Friday 6 September 2024

कलियुगातील भक्ताची प्रार्थना

मागणे इतुकेच अमुचे 
ऐक तू नारायणा
कलियुगीं आम्हास दे
तव शक्ती शत्रु निवारणा 

देश धर्माला बुडविण्या 
दैत्य ऐसे माजले
कुटिलबुद्धी पाहुनी ती
लक्ष रावण लाजले

सरळमार्गी राम होऊन
त्यांस निपटावे कसे
शिकवि आम्हा युक्ति ती
जी देई जैश्यासी तसे

दे नृसिंहाच्या बळा, अन् 
त्यापरी चातुर्यही
धूर्ततेला लपवी ऐसे
मोहिनी माधुर्यही

वामनाची बुद्धी दे, जी
कार्य साधी गोडिने 
मोहनाची दे लबाडी
खोड मोडू खोडिने 

मार्ग आम्हा दावण्या तू
सांग रे गीता नवी
देई वृत्ती, वाकुड्यासी 
वाकुडे जी वागवी

उशिर झाला फार रे
अवतार तुजला धारण्या
आम्हीच कलकी होऊ रे
आता कलीला मारण्या



- माधुरी 


10 comments:

  1. क्या बात है. एकदम कमाल

    ReplyDelete
  2. माधुरी, अगं किती सुरेख आणि अर्थपूर्ण कविता लिहिली आहेस. गदय, पदय दोन्ही लिखाणात तु एक नंबर.

    ReplyDelete
  3. सुंदर आणि छान शब्दात माधवाला घातलेले साकडे वा गा-हाणे ! उशीर झाला फार रे, आता नको येऊस. तुझं काम पूर्ण करण्यास आम्हीच कल्की होऊ रे हेआव्हान मात्र स्वीकारायलाच हवे !

    ReplyDelete
  4. Va Madhuri..mastach lihilay

    ReplyDelete
  5. Bhavita vyachi kalpana ekdam zakas
    Chhaan

    ReplyDelete