Saturday, 20 June 2026

शाळा

 शाळा 



"आई, ट्रेकला जाताना टॅब घे बरं का!" लेकरू सांगत होतं...

" आग लागो त्या टॅबला ! टॅब आणि मोबाईल घेऊन काय कप्पाळ ट्रेकिंग करणार रे तुम्ही?" मी ओरडले.

" मग तीन दिवस आम्ही करू तरी काय? बोर होईल आम्हाला!" 

"अरे, ट्रेकला कसला टॅब बघता? तिथे गप्पा मारायच्या."

"गप्पा?" डोळे मोठ्ठे करत त्याने विचारलं.

"हो ऽ तुला माहित आहे का? हिमालयाशी बोलायचा प्रयत्न केलास ना, की तो आपल्याशी खूप गप्पा मारतो.... कितीतरी गोष्टी शिकवतो तो! तेच करायला चाललोय आपण!" 

माझं हे बोलणं त्याला किती पटलं, कळलं, कुणास ठाऊक. पण,"आई मग तर मी हिमालयाशी इतकी बडबड करेन, की तोच कंटाळून टॅब घेऊन बसेल!" असं म्हणून वाकुल्या दाखवत कार्टं पळूनही गेलं!

गेली तीन वर्षं सलग " तुम्ही दोघं ट्रेकला जाता.. मला मात्र नेत नाही" असा तक्रारीचा सूर लावला होताच त्याने.. लहान आहे, कितपत जमेल. म्हणत आम्हीच त्याला नेणं टाळत होतो.यावर्षी मात्र पोरगं हट्टालाच पेटलं होतं.." मलापण ट्रेकला यायचं " त्याने फतवाच काढला. म्हणूनच यावर्षी मात्र, एकेकटं , ग्रुपसोबत न जाता, नवरोबाने ही 'फॅमिली ट्रेकची' शक्कल लढवली होती. सगळे कुटुंबातले असल्यामुळे आपल्यालाही त्यांच्यासोबत वेळ घालवता येईल आणि पोराला त्याच्याच वयाच्या इतर मुलांची सोबतही होईल, हा हेतू.

मुलं आणि मोठी माणसं मिळून साधारण दहा जणांचा ग्रुप ट्रेकला जायला सज्ज झाला. यातला एक नवरोबा सोडला, तर माझ्यासारखे इतर सगळे हौशे नवशे गवशेच. म्हणून बराच विचार करून सोपा ( easy to moderate) ट्रेक म्हणून बियास कुंडची निवड झाली.

पु. ल. त्यांच्या ' अपूर्वाई ' पुस्तकात म्हणतात, " प्रत्येक माणसाला जसा चेहरा असतो, तसा प्रत्येक शहराला एक वास असतो" . हे जसं खरं आहे, तसं माझ्या मते प्रत्येक शहराला, जागेला, एक आवाजसुद्धा असतो. सकाळी सकाळी गोव्यातल्या शहरात किंवा गावांत फिरलात, तर 'पोदेरा'चं पोंपों, दारादारात मासळी विकणाऱ्या 'नुस्तेकान्नी'ची "नुस्तें जाय गे ऽ‌" ची आरोळी आणि रस्त्यात भेटलेल्या कुण्या गोंयकाराचे लयबद्ध कोंकणी बोल यातून तयार झालेला संमिश्र आवाज असतो तो! मुंबईला तिच्या गर्दीचा आणि लोकलच्या खडखडाटाचा आवाज, तसा पुण्याला तिथल्या टोमण्यांचा आवाज.(हा आवाज मात्र, आता पुण्यापुरता मर्यादित राहिलेला नसून, कर्तृत्ववान पुणेकरांनी तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला आहे!) 

हिमालयाचासुद्धा स्वतःचा एक आवाज आहे - शांततेचा. ब्रह्मांडात घुमणाऱ्या ओंकाराच्या अनाहत नादासारखा धीरगंभीर. इथल्या दऱ्याखोऱ्यातून, नदीच्या प्रवाहातून, पानफुलातून हा नाद सतत उमटत असतो.आपल्याला साद घालतो.. आणि मग शहराच्या गजबजाटाने कंटाळलेली पावलं त्याच्या ओढीने, आपसूकच हिमालयाच्या दिशेने वळतात.

या ट्रेकमध्ये धुंडी ते बखरताज आणि बखरताज ते बियास कुंड असा दोन दिवसांचा प्रवास होता. धुंडी ते बखरताज हा चार पाच तासाचा रस्ता खडकाळ असला तरी फारसा अवघड नव्हता. "आपण कधी पोहोचणार?" काळजात धडकी भरवणारा दमलेल्या लेकाचा सवाल आलाच! " हे काय, इथेच आहे पलीकडे!" डोंगरात सगळं ' इथेच ', आणि ' पाच मिनिटाच्या अंतरावरच ' असतं, हे आता मला हळूहळू सवयीने माहीत झालंय.

