नुकताच पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात दुर्गारोहण संबंधी काहीं शॉर्ट फिल्म पाहण्याचा योग आला. तसे निवडलेले सर्वच चित्रपट अतिशय उत्कृष्ट आणि थरारक! पण माझं लक्ष वेधून घेतलं ते मात्र, " फ्रॉम माय विंडो" या लघुपटानं.
खरं तर ही, मलीसा सिम्पसन नावाच्या कॉलोराडो मधल्या एका साध्यासुध्या, स्वप्नाळू मुलीची गोष्ट. दिसायला चारचौघींसारखीच , पण कित्येक वर्षे "सेरेब्रल पाल्सी" या , शरीराचे बहुतेक स्नायू निकामी करणाऱ्या मेंदूच्या दुर्धर आजाराने ग्रासलेली ही मुलगी! असाध्य रोगामुळे झालेलं वाचा आणि मेंदूचं कायमचं नुकसान, त्यामुळे सहन कराव्या लागणाऱ्या शारीरिक आणि भावनिक परिणामांमुळे कायमची परावलंबी झालेली. डोळ्यात मात्र , समोरच्या इवल्याश्या खिडकीतून दिसणाऱ्या कॉलोराडोमधील सर्वांत उंच शिखराला गवसणी घालण्याचे उत्तुंग स्वप्न बाळगणारी! सतत व्हीलचेअरला खिळून राहिल्यामुळे काहीश्या एकलकोंड्या, नीरस झालेल्या तिच्या आयुष्याला कलाटणी दिली ती एरिक वेहेनमेयर नावाच्या एका गिर्यारोहकाने. एवरेस्ट शिखरावर विजयपताका फडकवण्याची, भल्याभल्यांना अवघड वाटणारी कामगिरी, अंध असूनसुद्धा प्रत्यक्ष करून दाखवणारा हा असामान्य अवलिया.
शारीरिक अडचणी, व्यंग असलेल्या माणसांना बऱ्याचदा आपल्या समाजात स्थान व अपेक्षित आदर मिळत नाही. हीच टोचणी मलिसाच्या मनालाही लागून राहिली होती. सर्वसामान्य लोकांमध्ये तिचे असे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी एरिकने काहीं खास माणसे हाताशी घेऊन एक टीम तयार केली. या टीमला खास म्हणण्याचं कारणही तसंच होतं. या टीमचा भाग असणारा प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्यातरी शारीरिक अडचणींना तोंड देत होता. तीन गिर्यारोहक तर चक्क पूर्णपणे अंध होते!
पडत, अडखळत, एकमेकांशी ताळमेळ साधत, एक अतिशय वेडं धाडस करण्यासाठी ही आगळीवेगळी टीम कंबर कसून कामाला लागली. यासाठी मलिसाची शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तयारी करून घेणंही गरजेचं होतं. कित्येक दिवस अथक परिश्रम घेत, हातांनी गती देत चालवू शकणाऱ्या तिच्या खास व्हीलचेअरवरून, दोर घेऊन ती ओढणाऱ्या तिच्या टीमच्या मदतीने या तरुणीने अखेर रॉकी माउंटन शिखर काबीज केले.
त्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल बोलताना काढलेले एरिक वेहेनमेयरचे उद्गार मनाला भावणारे आहेत. एरिक म्हणतो, " आज काल बऱ्याच सेल्फ हेल्प पुस्तकांमधून- अडचणी या केवळ मानण्यावर असतात - वगैरेसारखीं अव्यवहारिक विधानं केली जातात. ही निव्वळ खोटी आहेत. अडचणी असतातच, अगदीं खऱ्याखुऱ्या! शारीरिक अपंगत्व असणाऱ्या माणसांसाठी तर त्या काळया दगडावरच्या रेघेइतक्या अटळ असतात. प्रत्येक वेळेस आपण एकट्यानेच त्यांच्याशी दोन हात करू शकतोच असे नाही. एखादी कामगिरी, तुम्ही एकट्याने, कुणाच्याही मदतीशिवाय करू शकतां की नाही, हा मुद्दा तितकासा महत्त्वाचा नाही. महत्त्वाची आहे ती, तुमच्यासमोर येणाऱ्या अडचणींना सामोरं जात त्यांच्यावर मात करण्याची तुमची इच्छा आणि मानसिक तयारी! ती जर असेल, तर आजूबाजूच्या माणसांचा मदतीचा हात स्वीकारून पुढे जाण्यात कसलाही कमीपणा नाही!"
