मार्च महिना संपत आला, आणि अखेर लेकराची ( म्हणजे पर्यायाने माझीही) परीक्षा संपली. निव्वळ योगायोगाने मला, नवरोबाला आणि आमच्या मित्रमंडळीना एकत्र मोकळा वेळ मिळाला, आणि उत्तर कर्नाटक मधील सिरसीची वारी करायचे वेध लागले. रविवारी सकाळी साधारण साडेदहाच्या सुमाराला गोव्याहून निघून चार साडेचार वाजता सिरसीला मुक्कामस्थळी पोहोचलो.
सिरसी पासून साधारण २४ किलोमिटर अंतरावर असलेल्या बनवासी गावातील मधुकेश्वर मंदिराबद्दल बरेच ऐकले होते. पण मुळात पोहोचायला झालेला उशीर बघता, मंदिर किती वाजेपर्यंत खुले असेल, याविषयी शंकाच होती. शेवटीं, वाटेतच भेटलेल्या एका पोलीस बाईंपाशी रस्ता आणि वेळेची चौकशी करावी म्हणून आम्ही थांबलो. आता चौकशी करावी म्हटलं तर बाईंचं गाडं कन्नड शिवाय पुढे सरकेना! अस्मादिकांनी चार वर्षे कर्नाटकात घालवून सुद्धा आमचं कानडी "स्वल्प स्वल्प बरतेती" च्या पुढे कधी गेलं नसल्यामुळे, शेवटी खाणाखुणांच्या वैश्विक भाषेतील संवाद साधत- "मंदिर सात पर्यंत खुले असेल" हे ज्ञान प्राप्त करून घेतले, आणि बाईंकडून "सिद्धा होग री" चा ग्रीन सिग्नल मिळवला.
हिरव्यागर्द वनराईमधून वळणे घेत अखेर "बनवासी" गाव गाठले. असं म्हणतात, की रामायण काळात प्रभू श्रीराम, तसेच, महाभारत काळात पांडवांनी याच स्थानावरून वनवासासाठी प्रयाण केलं होतं. म्हणूनच या जागेचं ' वनवासी ' , म्हणजेच पर्यायाने ' बनवासी' असं बारसं झालंय.
गाडी मंदिराजवळ पोहोचली, तोवर सायंकाळचे साडेपाच वाजले असतील. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी लक्ष वेधून घेतले, ते मंदिराच्या भव्य रथांनी. लवकरच संपन्न होणार असलेल्या रथोत्सवासाठी त्यातील दोन रथ साजवण्याचे काम चालू होते. दोन्ही रथ भव्यदिव्य, आणि सुंदर नक्षीकाम असलेले. परंतु आमच्या नजरेत भरला तो, आता वापरात नसलेला, अतिभव्य परंतु कमालीची देखणी कलाकुसर असलेला जुना रथ. नवीन रथ सुबक असले, तरी या जुन्या रथाच्या लाकडाचा गडगंज भरीव थाट निराळाच होता! बायकांच्या घोळक्यात एखाद्या कुलीन घरंदाज स्त्रीचं व्यक्तिमत्त्व बघताक्षणी नजरेत भरावं ना, अगदीं तसाच! तब्बल सव्वा चारशे वर्षे जुना असलेला हा लाकडी रथ अगदीं गेल्या वर्षीपर्यंत वापरात होता असं कळलं. साधरण शंभर टन वजन, एकवीस फूट उंची व तेवीस फुटाची रुंदी असलेल्या या अवाढव्य रथाला ओढण्यासाठी दोन हजारपेक्षा अधिक माणसे दरवर्षी येथे जमतात. सोळाव्या शतकात कर्नाटकच्या प्रसिद्ध ' सौंदे ' राजघराण्यातील राजे रामचंद्र नायक सौंदे यांनी वसंतोत्सवाच्या निमित्ताने मधुकेश्वराच्या चरणी अर्पण केलेले हे 'महास्यदान' आजच्या घडीला मात्र देवालयाच्या प्रांगणात विश्रांती घेत, गतकाळाच्या वैभवाची साक्ष देते आहे.
देवालयात प्रवेश केला, तेव्हा फारशी वर्दळ नव्हती. आजन्म शंकराच्या प्रतीक्षेत उभा असलेला, सात फूट उंचीचा विशालकाय नंदी, मंदिरात प्रवेश घेण्यापूर्वीच नजरेत भरतो. नंदीकडे जवळून निरखून पाहिल्यानंतर मात्र त्याची मान किंचित एका दिशेला वळलेली असल्याचे जाणवले. "असं तिरक्या नजरेने पाहणारा नंदी का बरं घडवला असेल शिल्पकारांनी?" हा विचार डोक्यात रुंजी घालत असतानाच, देवालयात दर्शनासाठी गेलो.
