Sunday, 15 June 2025

झुकझुक गाडीच्या गावाला...

हिमालय तुमच्यावर एक वेगळीच जादू करतो. "अतिपरिचयादवज्ञा "  हे तत्व हिमालयाच्या बाबतीत सपशेल खोटं ठरतं ही गोष्ट दोन तीन वर्षात आलेल्या  ट्रेकिंग च्या अनुभवातून मला पक्की समजली आहे . एकदा का त्याच्या भेटीला गेलात, की तो पुन्हा पुन्हा साद घालतो, आणि प्रत्येक भेटीत तुम्हाला नव्याने त्याच्या प्रेमात पाडतो. मला मात्र या वर्षी  काही कारणाने ट्रेकिंग शक्य नव्हतं. त्यामुळे गळाभेट नाही, पण निदान डोळभेट तरी व्हावी, या हेतूने ठरवलेला  हिमाचल प्रदेशचा दौरा  ' बरोग ' नावाच्या स्वप्नांच्या गावी घेऊन गेला. 


पहिल्यांदाच एखाद्या ठिकाणी गेल्यावर, तेथील प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत रेल्वे स्टेशन चं नाव पाहिलं आणि गंमत वाटण्याबरोबरच कुतूहलही वाटलं! ड्रायव्हर ला घेऊन गुगल मॅप वाल्या बाईसाहेबांच्या सूचनांनुसार स्टेशन च्या ठिकाणी पोहोचलो खरं, स्टेशन मात्र गायब ! हॅरी पॉटर मधल्या हॉगवर्ड्स एक्सप्रेस चा प्लॅटफॉर्म,  ९ आणि १० नंबर प्लॅटफॉर्म च्या मधल्या भिंतीत दडलेला असतो. त्या भिंतीतून आरपार गेलं की तो अवतरतो. इथे मात्र, अख्खं स्टेशनच डोंगरालगतच्या घाटीत  बेमालूम दडलेलं! 






नुकत्याच आलेल्या पावसाच्या हलक्याशा सरीने आणलेला गारठा हवेत भिनलेला... म्हणजे हाडं गोठवणारी, बोचरी थंडी नव्हे, तर उबदार जॅकेटच्या खिशात हात घालून " चला भटकायला! " म्हणणारी,  वाफाळत्या चहाची लज्जत वाढवणारी गुलाबी थंडी. दुतर्फा असंख्य दीपमाळा उभ्या असल्याचा आभास निर्माण करणाऱ्या चमत्कारिक आकाराच्या पाईन च्या झाडांनी वेढलेली चिंचोळी नागमोडी वाट डोंगराच्या उतरंडीला नेते. 






वाटेवर ठिकठिकाणी गुलमोहराच्या फुलांची अप्रतिम वेलबुट्टी साकारलेली. गुलमोहराचं झाड माझं अतिशय लाडकं! पण आपला दक्षिणेकडचा गुलमोहर म्हणजे  फटाकड्याच्या लडीसारखा भडक, बघताक्षणी लक्ष वेधून घेणारा... एखाद्या षोडशवर्षीय रूपगर्वितेसारखा चारचौघात उठून दिसणारा. निळसर जांभळ्या फुलांची पखरण करणारा येथील पहाडी गुलमोहर मात्र निराळाच - पौर्णिमेचं चांदणं जसं सभोवतालच्या परिसरात सामावून देखील शांतपणे स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत राहतं ना, अगदी तसाच! एखाद्या संयमी गृहलक्ष्मीसारखा -  सौम्य, सुहास्य, सुप्रसन्न! त्याचं नावही तसंच सुरेख " नील मोहर"!




या नीलमोहराच्या फुलांच्या निळ्या पायघड्यांवरून चालताना वाटेत कुठे झाडांच्या बुंध्यापाशी, तर कुठे एखाद्या झुडपाच्या जाळीत दडलेला अनोखा खजिना सापडतो.  देव्हाऱ्याच्या घुमटीसारख्या रेखीव, सुबक अशा पाईन कोन्स चा.  हिमालयात भटकताना, विशेषतः ट्रेकिंग करताना बऱ्याच ठिकाणी हे पाईन कोन्स सापडतात. समुद्रकिनारी हट्टाने शंख शिंपले गोळा करणाऱ्या एखाद्या शाळकरी पोराच्या उत्साहाने प्रत्येक वेळी " लेकासाठी  नेतेय " च्या नावाखाली मी ते गोळा करत असते. 


झाडाझुडपांशी हितगुज करत नकळतच पायाखालची वाट संपते, आणि अगदी परिकथेत  शोभून दिसावं असं ते देखणं रेल्वे स्थानक समोर येतं. स्टेशन च्या एका बाजूला नीलमोहराच्या रंगाशी स्पर्धा करणारा चमकदार निळ्या रंगाचा चिमुकला बोगदा. काळेभोर नाग सळसळत बिळात शिरावेत, तसे त्या बोगद्यात शिरणारे दोनच narrow gauge चे रूळ.  फलाटाच्या एका बाजूला टपरीवजा दुकान, तर दुसऱ्या बाजूला कॅन्टीन आणि एक छोटेखानी ऑफिस, एवढाच काय तो या स्टेशनचा सरंजाम.