प्रसंगावधान राखून खाऊचे पुडे उघडले गेले. इतका वेळ सोबत करणाऱ्या गोंडस पहाडी भूभूंशी वाटून खाऊ खाता खाता भुकेलेलं पोट आणि शिणलेले पाय शांत झाल्यावर, मग मात्र डोंगरातली गंमत त्याला जाणवू लागली.  खाऊबरोबरच आजूबाजूला दिसणाऱ्या शिखरांच्या नावांची देवाणघेवाण झाली. ज्या शिखरांची नावं माहीत नव्हती, त्यांना आपापली नावं देत, हे तुझं शिखर, ते माझं करत त्यांच्या वाटण्या करून झाल्या.. समोरच्या सरळसोट कड्यावर तुरुतुरु चढणाऱ्या, पार मुंग्यांच्या रांगेसारख्या दिसणाऱ्या शेळ्या मोजून झाल्या . पोरगं आता डोंगरात रमू लागलं होतं. 



चालता चालता गप्पा रंगत गेल्या. अधून मधून उडणारी हास्याची कारंजी मरगळलेल्या मनाला ताजंतवानं करत होती. हळूहळू,"किती चालायचं?" , "बापरे! अजून किती राहिलंय??" वगैरे  पोरांनाच काय, आम्हालाही पडलेले प्रश्न पुसट होत गेले, आणि खडकाळ वाटेवरून चालण्याचा कंटाळा हवा गेलेल्या फुग्यासारखा कुठल्या कुठे दूर उडून गेला.

मला मात्र हिमालय यावेळी काहीसा वेगळाच भासत होता! पोरांच्या किलबिलाटाच्या जोडीने झऱ्यांसारखं खळखळून हसणारा, कस्तूर पक्षाची शीळ ऐकत निवांत पहुडलेला, मधूनच उनाड उंडारणाऱ्या शेरडांना सूर्याचे डोळे वाटारुन दटावणारा...  नेहमी शांत आणि धीरगंभीर भासणारा हिमालय यावेळी भलताच गप्पिष्ट झालेला होता.. नातवंडांना अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या एखाद्या आजोबांसारखा!






चार पाच तासांच्या भ्रमंतीनंतर बखरताजला पोहोचलो. ही campsite बघताक्षणीं मनात भरणारी. चहूबाजूला थेट आकाशाला गळामिठी घालणारी हिमशिखरे.. सोबतीला आजूबाजूच्या परिसरात मनसोक्त हुंदडणारे शेळ्यांचे कळप आणि भोवतालच्या कुरणात मानेला झटके देत चरणारी खेचरं. विंचवाचं बिऱ्हाड त्याच्या पाठीवर असतं म्हणे.. पण आमच्यासारख्या ट्रेकिंग करणाऱ्यांचं बिऱ्हाड मात्र या खेचरांच्या पाठीवर असतं. ट्रेकर्सचं सामानसुमान, तंबू, स्वयंपाकाची सगळी साधनसामुग्री हे सगळं चंबुगबाळं ही खेचरं मोठ्या इमानेइतबारे पाठीवरून ने आण करत असतात.






बखरताज campsite च्या घरात आता आम्ही चांगलेच स्थिरावलो. मुलं तर शेळ्यांच्या जोडीने धिंगाणा घालत होती. "माझ्या 'घरी ' ये, मी तुझ्या घरी येतो" ची आमंत्रणे केली जात होती, पत्त्यांपासून बिजनेस पर्यंत डाव रंगत होते, आणि गप्पांना ऊत आला होता. संध्याकाळी acclimatisation walk म्हणून समोर दिसणाऱ्या बर्फाळ भागात जायचं ठरवलं. बर्फात जायचं म्हटल्यावर पोरांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. दीडेक तासाचा प्रचंड खडकाळ वाटेवरचा प्रवास मात्र उद्याच्या नाटकाच्या मुख्य प्रवेशाची नांदी होती. मुलं बर्फात धिंगाणा घालत होती, snowman बनवण्यात दंग होती. मी मात्र दुसऱ्या दिवशी काय दिव्य करावं लागणार आहे याची मनोमन कल्पना करत गारठून गेले होते.



दुसऱ्या दिवशी डोंगराने उठवलं तेच मुळी बोचऱ्या वाऱ्याच्या सपासप थपडा मारीत. हा हिमालय म्हणजे रंगभूमीवरचा कसलेला नटच! प्रेमळ आजोबांच्या भूमिकेतून मारकुट्या मास्तरांच्या भूमिकेत तो सहज शिरतो. हा अवतार पाहूनच बहुतेक सूर्याने आजच्या शाळेला दांडी मारली असावी. काहीश्या द्विधा मनस्थितीच चालायला सुरुवात केली. 

