आंतरजालाची ही दुनिया
जनाजनातील मिटवी अंतर,
क्षणांत घडवी सफर जगाची
भ्रमणध्वनीचे जंतर मंतर
"करमध्ये नव सरस्वती", अन्
तिचे नवनवे आविष्कार
बोट फिरविता जेवण पुढती,
चुटकीसरशी हो व्यवहार
घरबसल्या कोणीही आता
निमिषामध्ये पैसे कमवी,
क्षणांत तुमची आज्ञा मिळता
अरिजित - सोनू मैफिल जमवी
चक्रे फिरती वेगाने, अन्
स्वस्थतेमध्ये रामच नाही,
क्षणार्धात बघ सारे होते,
थांबायाचे कामच नाही
जरी जाहले जीवन सोपे
जगण्यामधला विरला श्वास,
हरवल्यापरी वाटे काही
वेगाचा नडला हव्यास
शेवटचा कधी पाय ठेवला
ओल्या मातीमध्ये काळया?
कधी मारुनी यथेच्छ गप्पा
हातावरती दिल्यास टाळ्या?
मुक्त हासता कधी तुझ्या रे
डोळ्यामध्ये आले पाणी?
सुर- तालाची सोडुन चिंता
गायलीस केव्हा रे गाणी?
ओरडता पोटात कावळे
जोवर वाट न बघशी थोडी,
कशी चाखशी साध्या भाकर-
भाजीची तू अवीट गोडी?
पळभर थांबून भव्य मनोरा
स्वप्नांचा रे कधी बांधला?
बटण दाबल्याविना कधी रे
शेवटचा संवाद साधला?
खरे-खुरे क्षण अनुभव आता
आभासाच्या पल्याड जाऊन
अंतरांस करताना काबीज
अंतरातही बघ डोकावुन
- माधुरी