गर्भगृहात स्थापन केलेल्या मधुकेश्वराच्या शिवलिंगाला काही खास पूजेनिमित्त चांदीचा मुखवटा चढवला होता. तेथील गुरुजींनी " कुठून आलात?" अशी आस्थेने चौकशी करीत, " तुमची इच्छा असेल, तर पूर्ण मंदिराची माहिती सांगतो" अशी ग्वाही दिली. "देवालय बंद झालेले नसू देत" एवढीच माफक अपेक्षा बाळगून आलेल्या आमच्यासाठी, हे म्हणजे, ' आंधळा मागतो एक डोळा, आणि देव देतो दोन ' असं झालं! पुढचा तब्बल पाऊण एक तास अजिबात न कंटाळता, त्यांनी पूर्ण देवालयाचा फेरफटका मारत, देवालय, त्याचं बांधकाम, त्यामागचा इतिहास, याबद्दल इत्थंभूत माहिती सांगितली.
पुराणकाळात मधु आणि कैटभ या दोन दैत्यांना देवी दुर्गेचा वर मिळाला, की जोपर्यंत त्यांची इच्छा नसेल, तोपर्यंत त्या दोघांना कोणी मारू शकणार नाही. सहाजिकच, त्या वराने उन्मत्त झालेल्या या दोन्ही दैत्यांचा वध करण्याचा साक्षात नारायणाने कित्येक दिवस निष्फळ प्रयत्न केला. अखेर , या राक्षसांसमोर केवळ शक्तीचा उपयोग करून काहीही साध्य होणार नाही, हे मुळातच चाणाक्ष असलेल्या भगवान् विष्णूंनी ओळखले, आणि चक्क कूटनीतीचा प्रयोग करीत, सपशेल शरणागती पत्करली! म्हणाले, " तुमचे सामर्थ्य पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुम्हाला हवा तो वर मागा." मुळात गर्विष्ठ, त्यात हरभऱ्याच्या झाडावर चढलेल्या त्या दैत्यांनी मात्र, श्री विष्णूंची हेटाळणी करीत, "तू आम्हाला काय वर देणार? उलट तूच आमच्याकडे वर माग" अशी बढाई मारली. ही संधी साधून, विष्णूंनी वर म्हणून दोन्ही दैत्यांचे प्राण मागितले. वचनबद्ध असल्यामुळे मधु आणि कैटभ यांनी आपले प्राण विष्णूंना अर्पण केले. असं म्हणतात, की दोन्ही असुरांचा वध केल्यानंतर, त्यांच्यातल्या शिवभक्ताचा मान राखण्यासाठी, स्वतः श्री विष्णूंनी येथील मधुकेश्वर आणि शिमोगा जिल्ह्यातील कैटभेश्वर या दोन शिवलिंगाची स्थापना केली.
या मंदिराच्या बांधकामाचा इतिहासही तितकाच रंजक आहे. नवव्या शतकात कदंब राजवटीत बांधलं गेलेलं हे मंदिर. पण असं असलं, तरी त्यानंतर या प्रदेशावर अधिपत्य गाजवणाऱ्या प्रत्येक राजघराण्याने मंदिराच्या विस्तारात आपला हातभार लावला आहे. पूर्वापार मुखोद्गत केलं गेलेलं, आणि प्रत्येक पिढीने आपापली भर टाकत वर्षानुवर्षं जीवंत ठेवलेलं एखादं अजरामर महाकाव्य असावं, तसं हे पुरातन मंदिर गेल्या कित्येक पिढ्यांमधल्या राजकीय स्थित्यंतराच्या खाणाखुणा अंगावर मिरवत दिमाखात उभं आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वारापाशीच, ऋषी मुनींच्या मुखातून वेदमंत्रांचा उद्घोष व्हावा, तसा धीरगंभीर ॐकाराचा नाद करणारी पंचधातूची भली मोठी घंटा आहे. गर्भगृहाच्या बाहेर चार वेगवेगळे मंडप - दर्शन मंडप, नृत्य मंडप, त्रिलोक मंडप आणि बसव मंडप म्हणजेच नंदी मंडप. सातवाहन, चालुक्य, होयसळ, सौंदे अशा वेगवेगळ्या राजघराण्याच्या परंपरेप्रमाणे प्रत्येक मंडपाची स्थापत्यशैली निराळी आणि वैशिष्टयपूर्ण.