आपल्या दैनंदिन आयुष्यात मात्र, आपल्याला या घटनेच्या नेमकं उलट चित्र दिसतं. अभ्यास असो वा खेळ, किंवा नोकरी - व्यवसायामधील काम असो, ही कामे करण्याची एखाद्याची बौद्धिक कुवत आणि शारिरिक क्षमता याविषयीचे काही ठराविक मापदंड आपण ठरवून ठेवलेले असतात. अगदी लहानपणापसूनच हे मापदंड आपल्या मनावर इतके बिंबवले जातात, की त्यापलीकडे जाऊन, एखाद्या विषयातली एखाद्या माणसाची गती, आकलनशक्ती ही वेगळी असू शकते, हा विचारच आपल्या डोक्याला शिवत नाही. त्यामुळे, त्या ठराविक मापदंडांनुसार एखाद्याची कामगिरी काहीशी कमी झाली, तर त्या व्यक्तीला त्या कामात काहीं गती नाही, हे आपण ठरवून मोकळे होतो, इतकंच काय, त्या व्यक्तीला कमी लेखू लागतो.
म्हणजे बघा हं, अगदीं मूल शाळेत जाऊ लागल्यापासून, बालवर्गात असताना त्याला शब्द लिहीता- वाचता आले पाहिजेत, अक्षर सुवाच्य आणि सुरेख असलेच पाहिजे, पहिलीत जाईपर्यंत त्याला वाक्यें लिहीता आली पाहिजेत, बेरीज वजाबाकी आलीच पाहिजे,असले ठोकताळे मांडून ठेवले जातात.. मांडले काय, त्या मुलांच्या माथींच मारले जातात. मग, एखाद्या मुलाला हे नसेल जमत, तर त्याला सामावून घेत, त्याची मदत करून, त्याच्या गतीनुसार ह्या गोष्टी शिकवण्याची मुभा दुर्दैवाने आपल्या व्यवस्थेमध्ये नाही. मग, मित्रमंडळीच नाही, तर बऱ्याचदा शिक्षकांकडून सुद्धा त्या बिचाऱ्या मुलाच्या वाट्याला टिंगटवाळी आणि उपेक्षाच येते!
बरं, आपल्याकडच्या पालकांनीसुद्धा, आपल्या मुलानं पुढे जायचं, तर ते बाकी मुलांना मागे टाकूनच गेलं पाहिजे, असा काहीसा ग्रह करून घेतलेला आहे. स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून, जमेल तशी इतरांना मदत करत स्वतःच्या कामगिरीचा आलेख उंचावत नेणं, म्हणजे यश प्राप्त करणं नाही असू शकत का? त्यासाठी इतर मुलांना मागे टाकून पहिला नंबर आणण्याचा अट्टाहास का बरं असावा? मग यामधून जन्म घेते, ती एकमेकांचे पाय ओढून त्यांना खाली खेचणारी, गरज भासल्यास इतरांचा गळा चिरण्यास सुध्दा भाग पाडणारी जीवघेणी स्पर्धा!
जी गत अभ्यासाची, तीच गत खेळाचीही! खेळ म्हटलं की माझ्या लहानपणी घडलेला एक प्रसंग मला अजूनही लख्ख आठवतो. लहानपणी शाळेत पहिला नंबर मी कधीही सोडला नाही. एक स्कॉलर विद्यार्थिनी म्हणूनच माझी ओळख झालेली. याउलट, खेळात मात्र माझी काही गती नव्हती. मैदानी खेळात माझा विशेष सहभाग नसायचा. म्हणजे खेळायची इच्छाच नव्हती, अशातला भाग नाही, पण इतरांच्या तुलनेत, या बाबतीत माझी शक्ती कमी पडायची. पी. टी. च्या तासाला जेव्हा मुलं खेळायला बाहेर पडत, तेव्हादेखील संघ निवडताना सर्वात शेवटी माझी निवड होत असे. त्यामुळे खेळाच्या बाबतीत माझा आत्मविश्वास काहीसा डळमळीतच होता.
तरीसुद्धा, एक तरी मैदानी खेळ मला उत्तमरित्या खेळतां यावा अशी खूप मनापासून इच्छा होती. अशांतच, एका दिवाळीच्या सुट्टीत शाळेच्या तर्फे सर्व इच्छुक मुलांना बास्केटबॉलचं प्रशिक्षण दिलं जाईल अशी आम्हाला सूचना मिळाली. मीही उत्साहाने माझं नाव नोंदवून टाकलं. मी पाचवी - सहावीत असेन तेव्हा. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशीं पाहिलं, तर नावनोंदणी केलेली बाकी सगळी मुलं माझ्यापेक्षा बरीच मोठी होती. कदाचित बरीच मुलं यापूर्वी बास्केटबॉल खेळलेलीही होती. माझ्या अपेक्षेप्रमाणे, सुरवातीला बास्केटबॉल बद्दल माहिती, किंवा खेळाचे कुठलेही नियम न समजावून सांगता, प्रशिक्षकांनी थेट बॉल माझ्या हातात दिला, आणि नेम धरून बास्केट मध्ये टाकायला सांगितला. आधीच नाजुक शरीरयष्टी, त्यात अचानक असं काही सांगितल्यामुळे अगदीच भांबावून जाऊन कसातरी टाकलेला तो बॉल बास्केटच्या जवळपाससुद्धा पोहोचला नाही. माझी ती फजिती पाहून इतर मुलंच काय, ते सर देखील जोरात हसले. मी मात्र त्या दिवशी निराश मनाने घरी परतले. या घटनेनंतर मात्र, स्वतःहून एखाद्या मैदानी खेळात भाग घेण्याचं धाडस मी बरीच वर्षे केलं नाही!