खरंतर आतापर्यंत काढलेल्या माहितीत सोपा म्हणून गणला गेलेला हा ट्रेक. पण म्हणतात ना ? " one man's mountain is another man's molehill". डोंगरांमध्ये पडीक असणाऱ्या ट्रेकवेड्या लोकांसाठी असेलही तो सोपा. माझी आणि इतरांची मात्र त्या मोठमोठाल्या खडकांवरून तोल सावरत न धडपडता चालायची कसरत चालली होती. कित्येक ठिकाणी तर दोन्ही बाजूला काळजाचा ठोका चुकवणाऱ्या खोल दऱ्या.पहिल्या दिवशी सोपा वाटलेला ट्रेक आज मात्र पावलापावलाला परीक्षा बघत होता. मी मनातल्या मनात परमेश्वराच्या नावाचा उच्चार, आणि मोठ्याने या ' सोप्या ' ट्रेकची आखणी करणाऱ्या माझ्या नवऱ्याच्या नावाचा उद्धार करत एकेक पाऊल टाकत होते. काल डोंगराने पोरावर काय जादू केली कुणास ठाऊक, एरवी बाजारात चार पावलं चालायला कुरकुर करणारं पोरगं आज मात्र गाईडच्या जोडीने सगळ्यात पुढे चालत होतं.



माझ्या पूर्वीच्या दोन्ही ट्रेकमध्ये, आणि अगदी काल पाहिलेला हिमालयसुद्धा पानाफुलांच्या दागिन्यांनी डवरलेला, निसर्गसंपन्न साम्राज्याचा अनभिषिक्त सम्राट होता. त्याचा तेव्हाचा थाट निराळा होता. इथे मात्र वृक्षवल्लींच्या आभूषणांचा त्याग करून शुभ्र वस्त्रे ल्यालेला संन्यस्त तपस्वी समोर उभा होता. ऋतुराज वसंताने त्याच्यासाठी रोडोडेन्ड्रॉन फुलांच्या गुलाबी पायघड्या पसरल्या, तरी " सोने चांदी आम्हा मृत्तिकेसमान" म्हणणाऱ्या तुकोबांसारखा स्थितप्रज्ञ. मग त्याचा तो मार्गही तसाच खडतर होता यात नवल ते काय?



एव्हाना गाईडसोबत गेलेली पोरं पार नजरेआड झाली होती. प्रचंड वाऱ्यामुळे उडणारी धूळ नाकातोंडात गेल्यामुळे की काय, मला श्वास घ्यायला भयंकर त्रास होऊ लागला. अश्या परिस्थितीत फार पुढे जाणं काही शक्य नव्हतं. " अजून थोडा टप्पा पार केला, की कुंडचा धबधबा दिसतो. एकदा दर्शन झालं की हवं तर त्या ठिकाणी थांबा" गाईड म्हणाला. त्याच्या सल्ल्याप्रमाणे, खडकांमधून थोडासा पल्ला पार केल्यानंतर एक निमुळती पायवाट लागते. पायवाटेच्या एका बाजूला कडा, दुसऱ्या बाजूला खोल दरी, आणि त्या दरीत पसरलेलं विस्तीर्ण खोरं. तिथून पलीकडे पाहिलं की बियास नदीचं उगमस्थान मानला गेलेला तो पवित्र जलस्त्रोत दिसतो. आता मात्र मी इथेच थांबायचा निर्णय घेतला.



गाईड बाकी लोकांना घेऊन, दीड दोन तासात परत येतो असं सांगून अंतर्धान पावला. मला त्या वाटेवर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची वर्दळ आणि क्षणाक्षणाला बदलणारं हिमालयाचं रूप पाहत बसण्याशिवाय पर्याय नव्हता.. असा किती वेळ गेला कुणास ठाऊक. 

अचानक काळया ढगांचे ताफे समोरच्या शिखरांवर चाल करून आले. काय होतंय हे कळायच्या आत मुसळधार पावसाबरोबर भयंकर गारपीट सुरू झाली. गोफणीतून दगडांचा मारा करावा, तसं ते ढग अक्षरशः जमिनीला आणि माणसांना झोडपून काढत होते. इतका वेळ शांत रसात सुरू असलेल्या नाटकाचा रौद्र रसातला प्रवेश सुरू झाला होता. बर्फ आणि वादळी वाऱ्याने आणलेल्या गारठ्याने हातापायाच्या संवेदना काढून घेतल्या होत्या. कुंडपर्यंत गेलेल्या आमच्या ग्रुपमधल्या कुणाचाच पत्ता नव्हता. कुणीतरी येऊन मला या धुमश्चक्रीतून सोडवावं अशी अपेक्षा करण्यापलीकडे माझ्या हातात काहीच नव्हतं. 