नंदी मंडपातला नंदी अजस्त्र असला, तरी विलक्षण देखणा.. मुद्रेवर सात्विक भाव असलेला! हा म्हणे मान काहीशी तिरकी करून, एकाच वेळी, एका डोळ्याने शंकराला, तर दुसऱ्या डोळ्याने बाजूच्या मंदिरात उभ्या जगज्जननी पार्वतीला पाहतोय. बांधकाम सुद्धा इतके अचूक, की या दोन्ही गर्भगृहामधून नंदीकडे पाहताना मंदिराच्या अनेक खांबांपैकी एकाही खांबाचा अडसर मध्ये येत नाही. जितकं कौतुक बांधकाम आणि शिल्पकलेचं करावं, तितकाच वाखाणण्याजोगा या शिल्पकारांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विचारपूर्वक कार्यशैली. शिव आणि पार्वती या दोघांच्या मूर्तीसमोर नंदीच्या दिशेने पाय न येऊ देता साष्टांग नमस्कार कसा करावा याची योग्य पद्धत चक्क जमिनीवर कोरून ठेवली आहे.
दर्शन मंडपाच्या एका बाजूला श्रीमधुसूदन म्हणजेच भगवान् विष्णूंची शंख - चक्रधारी मूर्ती स्थापन केलेली आहे. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे, असुर निर्दालन करण्यासाठी सज्ज अशी, संहार मुद्रेत चक्र धारण केलेली ही मूर्ती आहे. मंदिराचे आराध्य दैवत श्री शंकर असले तरी श्री मधुसूदन मंदिराच्या प्रमुख दैवतांपैकी एक मानले गेलेले आहेत. त्यामुळे हिंदू संस्कृतीमधल्या शैव, शाक्त्य आणि वैष्णव या तिन्ही प्रवाहांचा इतर कुठेही सहसा न दिसणारा सुंदर संगम या मंदिरात दिसतो.
नृत्य मंडपाच्या सभोवती चालुक्य कालखंडातील अप्रतिम कारागिरी असलेले चार स्तंभ उभारलेले आहेत. एकाच वेळी उलट- सुलट अशी दोन प्रतिबिंबे दाखवणारे पाषाणी दर्पण स्तंभामध्ये उभारण्याची किमया साधत या अज्ञात शिल्पकारांनी प्रत्यक्ष मयासुरालाही बोटे तोंडात घालायला लावेल अशी प्रति- मयसभाच जणु इथे निर्माण केलेली आहे. तर, स्वर्ग , मृत्यु व पाताळ अशा तिन्ही लोकांचं चित्रण त्रिलोक मंडपामध्ये मोठ्या कौशल्याने केलेलं आहे.
मंदिराबाहेरील प्रांगणात आठ दिशांचे अधिपती स्थापन केलेले आहेत. इतर काही मंदिरांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या मूर्ती स्थापन केलेल्या पाहायला मिळतात. पण येथील खासियत म्हणजे, इथे मात्र या सगळ्या देवता सपत्नीक आणि सवाहन मधुकेश्वराचा पाहुणचार घ्यायला आलेल्या आहेत. याला अपवाद म्हणजे मंदिराच्या उजवीकडे स्थापन केला गेलेला ' अर्ध गणपती '. शरीराचा केवळ अर्धा भाग असलेला हा गणपती ब्रह्मचारी अवस्थेतील आहे. असं म्हणतात की या मूर्तीचा राहिलेला अर्धा भाग रिद्धी- सिद्धी या दोन्ही पत्नींच्या वाट्याचा असून, हा वाराणसीमध्ये स्थापित आहे. या सर्व देवतांसमवेत निरनिराळे राजे - राजवाडे, संत - महंत यांनी भारतातील कित्येक तीर्थक्षेत्रांमधून तेथील देवतांच्या मूर्ती आणून येथे स्थापन केलेल्या दिसतात.
मंदिर परिसरात फेरफटका मारता मारता तिन्हीसांजा कधी झाल्या कळलं सुद्धा नाही. उन्हातान्हात खेळून दमून घरी आलेल्या लेकराला जवळ घेऊन आईने हळुवार चेहऱ्यावरून हात फिरवावा, आणि क्षणार्धात तो शीण कुठल्याकुठे पळून जावा, तशी थंडगार झुळूक कुठूनशी मंदिरात शिरली होती. अंधार पडायला लागलेला असूनही तिथून पाय निघत नव्हता. एखाद्या जुन्या मित्राला बऱ्याच दिवसांनी भेटून यथेच्छ गप्पा मारल्यानंतर, "आता निघतो" असं म्हणत पुन्हा अर्धा तास दरवाज्यात रेंगाळत राहावं, तसं काहीसं झालं होतं. निरोपाची वेळ झाली, तरी अश्मात कोरली गेलेली, इतिहासातल्या एका समृध्द पर्वाची गाथा मनावरही कायमची कोरली गेली होती.
म्हणतात ना, घणाचे घाव पडतात तेव्हाच मूर्ती साकारली जाते. पण त्या घणाचे घाव घालणाऱ्या हातामध्ये दिव्यत्व असेल, तर काळया कातळातसुद्धा प्राण ओतले जातात, आणि मग दगडातही देव सापडतो!