त्या दिवशीं त्या मुलांचं काही चुकलं, असं तरी कसं म्हणता येईल? मुलंच ती.. आपल्या आजूबाजूच्या माणसांचं अनुकरण करतच वागायला शिकतात. पण त्या दिवशीं, त्या मुलांना प्रेमाने समजावून, मला विश्वासात घेत मार्गदर्शन करून खेळात सहभागी करुन घेण्याची नैतिक जबाबदारी त्या प्रशिक्षकांची नव्हती का? ती जबाबदारी त्यांनी घेतली असती, तरीही, मी काही फार उत्तम बास्केटबॉलपटू वगैरे झाले असते अशातला भाग नाही. पण त्यावेळी झालेलं मानसिक खच्चीकरण हे , पुढील कित्येक वर्षे मैदानी खेळ न खेळल्यामुळे सुरु झालेल्या आरोग्याच्या कुरबुरी आणि आत्मविश्वासाच्या अभावामुळे आलेल्या नैराश्याचं कारण ठरलं.
पुढे बऱ्याच वर्षांनंतर, पोहायला शिकताना दीड- दोन महिने सलग प्रयत्न करूनही काही येईना. पुन्हा एकदा, तलावामध्ये पोहणाऱ्या लोकांच्या कुत्सित नजरा, टोमणे चुकवण्यासाठी सगळं सोडून देण्याच्या विचारात होते. या खेपेस मात्र, "त्यांच्याकडे लक्ष नको देऊस, काहीं दिवसांत या सगळ्यांपेक्षा उत्कृष्ट पोहशील"असं म्हणत माझ्यावर विश्वास दाखवून मला धीर देणाऱ्या, माझ्या गतीनुसार मला शिकवून तयार करणाऱ्या माझ्या प्रशिक्षकांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत!
याच पार्श्वभूमीवर, मागे कधीतरी व्हायरल झालेला एक व्हिडिओ आठवतो. बहुतेक तो व्हिडिओ जपानमधला असावा. तायक्वांडो शिकवणाऱ्या एका वर्गातला तो प्रसंग होता. त्या व्हिडिओमध्ये एक चार पाच वर्षांचा छोटासा मुलगा पांढरा पट्टा ( white belt ) मिळवण्यासाठी परीक्षा देत होता. ती परीक्षा म्हणजे, त्याच्या समोर असलेली एक वीट पायाने तोडल्याशिवाय त्याला तो पांढरा बेल्ट मिळणार नव्हता. समोरच त्याचे प्रशिक्षक उभे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सात- आठ वेळा प्रयत्न करून सुद्धा ती वीट तोडता न आल्यामुळे, ते इवलंसं पिल्लू बिचारं रडकुंडीला आलं! त्यानंतर जे घडलं, तो मात्र माझ्यासाठी एक सुखद धक्का होता! त्या वर्गातली एकूण एक सर्व मुले कंपू करून त्याच्याभोवती जमली, आणि त्याला चिअर करून त्याचा उत्साह वाढवू लागली. अखेर त्या मुलाने ती वीट तोडून परीक्षा पास झाल्याचा आनंद त्या सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर अक्षरशः ओसंडून वाहत होता! आपल्या सहकाऱ्यांच्या कमतरतेवर बोट ठेऊन त्यांचा उपहास करण्यापेक्षा त्यांच्या पाठीशी उभे राहत त्यांचा विश्वास वाढवण्याचे सामंजस्य आणि खिलाडूवृत्ती दाखवणाऱ्या त्या मुलांमध्ये असे संस्कार रुजवणाऱ्या त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
"आजची हार मनाला लावून घेऊ नकोस गड्या! तुलाही जमेल हळू हळू सरावाने!" किंवा, "काहीं मदत लागली तर जरूर सांग, मी आहे पाठीशी" ही वाक्यें ऐकायला आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर प्रत्येकाचेच कान असुसलेले असतात. ती भावनिक गरज ओळखून सर्वांना सोबत घेत पुढे जाणाऱ्या समावेशक वृत्तीची आणि परिपक्वतेची आपल्या समाजाला आवश्यकता आहे. हे जेव्हा घडेल, तेव्हा "एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ" हे तुकोबांचे शब्द केवळ अभंगाच्या ओळी न राहतां जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन बनतील. यामुळे सर्वच लोकांच्या अडचणी सुटतील, प्रश्न नाहीसे होतील असे नाही, पण हा दृष्टिकोन कित्येक लोकांना त्या अडचणी पार करत आयुष्य आनंदाने जगण्याची एक नवीन ऊर्जा, एक नवीन उत्साह देत राहील, हे मात्र नक्की!