काहीं वेळाने " बाजू हटो.. गाडी आ गयी! " अशी स्टेशन मास्टर ची आरोळी गाडी आल्याची वर्दी देते, आणि कालका - बरोग - शिमला या मार्गावर चालणारी खास टॉय ट्रेन  स्टेशन ला येऊन ठेपते. या इवल्याश्या ट्रेनची गती इतकी संथ, की ट्रेन स्टेशनवर येत असताना ट्रेनमधल्या प्रेयसीने दरवाज्यातून हात बाहेर काढावा, आणि ट्रेन बोगद्यात  शिरेपर्यंत , फलाटावर उभ्या असलेल्या तिच्या प्रियकराने तो हातात घेऊन मनसोक्त गप्पा मारत तिला निरोप द्यावा! इतर स्टेशनवर असलेला गजबजाट, सामान सांभाळत, धक्काबुक्की करत कसंबसं डब्यात चढण्याची धडपड, या फलाटावरून त्या फलाटावर जाताना उडालेली तारांबळ, कर्णकर्कश आवाजातल्या सूचना या सगळ्याचा इथे लवलेशही नाही. स्टेशन, ट्रेन, बोगदा - सगळं कसं इतकं गोंडस, की या झुकझुक गाडीच्या मार्गावर ज्या मुलांच्या ' मामाची गावं ' वसली असतील, त्या मुलांच्या भाग्याचा हेवा वाटावा!  बरोग गावाच्या अवतीभवती असलेली इतर प्रेक्षणीय स्थळं बघण्यापूर्वीच या स्टेशनने मला आपल्या आणि पर्यायाने या गावाच्याही निव्वळ प्रेमात पाडलं होतं. 


तसं पहायला गेलं तर बरोग हे हिमाचल प्रदेश मधलं आडवळणी गाव.गावात मूलभूत सोयीसुविधा असल्या तरी सुखसोयी फारशा नाहीतच. साध्या रेल्वेचंच उदाहरण पाहिलं, तर चांगली दहा पंधरा मिनिटं तंगडतोड केल्याशिवाय गती नाही. मुख्य बाजार आणि वैद्यकीय सोयीसाठी सुद्धा या मंडळींना सोलन सारख्या मोठ्या शहराशिवाय पर्याय नाही. या दैनंदिन संघर्षामुळेच की काय, इथल्या माणसांना पदरीं पडलेल्या सुखाची किंमत आहे. शरीरात कष्ट करण्याच्या सवयीने आलेली चपळता आहे. बोलण्यात मार्दव आणि वागण्यात अगत्य आहे. 


इथे जटोली शिव मंदिर, मोहन शक्ती हेरिटेज पार्क, रीवा धबधबा यांसारखी एकसे एक प्रेक्षणीय स्थळं आहेत, पण बहुतेक सगळी बरोग पासून साधारण दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सोलन शहरानजीक. त्यामुळे बरोगमध्ये पर्यटकांची वर्दळपण अंमळ कमीच. एक रेल्वे स्टेशन सोडलं, तर खुद्द बरोग मध्ये पाहण्यासारखं असं काहीच नाही. पण अनुभवण्यासारखं मात्र पुष्कळ आहे.


इथल्या स्टेशनवर गाड्या पाहत तासन् तास घालवावेत , इथल्या वाटांवरून पाय दुखेस्तोवर भटकावं, , इथल्या पाना फुलांशी गुजगोष्टी कराव्या, प्रवासामध्ये पाहण्यासारख्या कुठल्याही स्थळांची यादी न करता, हे गाव डोळ्यांनी मनसोक्त पिऊन घ्यावं. टूथब्रश पासून साडी पर्यंत आणि औषधांपासून ते किरण्यापर्यंत सगळं घरपोच आणून देणाऱ्या ॲप्स च्या भडिमाराने, सोशल मीडिया च्या गजबजाटाने , अत्याधुनिक क्लब आणि मॉल्स च्या लखलखाटाने,  अवघ्या काही तासात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या विमान प्रवासाच्या वेगाने, चुटकीसरशी वाट्टेल ती माहिती क्षणार्धात समोर आणून ठेवणाऱ्या इंटरनेट च्या जंजाळाने ' फास्ट ' आणि ' ईजी ' झालेल्या आपल्या आयुष्यातून हद्दपार झालेली, जगण्याला जिवंतपणा देणारी एक संथ लय इथे गवसते.


ती हळुवार लय इथल्या झुकझुक गाडीतच नाही, तर इथल्या दऱ्या खोऱ्यात आहे, सुगंधी वाऱ्याच्या झुळुकेने डोलणाऱ्या इथल्या पाईन च्या झाडात आहे, इथल्या नील मोहराच्या सड्यात आहे, आग्रहाने वाढलेल्या गरमागरम पराठे आणि ' राजमा मद्रा ' च्या सुवासात आहे, इथल्या घाटवाटांमधून केलेल्या निरुद्देश भटकंतीत आहे आणि इथल्या पहाडी लोकांच्या मधाळ वागण्याबोलण्यातही आहे!  इथल्या वास्तव्यात ती जाणवते, अलगद आपल्यात झिरपत राहते, आजूबाजूला पहायला शिकवते, क्षणभर थांबायला शिकवते.  निव्वळ एक दोन दिवसाच्या वास्तव्यात बरोग आपल्याला मनमुराद जगायला लावतं... आपल्यातली ती हरवलेली लय शोधण्यासाठी बोलवत राहतं-  पुन्हा एकदा.. पुन्हा एकदा...


-- माधुरी