्हणजे, मौलिनोंगला जाणारा हा रस्ता बरोब्बर भारत - बांगलादेश सीमेशी समांतर रेषेत धावतो! "ही कुंपणापलीकडली शेतं दिसतात ना, ती बांगलादेश मधली आहेत!" तो म्हणाला.गंमत म्हणजे, ह्या भागात राहणाऱ्या बऱ्याच भारतीय लोकांच्या शेत जमिनी बांगलादेश मध्ये आहेत, तर, बऱ्याच बांगलादेशी लोकांच्या मालकीच्या जमिनी भारतात आहेत!
हमरस्त्यापासून काहीसा लांब असल्यामुळे ह्या मार्गावर फारशी वर्दळ नव्हती. डौकीच्या मुख्य मार्गावरून जातांना दिसणारे चित्र इथे मात्र पूर्णपणे पालटले होते! पुनश्च हिरवेगार दिसू लागलेले डोंगरमाथे, ठिकठिकाणीं खळाळत वाहणारे झरे, हे दृश्य डोळ्यांना सुखावणारे होते. साधारण दीड एक तासाचा प्रवास मौलीनोंग गावाच्या रहिवासी भागाच्या हद्दीपाशी घेऊन येतो. ह्या हद्दीपाशीच वाहनांसाठी पार्किंगची आणि पर्यटकांसाठी खाण्यापिण्याची सोय आहे. येथून पुढे, रहिवासी भागामध्ये जाण्यास वाहनांना पूर्ण मज्जाव आहे.
येथे मिळणाऱ्या साध्याच पण ताज्या अन्नाचा आस्वाद घेऊन गावाच्या हद्दीत प्रवेश केला. प्रामुख्याने खासी जमातीच्या लोकांची वस्ती असलेले हे गांव म्हणजे अक्षरशः एखाद्या परिकथेतील चित्रातून सत्यात उतरलेले वाटते. चालायला गुळगुळीत डांबरी समांतर रस्ते, दुतर्फा सावली देणारे वृक्ष, त्यामधून डोकावणारी इवलीशी कौलारू घरे, घरांसमोरील अंगणात अगदी मायेने जोपासलेल्या फुलबागा आणि ह्या सुंदर बागांमधल्या फुलांच्या ताटव्यांचेच रंग चोरून जणु शेकडों चिमुकलीं इंद्रधनुष्यें उडावीत तशीं भिरभिरणारीं फुलपाखरें! गावामधून वाहणाऱ्या झऱ्यांचे पाणी दैनंदिन वापरासाठी पाटामधून सगळीकडे फिरवलेले आहे.
गावचा परिसर अगदी आरशासारखा स्वच्छ ठेवलेला. ठिकठिकाणीं कचरा गोळा करण्यासाठीं बांबूच्या कचराकुंड्या आहेत. संपूर्ण गावात प्लास्टिकवर पूर्ण बंदी आहे. कचराकुंडीत जमलेला कचरा गोळा करून त्याचा खत निर्मितीसाठी वापर केला जातो.
विशेष म्हणजे, ह्या गावात ( आणि तसं पाहिलं तर मेघालय मध्ये सर्वच ठिकाणी) राहणाऱ्या खासी जमातीची संस्कृती प्रामुख्याने मातृसत्ताक आहे. इथल्या कायद्याप्रमाणे सर्व संपत्ती आणि जमिनीचा वारसाहक्क आईकडून सर्वात लहान मुलीकडे जातो. गावातील लोकांची गुजराण, रहिवासी भागाच्या हद्दीबाहेर असलेल्या सुपारीच्या बागायतीवर होते. गावात शाळा, बाजार, प्रार्थनास्थळें अश्या मूलभूत सोयी सोडल्या, तर बाकी सुखसोयी फारश्या नाहीतच! किंबहुना, येथील लोकांच्या अकृत्रिम, साध्या राहणीमध्येच त्यांच्या समाधानी जीवनाचे रहस्य दडले असावे!
मौलीनोंग मध्ये पाहण्यासारखी आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, येथील "living tree root bridge" म्हणजेच जिवंत वृक्षांच्या मुळांपासून घडलेला पूल. मौलीनोंगच्या वेशीपासून काही अंतरावरच एक छोटा धबधबा आहे. धबधब्याच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर जाण्यासाठी सुमारे दोन शतकांपूर्वी येथील खासी रहिवाश्यांनी मोठ्या कल्पकतेने ह्या पुलाची निर्मिती केली. ह्यासाठी झऱ्याच्या एका बाजूला असलेल्या रबर वृक्षांची मुळें जाणीवपूर्वक वाढवून विरुध्द दिशेला असलेल्या झाडांच्या मुळांमध्ये निगुतीने गुंफली गेली आहेत. त्यानंतर झाडे वाढून मोठी होईस्तोवर त्यांची काळजीपूर्वक निगा राखून हा पूल निर्माण केला आहे. म्हटल्यास पूर्णपणे नैसर्गक, म्हटल्यास मानवनिर्मित असलेला, साधारण पन्नास माणसांचे वजन पेलवू शकणारा हा पूल, निसर्ग आणि वास्तुशास्त्र ह्यांची सांगड घालून केलेल्या बांधकामाचा अद्भुत नमुनाच म्हणावा लागेल!
मौलीनोंगच्या ह्या जिवंत पुलापाशीं ह्या दिवसाची सफर तर संपली होती. ह्या सफरीत अनुभवलेल्या विरोधाभासामुळे माझे मन मात्र द्विधा मनःस्थितीत होते. एकीकडे झाडाच्या मुळांची घट्ट वीण घालीत एका अर्थीं मानव संस्कृतीची निसर्गाशी नाळ जोडणारे खासी पूर्वज आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन आजही निसर्गाचे जतन आणि संवर्धन करीत ते नातें घट्ट करणारे मौलीनोंगमधील रहिवासी, तर दुसरीकडे, आर्थिक विकासाच्या नावाखाली लयाला चाललेला डौकीचा नैसर्गिक ऐश्वर्याचा ठेवा! ह्या दोन मानवी प्रवृत्तींपैकी कोणती प्रवृत्ती तग धरेल, हे तर येणारा काळच सांगू शकेल. पर्यटन आणि व्यापार ह्या मेघालयच्या आर्थिक प्रगतीसाठी वरदान ठरलेल्या दोन्ही गोष्टी येथील निसर्गचक्रासाठीच नाही, तर येणाऱ्या पिढ्यांच्या अस्तित्वासाठीही अभिशाप ठरतील की काय, ह्याचा सारासार विचार करणे गरजेचे आहे. निसर्ग देतो, अगदीं भरभरून देतो. पण म्हणून आपण किती ओरबाडून घ्यायचं ह्याचा विचार शेवटीं आपणच करायला हवा, नाही का?
कडु- गोड अनुभव गाठीशी बांधीत मेघालयच्या प्रवासातला अजून एक दिवस संपला होता. शिलाँगला निघालो, ते मात्र, ह्या घडीला अंशतः का होईना, सुखरूप असलेला मेघालयचा अमूल्य नैसर्गिक ठेवा, यापुढेही असाच अबाधित राहील का, ही हुरहूर मनात घेऊनच!
Subscribe to:
Posts (Atom)