पंधरावीस मिनिटं त्या गारठलेल्या अवस्थेत मी तिथेच बसून राहिले. मनात मात्र हजारों शंकाकुशंकांचं जाळं... पुढे गेलेली मुलं ठीक असतील ना? भिजून गारठली तर नसतील?? इथेच वादळाचा हा आवेश, तर तिथे काय परिस्थिती असेल?? विचार करकरून मेंदूही आता गोठायला लागला असावा. तेवढ्यात कुठूनतरी पळत पळतच गाईड माझ्यासमोर अवतरला.. अगदी देवासारखा धाऊन आला म्हणा ना! 

" चलो मॅडम, अभी इधर नाही रुक सकते " मुलं आणि इतर सगळे मागाहून येत आहेत याची ग्वाही देत, तो मला हाताला धरून जवळपास खेचतच खाली नेऊ लागला. ज्या खडकांवरून अगदी विचारपूर्वक पाय रोवत चढले होते, त्यांच्यावरून त्या पहाडी सुपरमॅनच्या गतीने उतरणं म्हणजे एक दिव्यच होतं. पण तो काहीं ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हता. तास दीड तासानंतर थोडा कमी पाऊस असलेल्या सुरक्षित ठिकाणी पोहोचताच तो थांबला, आणि मी सुटकेचा निःश्वास टाकला. काही वेळातच मागे राहिलेले सगळे आमच्यापर्यंत येऊन पोहोचले. " आई, मी पूर्ण केला ट्रेक!" पोराचा चेहरा मला बघताच उजळला. मी मात्र नुसतंच जवळ घेऊन त्याला थोपटलं.

पाऊस थांबल्यामुळे पुढची वाट चालणं बरंच सोपं झालं होतं. संध्याकाळपर्यंत सगळे सुखरूप campsite ला पोहोचले. नंतर जेव्हा विचारलं, तेव्हा कळलं की कुंडपाशी पोहोचल्या पोहोचल्याच वादळाने थैमान घालायला सुरुवात केली होती. कुंडचं आरस्पानी सौंदर्य डोळे भरून बघण्याएवढा वेळही मिळाला नसावा. चालता चालता पोरगं चिंब भिजून गारठलं होतं.. एकदोनदा धडपडून त्याला चांगलीच ठेचही लागली होती.

"काय रे, तुला भीती नाही वाटली?" मी लेकाला विचारलं. 

" वाटली ना!"

"मग??" मी कुतुहलाने विचारलं.

"मग काय? मी चालत राहिलो हळूहळू.." त्याने अगदी काहीच न घडल्यासखं सहज उत्तर दिलं. मी मात्र त्याच्याकडे पाहतच राहिले.

मूल पहिल्यांदा जेव्हा शाळेत जातं तेव्हा आईच्या मनात हुरहूर असते. मूल रडतं, शाळेत जायला नकार देतं. आई मात्र काळजावर दगड ठेऊन त्याला शाळेत सोडून येते. मग मात्र, एका क्षणीं तिथले मित्र, बाई, गुरुजी यांच्याशी हसत खेळत वावरताना ते रडणं विसरून जातं. तिथली पुस्तकं, रंगीबेरंगी खेळणी यात रमताना अचानक ते मोठं झालेलं असतं. या ट्रेकला येण्यापूर्वी एवढंसं खरचटलं तरी "आई, लागलं!!" म्हणत गळा काढणारं, अंधाराला घाबरणारं पिल्लू इथे मात्र शांत राहून, न डगमगता अडचणींना तोंड द्यायला शिकत होतं. घरी अस्ताव्यस्त पसारा मांडणारं, जेवताना नखरे करणारं बाळ इथे आल्यापासून मुकाट्याने डोंगराची शिस्त पाळत होतं. आभासी जगाच्या पलीकडचं जग पहायला शिकत होतं. लेकरू माझ्याही नकळत मोठ्ठं झालं होतं!

"पुढच्या वर्षी मी अजून मोठा ट्रेक करणार!" त्याचा निर्णय पक्का झालाय. पुढच्या वर्षी शाळेला उन्हाळी सुट्टी लागली, की या डोंगराच्या शाळेत जायचे त्याला वेध लागलेत. खरंतर त्याच्यासोबत मलाही! यापुढे दरवर्षी लेकाला घेऊन डोंगराच्या शाळेत जाईन. आणि हिमालयही कधी चुचकरत, कधी फटकारत, कधी मित्र तर कधी तत्वज्ञ बनून काही ना काही शिकवत राहील. त्यालाही आणि मलाही!